पालघर पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

    दिनांक  26-May-2018दोन हजार ९७ मतदान केंद्रांवर दि. २८ मे रोजी मतदान

पालघर/ वाडा: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, २०९७ मतदान केंद्रांवर दि. २८ मे रोजी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. या पोटवडणुकीकरिता १२ हजार ८९४ कर्मचारी तसेच चार हजार २१९सुरक्षा कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

दोन हजार ९७ केंद्रांपैकी १४ केंद्रांना ‘क्रिटिकल’ असे नमूद करण्यात आले असून, यामध्ये या केंद्रांकडे शासकीय यंत्रणेचे अधिक लक्ष राहणार असल्याचेही डॉ. नारनवरे यांनी सांगितले. पालघर लोकसभा क्षेत्रातील डहाणू विधानसभा क्षेत्रात ३२७, विक्रमगड मध्ये ३२८, पालघर मध्ये ३१८, बोईसरमध्ये ३३८, नालासोपारा मध्ये ४४९ तर वसई विधानसभा क्षेत्रात ३२७ मतदान केंद्रे आहेत. यांपैकी डहाणू मधील पतीलपाडा (६३), बोईसरमधील बोईसर(३४), धोंडीपूजा (८५), खैरपडा (२९४) तसेच वालीवमधील तीन केंद्रे, नालासोपारा विधानसभा क्षेत्रात निळेमोरे येथील पाच आणि आचोळे येथील दोन अशी एकूण १४कें द्रे ‘क्रिटिकल’ घोषित करण्यात आली आहेत. मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, नऊ उपविभागीय पोलीस अधिकारी, १८ पोलीस निरीक्षक, १८२ पोलीस उपनिरीक्षक, दोन हजार ६०२ पोलीस शिपाई, ४९५ नवीन भरती झालेले पोलीस, एक हजार ११७ होमगार्ड व ४६ नागरी सुरक्षा विभागाचे स्वयंसेवक यांना तैनात करण्यात आले आहे. मतदानासाठी दोन हजार ७३७ मतदान केंद्र आहेत. सात हजार ७३७ मतदान अधिकारी व दोन हजार तीनशे आठ शिपाई यांचा फौज फाटा कार्यरत राहणार आहे.

सर्व मतदारांना दोन हजार ९७ मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांमार्फत मतदार चिठ्ठयांचे वाटप करण्यात येत आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम व व्हीव्हीपीटी मशीन्ससंबंधित विधानसभा मतदारसंघ मुख्यालयाच्या स्टॉग रूममध्ये जमा करण्यात येतील व त्यांनतर कडक पोलिस बंदोबस्तामध्ये सदर मशीन पालघर येथील सूर्या कॉलनीमधील जिल्हा स्ट्रॅाग रूममध्ये जमा करण्यात येतील.

“दि.३१ मे रोजी पालघर येथे होणार्या मतमोजणीला सहा विधानसभा क्षेत्रांसाठी प्रत्येकी १४ अशीे एकूण ८४ मोजणी टेबल्स मांडण्यात येणार आहेत. या प्रत्येक टेबलवर सुपरवायझर, सहाय्यक व मायक्रो ऑब्झर्व्हर तसेच त्यांच्या जोडीला समन्वय साधणारे, डेटा एन्ट्री कर्मचारी असे सुमारे सहाशे अधिकारी-कर्मचारी कार्यरत राहतील,” अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिली.

मतदान सोमवार दि. २८ मे रोजी दिवशी सकाळी सात ते सायं. सहा वाजेपयर्ंत तर मतमोजणी दि. ३१ मे रोजी सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे.

“मतदानप्रक्रिया शांतपणे व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन व इतर सर्व यंत्रणा सुसज्ज असून, सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदान करावे,” असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी केले आहे.

पैसे वाटपाबाबत शिवसेनेने केलेला आरोप धादांत खोटा: रवींद्र चव्हाण

पालघर पोटनिवडणुकीत मतदारांना पैसे वाटप केल्याबाबत शिवसेनेने भाजपवर केलेला आरोप पूर्णत: खोटा असून, पैसे वाटप करताना पकडलेला कार्यकर्ता हा भाजपचा नसल्याचा खुलासा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. या उलट मतांसाठी पैसे वाटणे ही शिवसेनेचीच कार्यपद्धती असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असतानाच शुक्रवारी डहाणूमधील रानशेत या गावात मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तसेच पैसे वाटप करताना पकडलेली व्यक्ती ही भाजपचा कार्यकर्ता असल्याचा धादांत खोटा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. या आरोपाबाबत खुलासा करताना मा. चव्हाण म्हणाले की, “ज्या व्यक्तीकडे पैसे सापडले आहेत, तो माणूस भाजपचा नाही हे आपण खात्रीपूर्वक सांगू इच्छितो.”

“पैसे वाटप ही भाजपची संस्कृती नाही. आम्ही विकासाचे राजकारण करतो, उलट मतदानासाठी पैसे देणे ही शिवसेनेचीच कार्यपद्धती आहे. कल्याण लोकसभा निवडणूकीत जेव्हा दिवंगत वसंत डावखरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारकीचे उमेदवार होते, तेव्हा उल्हासनगर निवडणुकीत अशाच स्वरूपाची एक ध्वनिचित्रफीत दाखवून, त्यांची बदनामी करण्यात शिवसेनेचाच हात होता. तसेच २०१४ सालीही मनसेचे राजू पाटील लोकसभा निवडणुकीत उमेदवार होते. त्यावेळीही त्यांच्या भावाची अशाच पद्धतीची एक बनावट ध्वनिचित्रफीत दाखवून, शिवसेनेने त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचले होते. त्यामुळे शिवसेनेच्या आरोपावर कुणीही विश्वास ठेवणार नाही,” असे रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले.