भुजबळांनी मदत करण्याचा प्रश्नच नाही : जयंत पाटील

24 May 2018 21:01:03

नरेंद्र दराडे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया


नाशिक विधान परिषदचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी छगन भुजबळांच्या पाठींब्यासंबंधी केलेल्या वक्तव्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसने नाकारले असून भुजबळ यांनी दराडेंना पाठींबा देण्याचा अथवा मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्य विधान परिषद निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी कोकण मतदारसंघामधून विजयी झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचे विजयीसाठी अभिनंदन देखील त्यांनी यावेळी केले.

विधान परिषद निवडणुकांमधील पाच पैकी तीन जागा राष्ट्रवादीने लढवल्या तर तीन जागा या काँग्रेस पक्षाने लढवल्या होत्या. यातील नाशिक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे मुळातच संख्याबळ हे कमी होते, असे ते म्हणाले. परंतु तरी देखील सहाणे यांनी प्रयत्न केले. पण अपुऱ्या संख्याबळामुळे राष्ट्रवादीला यश आले नाही. त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, आणि राहता राहिला भुजबळांच्या समर्थनाचा प्रश्न तर कोण कोणाची भेटी घेतो यावर मतदान अवलंबून नसते. त्यामुळे भुजबळ साहेबांनी दराडे यांना मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे म्हणत त्यांनी आपली चर्चा थांबवली.

आज जाहीर झालेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये नाशिकमधून शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे हे विजयी झाले आहेत. विजयी झाल्यानंतर दराडे यांनी आपल्याला पाठींबा दिलेल्या नेत्यांचे आभार मानतात, भुजबळ यांचा देखील आपल्या विजयात हातभार आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वीच भुजबळांच्या सुपुत्रांनी उद्धव यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे भुजबळ यांच्यासंबंधी वेगवेगळ्या चर्चना उधान आले होते.
Powered By Sangraha 9.0