बाळासाहेबांच्या सेनेनी कधी पाठीत वार केला नाही : मुख्यमंत्री फडणवीस

    दिनांक  24-May-2018जव्हार :
'बाळासाहेबांच्या शिवसेनेनी कधीही कोणाच्या पाठीत वार केला नाही. परंतु उद्धव ठाकरे यांनी एक नवीन शिवसेना तयार केली असून तिच्या माध्यमातून त्यांनी भाजपच्या पाठीत वार केला आहे' अशी जोरदार टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. पालघर पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जव्हार येथील प्रचार सभेत ते आज बोलत होते.

'दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर भाजपने त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी मी स्वतः उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांना याविषयी माहिती देऊन पाठिंब्याची मागणी केली होती. यावेळी दोघांनीही आम्लाहा पाठींबा देण्याचे मान्य केले होते. परंतु ठाकरे यांच्या मनात मात्र वेगळेच काही तरी चालले होते. सरतेशेवटी आपल्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून आजन्म भाजपशी एकनिष्ठ राहिलेल्या वनगा यांचे घर फोडण्याचे पाप सेनेनी करून भाजपच्या पाठीवर वार केला. परंतु पाठीवर जरी वार केला असला तरी हा वार झेलून पालघरमध्ये भाजपचा झेंडा फडकवू' असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका करत, 'सेनेला वनगा यांच्या कुटुंबियांचे अश्रू ३ मे लाच काही दिसले ? त्या अगोदर का नाही दिसले ? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

येत्या २८ तारखेला पालघर येथील लोकसभेच्या जागेसाठी पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. भाजपचे दिवंगत खा.चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे याठिकाणी ही निवडणूक घेण्यात येत आहेत. दरम्यान या निवडणूकीत भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष आमनेसामने येणार आहेत. कारण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेनी आपली उमेदवारी दिली असून शिवसेनेच्या यानिर्णयानंतर भाजपने राजेंद्र गावीत यांना आपला उमेदवार घोषित केले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनलेल्या या निवडणुकीत कोण विजयी होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.