४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट साध्य करावे-पुरुषोत्तम भापकर

    दिनांक  25-May-2018
 
 
 
 
औरंगाबाद :  राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहीमेत गेल्यावर्षी मराठवाडा विभागाने १  कोटी ५  लाख वृक्षांची लागवड झाली असून यावर्षीचे ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सर्व यंत्रणांनी लोकसहभागातुन व्यापक प्रमाणात साध्य करावे असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी येथे दिले. 
 
 
 
विभागीय आयुक्त कार्यालयात वृक्ष लागवड मोहीमेसंदर्भातील विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी डॉ. पुरुषोत्तम भापकर बोलत होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन , जलसंधारण आयुक्त दिपक सिंगला, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
 
 
विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी मराठवाड्यात वनाखालील जमीनीचे प्रमाण वाढवणे आवश्यक असून त्यासाठी वृक्षलागवड मोहीम यशस्वीरीत्या राबविणे गरजेजे आहे त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी आपल्या विभागाला ठरवून दिलेले वृक्षलागवडीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करावे, वृक्ष लावण्यासाठीच्या खड्ड्याचे खोदकाम येत्या ३१  मे पूर्वीच पूर्ण करुन घ्यावे, तसेच खड्डे खोदणे व इतर सर्व पूर्व तयारी विषयक कामाची माहिती ऑनलाईन अपलोड करावी, अशा सुचना संबंधितांना यावेळी दिल्या. 
 
 
 
गेल्यावर्षी राज्यातील पहिला वृक्षसंवर्धन कक्ष मराठवाडा विभागात स्थापन करण्यात आला असून माझी शाळा – माझी टेकडी उपक्रमाव्दारे ४२ लाख शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने १२.३९ लाख वृक्ष लागवड तसेच मिल्ट्री कॅन्टोनमेंटच्या सहभागाने कॅन्टोनमेंट क्षेत्रात ७ हजार ५००  रोपांची लागवड करण्यात आली टास्क फोर्स इको बटालीयन व्दारे गेल्या वर्षी अब्दीमंडी येथे ३१२५  रोपांची लागवड करण्यात आली तर ग्लोबल परळी मिशन उपक्रमांतर्गत नाल्याच्या दुतर्फा १३४३३  वृक्ष लागवड करण्यात आलेली असून त्यातील सर्व वृक्षांची योग्य ती काळजी घेऊन वृक्षांना वेळोवेळी पाणी उपलब्ध करुन देणे रोपांचे संगोपन करणे यासाठीची सक्षम यंत्रणा सर्व विभागांनी कार्यरत ठेवावी असे डॉ. भापकर यांनी सुचित केले.