किनारा तुला पामराला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2018   
Total Views |
 
 
 
पृथ्वीप्रदक्षिणा’ ही गोष्ट आपण पूर्वी पुराणकथांमध्ये वा दंतकथांमध्ये वाचायचो. नारदाने पृथ्वीप्रदक्षिणा केली वगैरे वगैरे.... संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत करणे आता तंत्रज्ञानाने शक्य झालंय. चौदाव्या-पंधराव्या शतकात युरोपीय प्रवासी जगाचा शोध घ्यायला जहाज घेऊन समुद्रसफरीवर निघाले आणि तेव्हापासून समुद्रमार्गे जगाची सफर करणं हा आवडीचा छंद बनला. पृथ्वीचा ७० टक्के भाग पाण्याने व्यापलेला असल्याने एका ठिकाणाहून समुद्रमार्गे निघाल्यावर अख्ख्या पृथ्वीला वळसा घालून पुन्हा त्याच जागी येणं शक्य आहे. फर्डिनांड मेगॅलन हा समुद्रमार्गे पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला माणूस मानला जातो. त्यानंतर पृथ्वीप्रदक्षिणेचे खूप यशस्वी प्रयत्न झाले, परंतु समुद्रसफरीवर अगदी आतापर्यंत युरोपियनांचीच मक्तेदारी होती. भारतीयांच्या मनात असं कधी आलं नव्हतं, कारण ‘सागर ओलांडला तर धर्म बुडेल’ अशा काहीतरी बावळट कल्पनांमध्ये आपण रमलेलो होतो. आता मात्र भारतीयांनी या कल्पनेला छेद दिला आहे. नुकतीच सहा भारतीय महिलांनी ‘आयएनएसव्ही तारिणी’ या युद्धनौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली आणि इतिहास घडवला. ‘नाविका सागर परिक्रमा’ दि. १० सप्टेंबर २०१७ रोजी गोव्यातील मांडवी बंदरातून पृथ्वीप्रदक्षिणेसाठी निघालेलं हे जहाज तब्बल २५४ दिवसांनंतर सोमवार दि.२१ मे रोजी यशस्वीरित्या पृथ्वी पादाक्रांत करून पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचलं.
 
 
पृथ्वीप्रदक्षिणा करणं म्हणजे अंधेरीहून परळला जाऊन येण्याइतकं सोपं नाही. या सहा महिलांच्या जिद्दीचं, धाडसाचं, शौर्याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांनी या सफरीचं नेतृत्व केलं. त्यांच्यासमवेत लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, स्वाती पी., लेफ्टनंट ऐश्‍वर्या बोड्डापती, एस. विजया देवी आणि पायल गुप्ता या पाच महिला सहभागी झाल्या होत्या. ‘आयएनएसव्ही तारिणी’ या गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात भारतीय नौदलात दाखल झालेल्या जहाजाची निवड या पृथ्वीप्रदक्षिणेसाठी केली गेली. या जहाजाने तब्बल २१ हजार ६०० समुद्री मैल प्रवास केला. ही पृथ्वीप्रदक्षिणा या महिलांनी पश्‍चिम-पूर्व या मार्गाने केली. १० डिसेंबर २०१७ रोजी गोव्याच्या मांडवी समुद्रकिनार्‍यावरून हे जहाज दक्षिणेकडे निघून नंतर पूर्वेकडे वळलं. ४३ दिवसांच्या सलग प्रवासानंतर हे जहाज २३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाच्या फ्रीमँटल किनार्‍यावर थांबलं. त्यानंतर सुमारे महिनाभराने त्याने न्यूझीलंडच्या लायटेल्टन बंदरावर थांबा घेतला. त्यानंतर सर्वात खडतर अशा प्रशांत महासागराला वळसा घालून हे जहाज दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण किनार्‍यालगत असलेल्या फॉकलंड बेटावर येऊन थांबलं. त्यानंतर आफ्रिकेच्या ‘केप ऑफ गुड होप’ बंदरावर एक थांबा घेऊन अंतिमत: ते गोव्याच्या किनार्‍याला येऊन लागलं. त्या क्षणी या सहा भारतीय वीरांगनांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक जीवावर बेतलेल्या प्रसंगांतून सहीसलामत सुटून या महिला मातृभूमीत परतल्या आहेत. थंडीच्या दिवसांत सकाळी लवकर उठून कुठे जायचं म्हटलं तर आपल्या जीवावर येतं. या महिला प्रशांत महासागरात प्रचंड मोठी वादळं झेलत, शून्याच्याही खाली तापमान गेलेल्या वातावरणात आपलं जहाज हाकत होत्या. ‘आगे बढो’ हे एकच ध्येय! परतीच्या प्रवासात गोव्यापासून दोन हजार मैल दूर असताना अचानक जहाजाचं स्टिअरिंग बिघडलं. ते भर समुद्रात जहाज असताना ते दुरुस्त करून पूर्ववत करणं हे मोठं आव्हान होतं. याहीपेक्षा थरारक प्रसंग म्हणजे व्हेल मासा बराच वेळ जहाजाचा पाठलाग करत होता. या सगळ्या प्रसंगावर यशस्वीपणे मात करत या वीरांगनांनी पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
 
भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी स्वत: गोव्याच्या बंदरावर उपस्थित राहून या दिग्विजयी महिलांचं स्वागत केलं. अंतराळवीर झालेल्या, एव्हरेस्ट शिखर पार केलेल्या भारतीय महिलांच्या पराक्रमामध्ये या एका जागतिक पराक्रमाची भर पडली आहे. याअगोदर कमांडर दिलीप दोंदे आणि कमांडर अभिलाश टॉमी यांनी एकेकट्याने जहाजातून पृथ्वीप्रदक्षिणा केल्या आहेत. ही घटना जगाला भारतीयांच्या शौर्याची प्रचिती आणून देणारी आहे. कुसुमाग्रजांनी लिहिलेलं ’कोलंबसाचं गर्वगीत’ आता फक्त कोलंबसापुरतं मर्यदित न राहता भारतीय दर्यावर्दीही हे गीत गाण्यास पात्र ठरले आहेत.
 
 
 
 
 
 
- हर्षद तुळपुळे

 
 
@@AUTHORINFO_V1@@