मराठी उद्योगविश्वातील हॉटेलिअर

    दिनांक  25-May-2018   
 

 
शिवनेरी. प्रत्येक मराठी माणसाच्या मनाचा एक हळूवार कप्पा. इथेच शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ’मर्‍हाटी’ समाजाला स्वाभिमानाची जाण देणार्‍या राजाचा जन्म झाला. त्यामुळेच हे स्थान अवघ्या मराठीजनांस हृदयाच्या जवळ आहे. या परिसरात बल्लाळवाडी नावाचं अवघ्या दोन हजार लोकसंख्येचं एक गाव आहे. याच गावात मारुती गावडे राहायचे. शेतीसोबत काहीतरी जोडधंदा असावा, म्हणून त्यांनी एक चहाची टपरी टाकली. भेळ आणि चहा मिळायचं ते त्या परिसरातलं एकमेव ठिकाण. बल्लाळेश्वर या ग्रामदैवताच्या नावाने हे हॉटेल सुरु झालं. १९५३ साली मारुतीरावांनी सुरु केलेल्या या टपरीवजा हॉटेलच्या पुढे १५ ठिकाणी शाखा सुरु होतील असं कोणालाही वाटलं नसेल. ही किमया घडवली आहे मारुतीरावांचे नातू विजय गावडे यांनी.
 
मारुतीरावांनी बल्लाळवाडीत हॉटेल सुरु केलं खरं, पण ‘हॉटेल’ म्हणता येईल असं ते मुळातच नव्हतं. पंचक्रोशीतल्या गावकर्‍यांच्या चहाची तलफ भागविणारं आणि चविष्ट भेळ मिळणारं ठिकाण म्हणून ही टपरी नावारुपाला येत होती. मारुतीरावांचे चिरंजीव बबनरावांनी या टपरीचा कायापालट केला आणि त्याला छोट्याशा का होईना, पण ‘हॉटेल’चं स्वरूप आलं. एक सिस्टम त्यामध्ये आली. आता ‘हॉटेल’ म्हटलं की उधारी आलीच. त्यात गावचे लोक म्हणजे सहा-सहा महिने उधारी मिळायचीच नाही. कसंबसं वडिलांनी सुरु केलेलं ‘हॉटेल’ म्हणून बबनरावांनी ते हॉटेल सुरु ठेवलं. बबनरावांना तीन मुलं. गजानन, विजय अन् राजू. तिन्ही मुलं शाळेतून घरी आली की हॉटेलमध्ये वडिलांना हातभार लावायची. लहानपणापासूनच तिघाही मुलांना व्यवसायाचे बाळकडू मिळाले.
 
विजय हा त्यापैकी जरा धडपड्या स्वभावाचा. आपल्या हॉटेलचं वैशिष्ट्य भेळ आहे हे त्याने ओळखलं. हेच वैशिष्ट्य घेऊन, आपण गावची वेस ओलांडावी असं त्याच्या मनाने ठरवलं. ओझरला त्याने हॉटेल सुरु करायचं ठरवलं. मात्र, घरातून त्याला विरोध झाला. ‘आधी घरचं हॉटेल सांभाळा, मग बाहेरचं बघा,’ असा सल्ला पण दिला. मात्र, घरातला विरोध पत्करत, विजय गावडे यांनी ओझरमध्ये ‘हॉटेल बल्लाळेश्वर’ सुरु केलं. अवघ्या दोन-तीन वर्षांत हॉटेलचं चांगलंच बस्तान बसलं. या हॉटेलमुळे विजयचा उत्साह दुणावला. आता मुंबईत हॉटेल सुरु करावं हा विचार विजयने मनाशी पक्का केला आणि मुंबईच्या वेशीवर पहिलं पाऊल टाकलं ते डोंबिवलीमध्ये. डिसेंबर २०१५ ला डोंबिवलीमध्ये हॉटेल सुरु झालं खरं, पण हवं तसं चालत नव्हतं. नातेवाईक, मित्र यांच्याकडून दहा लाख रुपये जमा करून, हॉटेलमध्ये गुंतवले होते. या हॉटेललादेखील घरच्यांचा विरोध होता. भेळ आणि मिसळ यांचा दर्जा अफलातून होता, मात्र त्या परिसराव्यतिरिक्त ग्राहक येत येत नव्हते, परिणामी हवं तसं हॉटेल चालत नव्हतं. महिने उलटले. पैशाच्या तगाद्यासाठी सहा नातेवाईक-मित्रांचे फोन येणे सुरु झाले होते. हॉटेल बंद करून, पैसे देण्याशिवाय काही गत्यंतर नाही हे विजयरावांना उमगले. गुढीपाडव्याची शोभायात्रा ही डोंबिवलीची शान समजली जाते. या शोभायात्रेला अंदाजे दोन लाखांच्यावर लोक फडके रोड वर जमा होतात. विजयरावांचं हॉटेल बल्लाळेश्वरसुद्धा फडके रोडलाच आहे. गुढीपाडव्याची शेवटची संधी घेऊया असं त्यांच्या अंतर्मनाने ठरवलं. खरंतर हा वेगळाच आणीबाणीचा क्षण होता. म्हणजे ’झालाच तर पाडवा नाहीतर शिमगा’ अशी काहीशी अवस्था विजयची झाली.
 
नियतीने यावेळी मात्र दान विजयरावांच्या पारड्यात टाकले. शोभायात्रेतील लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिलाच, पण एका नावाजलेल्या वृत्तवाहिनीनेसुद्धा हॉटेल बल्लाळेश्वरविषयी एक फीचर स्टोरी केली. त्याचा परिणाम असा झाला की हॉटेल बल्लाळेश्वर एका रात्रीत हिट झाले. अगदी दूरवरून मिसळ आणि भेळच्या ऑर्डर्स येऊ लागल्या. अगदी अंधेरी, बोरिवलीहून मिसळच्या ऑर्डर्स आता येत आहेत. अशा प्रकारे एक एक करत, आज हॉटेल बल्लाळेश्वरच्या संपूर्ण महाराष्ट्रात १५ शाखा आहेत. या १५ शाखांमध्ये १२० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. अजून ३५ ठिकाणी हॉटेल बल्लाळेश्वर सुरु होण्याच्या तयारीत आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत शंभर शाखा सुरु करण्याचा विजय गावडेंचा मानस आहे.
 
आजोबांनी लावलेलं रोपटं, आज नातू त्याचा वटवृक्ष करु पाहत आहे. मारुती गावडे-बबन गावडे-विजय गावडे अशा तीन पिढ्यांचा हातभार हॉटेल बल्लाळेश्वरच्या समृद्धीला लागला आहे. भविष्यात मराठी उद्योगविश्वात गावडे उद्योग समूह एक ग्रेट हॉटेलिअर म्हणून नक्कीच नावारुपास येतील यात काहीच शंका नाही.
 
 
 
 
- प्रमोद सावंत