जनशक्ती धनशक्तीचा पराभव करेल : अशोक चव्हाण

    दिनांक  24-May-2018


पालघर : 'भारतीय जनता पक्ष हा सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून प्रत्येक निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु पालघरची जनता त्यांच्या हा डाव हाणून पडेल आणि जनशक्ती ही भाजपच्या धनशक्तीचा पराभव करेल' असे वक्तव्य महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. पालघर पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरणगाव येथे आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.
गेल्या चार वर्षांमध्ये भाजपने लोकसभा निवडणुकांमध्ये दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदी आणि फडणवीस यांनी जनतेची फसवणूक करत सातत्यने जनतेचा विश्वासघात केला आहे. समृध्दी महामार्ग आणि बुलेट ट्रेनच्या नावाखाली गरीब शेतकरी आणि आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. आदिवासी समुदायाला देण्यात येणाऱ्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. सामान्य जनतेच्या विकासापेक्षा फडणवीसांना आणि भाजपला मोदींच्या गुजरातच्या विकासाची जास्त चिंता आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडणे हे जनतेचे कर्तव्य आहे, असे मत चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच सेना आणि भाजपला अद्दल घडवण्यासाठी म्हणून जनतेनी कॉंग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा यांना विजयी करा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

पालघर लोकसभा पोट निवडणुका अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्ष आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. भाजपचे दिवंगत आमदार चिंतामण वनगा यांच्या मुलाला शिवसेनेनी उमेदवारी दिल्यानंतर दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक जिंकणे हे अत्यंत गरजचे झाले आहे.