वसई विरार महापालिकेतील २९ गावांबाबत सरकारचा फेरविचार

    दिनांक  25-May-2018

गावे वगळण्याबाबत सरकारचे प्रतिज्ञापत्र सादर

 
 
 
वसई : वसई विरार महापालिकेत समाविष्ट केलेल्या २९ गावांना महापालिकेतून वगळण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे २९ गावांमधील गावक-यांनी आनंद व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला असल्याचे सांगत जन आंदोलन समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनीदेखील मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
 
३१ मे २०११ रोजी वसई विरार महानगरपालिकेतून २९ गावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर शासनाने प्राप्त झालेल्या निवेदनानुसार विभागीय महसूल आयुक्त यांचा अहवाल मागवला होता. त्या अहवालानुसार ८ जानेवारी २०१६ रोजी शासनाने उच्चन्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. विभागीय आयुक्तांच्या अहवालात २९ गावांचा समावेश पुन्हा महापालिकेत करावा अशी शिफारस होती, परंतु त्यानंतर झालेली आंदोलने, गावकऱ्यांची प्राप्त झालेली निवेदने याद्वारे २९ गावांचा समावेश महानगरपालिकेत करू नये आग्रही मागणी केली केली होती.
 
त्यानंतरही २९ गावांचा समावेश महापालिकेत करावा अशी शिफारस करण्यात आली होती. मात्र, ती बाब अयोग्य असल्याने ग्रामस्थांच्या भावना विचारात घेऊन शासनाने सदर गावांच्या बाबतीत त्यांच्याशी सल्ला मसलतीची प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या मुद्द्यावर ३ महिन्याच्या आत गावकऱ्यांशी सल्ला मसलत करून योग्य तो निर्णय शासन घेईल अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले असून संबंधितांना देण्यात आल्याची माहिती जनआंदोलन समितीद्वरे देण्यात आली.