ही हिंस्रता येतेय्‌ कुठून?

    दिनांक  23-May-2018   
माणूस नेमका काय आहे? ‘कोहम्‌?’ हा सवाल आपल्याला पिढ्यांच्या अनेक वळणांवर अन्‌ जगण्याच्या आडवळणावर पडत राहिला आहे. त्याचे उत्तर शोधण्याचा मार्ग माणसाचा खर्‍या अर्थाने माणूस होण्याच्या दिशेने जातो. अनेकांना हा प्रश्न पडतच नाही अन्‌ बहुतांना तो पडतो ते त्या प्रश्नाला बगल देतात. उत्तर शोधण्याची जबाबदारी आणि कर्तव्यही बाजूला सारतात ते माणुसकीपासून दूर राहतात. ही माणसं देव निर्माण करतात. त्यांची पूजा करतात. कर्मकांड करतात. तरीही देव निर्माण करणारी हीच माणसं माणूस मात्र होत नाहीत. माणूस माकडापासून झाला, असा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत आहे. माणूस हा पृथ्वी नामक ग्रहावरचाच नाही, असेही सांगितले जाते. त्यासाठी पृथ्वीवरचे इतर प्राणी आणि माणूस यांच्यातले खाण्यापिण्यापासून जगण्याच्या अनेक शैलींपर्यंतचे अंतर दाखविले जाते. माणूस जनावरांसारखाही वागतो अन्‌ त्याच्या कर्माने तो अगदी ईश्वरही ठरतो. अर्थात, ईश्वर ही संकल्पनाही मानवीच आहे. तो जसा असेल, त्याचे जगणे अन्‌ जीवनाच्या मान्यता जशा असतील, तसा त्याचा देवही असतो. कुणाचा देव शाकाहारी असतो तर कुणाचा मांसाहारी. देवीला दारूचा नैवेद्य दाखविला जातो, असेही कुठेतरी वाचले आहे.
 
या जगातले इतर प्राणी त्यांच्या निसर्गधर्माप्रमाणेच वागत असतात. त्यांची जी काय जीवशास्त्रीय गुणवैशिष्ट्ये असतील, त्यानुसारच प्राणी वागत असतात. त्या सीमारेषा ते कधीच ओलांडत नाहीत. माणसाचे तसे नाही. तो लंबकाच्या दोन टोकांच्या पलीकडे जाऊन त्याचे वर्तन ठेवतो. आयुष्यभर सोबत असणारा माणूसही नेमका असाच वागेल, असे वागणारच नाही, असे ठामपणे सांगता येत नाही. तो अचाट आणि अफाट अशी चिंतने मांडतो, सिद्धांत प्रस्थापित करतो आणि स्वत:च त्याच्या अगदी टोकाचे विरोधी वागत असतो. त्याच्या भुकाही नैसर्गिक नाहीत. तो सतत निसर्गाशी झगडाच घेत आलेला आहे. निसर्गाशी असलेले त्याचे युद्ध एकतर्फी आहे म्हणून मग त्याचे जगणे नैसर्गिक नसतेच. त्यातून एक अस्वस्थता निर्माण होते अन्‌ ती घालविण्यासाठी तो धर्म, अध्यात्म, चिंतन... असे मार्ग चोखाळतो. अर्थात तेही मानवीच असल्याने तो कायमच अस्वस्थ असतो.
 
गुजरातेत, कचरा वेचणार्‍या एका वंचिताला तो चोर असल्याच्या संशयावरून इतके बेदम मारण्यात आले की, त्यात त्याचा मृत्यू झाला. एका दुकानाच्या ग्रीलला बांधून तो दोर एकाने पकडून ठेवला आहे आणि दुसरा त्याला अत्यंत क्रूरपणे मारतो आहे, असा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. ते दृश्य बघणे फार भीषण आहे. त्यापेक्षा मरणार्‍याची जात शोधून त्या अर्थाने त्या घटनेकडे पाहणे जास्त भीषण वाटते. मरणारा दलित होता, असे सांगितले जात आहे. मरणारा आणि मारणाराही माणूसच होता, हे जास्त भयावह आहे, याकडे मग दुर्लक्ष होते. एखाद्या घटनेवर भावनातिरेकाने व्यक्त होण्याच्या घटना रोजच ऐकायला, बघायला अन्‌ वाचायला मिळतात. कधी बायकोने, ऑफिसमधून आल्यावर गरम पोळ्या करून वाढल्या नाही म्हणून तिचे केसच कापून टाकले नवर्‍याने, हे वाचण्यात येते. जन्मदाता बापच आपल्या तान्ह्या लेकराला अमानुष मारहाण करतो आहे, असे व्हिडीओदेखील व्हॉटस्‌अॅपवर आपल्याला नको असताना येतात अन्‌ आपल्याला ते बघावे लागतात. परवा एका कंपनीत एका महिला कर्मचार्‍याने पगार मागितला म्हणून तिला केवळ ठारच केले नाही, तर तिची खांडोळी केल्याची बातमी वाचनांत आली. मागे पुण्यात, कुत्र्यांचा त्रास होतो म्हणून त्यांना बांधून पेटवून देण्यात आल्याची घटना घडली.
 
 
माणसं अशी दुसर्‍या माणसांच्या बाबत किंवा मग इतर प्राण्यांच्या बाबतच अशी क्रूर होतात असे नाही. स्वत:च्या बाबतही क्रौर्याची परिसीमा गाठत असतात. आत्महत्या करणे हा त्यातला प्रकार. मात्र, जगण्याच्या समस्यांनी मरण स्नेही वाटू लागण्याची अवस्था प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येतेच. सारेच काही आत्महत्या करत नाहीत. तो एक क्षण असतो. तो पार केला की जीवनाचा प्रवाह पुन्हा खळाळून वाहू लागतो. 60 हजारांवर ज्यूंची कत्तल करणारा क्रूरकर्मा हिटलरही आत्महत्या करतो आणि रेल्वेत आपल्या रडक्या बाळाला मारणार्‍या आईकडून ते लेकरू ओढून घेत दाटलेले गहिवर डोळ्यावाटे मोकळे करत तिला, ‘‘माझ्या लेकराला का मारतेस?’’ असे संतापून विचारणारे साने गुरुजीही आत्महत्या करतात. मात्र, अलीकडे आत्महत्या करताना ते सारेच चित्रित करून तेही समाजमाध्यमांवर व्हायरल केले जाते. शेतमाल विकला गेला नाही म्हणून त्याची गंजी रचून ती पेटविल्यावर त्यात उडी मारून शेतकरी आत्महत्या करतात, अशी अनेक उदाहरणे आहेत. इलेक्ट्रिकच्या खांबावर चढून विजेची तार हातात धरून शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचेही वाचण्यात आले आहे...
 
असे का होते? प्रश्न पडायला हवा. कारण असे वागणारी माणसंच असतात. आपल्याच सारखी माणसं. तो केवळ अपवाद आहे, विकृती आहे, सामान्यांच्या पलीकडचे काही आहे, ती नियमित वहिवाट नाही, अशी संभावना करून आम्ही त्याला बगल देतो. त्याच्या बाजूने निघून जातो. त्या वेळी आम्ही मानवी वर्तनाच्या श्वापदी आविष्काराकडे दुर्लक्ष करत असतो. ही अस्वस्थता कुठून येते आणि तिची इतकी कोंडी होते की माणूस म्हणून लाज वाटावी अशा विकृतीत ती का परिवर्तित होते, याचा विचार केला जायला हवा. राग, द्वेष, असहायता, अतृप्तता आणि आपल्यावर अन्याय होतो, या भावनांचे त्याच वेळी विरेचन केले जायला हवे. त्याचे प्रशिक्षण असायला हवे. घुसमटींचे व्यवस्थापन कौशल्य शिकविले जायला हवे. नाहीतर संतापाच्या गाठी निर्माण होत राहतात आणि मग त्यांचा असा कधीतरी स्फोट होतो. टोकाची प्रतिक्रिया ज्या घटनेत उमटते ती केवळ त्याच घटनेतून निर्माण झालेली नसते. आपल्याला वाटते की, इतके काय झाले की बायकोने पोळ्या नाही करून दिल्या, किंवा आपल्याकडे काम करणार्‍या कर्मचार्‍याने पगार मागितला यात चुकले काय? तो संताप अन्‌ त्यातून आलेले क्रौर्याचे वर्तन अनेक दिवसांपासून/वर्षांपासून साचून असलेले असते. अनेक दिवस स्वत:ला रोखून धरलेले असते अन्‌ मग त्या अतिरेकी भावनांचा निचराच झालेला नसतो. अन्यायाची ही भावनादेखील व्यक्तिगणिक बदलत असते. समूहाने राहण्यासाठी जे काय नियम केले असतात, ते अनेकांना अन्यायकारकच वाटत राहतात. अलीकडच्या काळात तर माणसांचा माणसांवर विश्वासच राहिलेला नाही. आम्ही विभागण्याची कारणे शोधत असतो. आमचे वेगळेपण अन्‌ विशेषाधिकार त्यातून आम्हाला नोंदवायचा असतो. इतरांवर बाकायदा अन्याय करण्याचे अधिकारच आम्हाला त्यातून हवे असतात. प्रेम करण्याची कारणे शोधण्यापेक्षा द्वेष करण्याचीच कारणे आम्ही शोधत असतो. त्यात मग जात, धर्म, पंथ, आर्थिक स्तर, सामाजिक स्तर... अशी असंख्य कारणे असतात. गर्दीचेही आपले एक मानसशास्त्र आहेच.
 
 
माणसांची गर्दी इतकी वाढत चालली आहे की, एकमेकांच्या गरजांची पूर्ती करण्यातून निर्माण होणारा स्नेहच आता राहिलेला नाही. माझ्या वाट्याचे दुसराच कुणी हिसकावून नेईल, असे वाटत राहते आणि त्यातून एकमेकांवरचा विश्वास संपत जातो. तसे झाले की असुरक्षितता निर्माण होते. असुरक्षितेतून मग माणूस हिंसक होतो. मीच सतत कुणासमोर झुकत असतो, मग मी अधिकार गाजवायचे कुठे, असा प्रश्न पडला की पोळ्या करून न देणार्‍या बायकोचे केस कापले जातात... त्यासाठी खूप ठिकाणी अकारण लाचारी पत्कारावी लागल्याच्या प्रसंगातून आलेल्या अगतिकेचा दाह माणसाला क्रूर करतो... हे सगळे थांबवायचे असेल तर निसर्ग हा धर्म झाला पाहिजे. तो सगळ्यांचाच सारखा असतो. तिथे कुणालाच विशेषाधिकार नसतात. अशांती नावाची मानवनिर्मित गोष्ट निसर्गात नसतेच. माणूसच ती त्याच्या, ‘मी माणूस म्हणून खास’ या भावनेतून निर्माण करतो. जंगले फस्त करतो, नद्या पिऊन टाकतो. संपत्ती नावाची भावना अन्‌ त्यातून आलेली साठवणूक अन्‌ त्यातून इतरांवर अन्याय करण्याची मानवी भावना त्याला अमानुष करते. माणसाचा जनावर झाला, असे म्हणणेही जनावरांवर अन्याय करणारे आहे! ते कधीच साठवणूक करत नाही. त्यांना कधीच कुणावर सत्ता गाजवायची नसते अन्‌ चोर्‍या, खून, दरोडेखोरी करणारी जनावरे शोधायला हवी...!