साहेब, केवळ घर फोडून काय होणार?

    दिनांक  23-May-2018   
 
 
‘३१ मे रोजी जेव्हा पालघर पोटनिवडणुकीचा निकाल लागेल आणि त्यात जेव्हा श्रीनिवास पराभूत होईल, तेव्हा ‘मातोश्री’चे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद होतील !’ शिवसेनेचे इतक्या स्पष्ट परंतु कमी, संयम शब्दांत कपडे आजवर कोणीच फाडले नसतील. ते मुख्यमंत्र्यांनी रविवारच्या कासे-चारोटी नाका येथील सभेत फाडले. पक्षीय राजकारण क्षणभर बाजूला ठेऊन जरी विचार केला तरी ही एक अत्यंत कटू अशी वस्तुस्थिती आहे. शिवसेनेमध्ये असे दरवाजे बंद झालेल्यांची परंपरा मोठी आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांत तर अशांचा महापूरच आलेला आहे. सेनेत असताना जे ‘वाघ’ होते ते सेना सोडून गेल्यावर सेनेसाठी एकच दिवसात कुत्रे, साप, गांडूळ वगैरे कसे होतात, हे जादूचे प्रयोग आपण सारे गेली कित्येक वर्षं पाहतो आहोत. बाकीच्यांचं जे झालं, ते श्रीनिवास वनगा यांच्याबाबतीत होऊ नये, हीच भावना आजही भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आणि त्यानंतर बाळासाहेब शिवसेनेच्या दैनंदिन कामात सक्रिय असेपर्यंतचा तो जो एक भारावलेला काळ होता, तो केव्हाच इतिहासजमा झाला. आता जे काही उरलं आहे, त्याचंच वर्णन मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरील एका वाक्यात केलं आहे.
 
महाराष्ट्र बदलण्याच्या, मराठी माणसाच्या अस्मितेच्या, कडवट हिंदुत्वाच्या वगैरे बाता जे करतात, ते आतून किती गलिच्छरित्या पोखरलेले आहेत, हे पालघर निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलं. आपली रेष मोठी करता येत नाही, म्हणून दुसऱ्याची रेष छोटी करायची, त्याचा विकृत आनंद घेत बसायचं हाच यामागचा एकवेम हेतू. चिंतामण वनगा यांच्यासारखा भाजपचा कार्यकर्ता ज्यांनी कित्येक वर्षं पालघरमधील वनवासींमध्ये काम केलं, कम्युनिस्टांशी लढा दिला, कम्युनिस्टांचे हिंसक हल्ले होऊनही हा लढा जिवंत ठेवला, अशा माणसाच्या घरात फोडाफोडीचं राजकारण करण्याइतपत शिवसेनेचा सदसद्विवेक खाली घसरला आहे. पालघरशेजारच्याच ठाण्याचे एक ढाणे वाघ या सगळ्या कुरघोड्यांमध्ये आघाडीवर होते. ते सध्या म्हणे ‘मातोश्री’च्या गुडबुकमध्ये आहेत. विधानसभेतून निवडून येऊन मंत्रिपद मिळवणं तशी अवघड बाब. शिवसेनेच्या वाट्याला आलेली मंत्रीपदं ही विधानपरिषदेवर पुनर्वसन झालेल्या पडीक नेत्यांनाच देण्याची परंपरा असतानाही यांनी विधानसभेतून निवडून येऊन मंत्रिपद मिळवलं. या कामगिरीवर म्हणे सेनेचे इतर ज्येष्ठ ढाणे वाघ उदा. देसाई, कदम, रावते वगैरे मंडळी फारच आश्चर्यचकित झाली होती. आता पक्षप्रमुखांची एवढी मर्जी मिळवली तर ती राखण्यासाठी कष्ट करायला हवेच. सेनेच्या सगळ्या इशाऱ्यांना आजवर केराची टोपली दाखवणाऱ्या भाजपचे पाय खेचले म्हणजे सेनानेतृत्व खुश होतं, हे या नेत्याला चांगलंच उमगलेलं असल्याने मग चिंतामण वनगांच्या मुलाला भाजपमधून फोडण्यापासून ते चिंतामण वनगांच्या ड्रायव्हरला फूस लावण्यापर्यंत सारे काही उद्योग त्यांनी केले. त्या उद्योगांमध्ये त्यांचा हात धरणारा कोणीच नसल्याने त्यात त्यांना फारशी अडचणही आली नाही.
 
अडचण फक्त इतकीच की चिंतामण वनगांचं घर तर फोडलं, पण आता श्रीनिवास वनगांना निवडून कसं आणायचं. भाजप हा केवळ एका घरावर (बंगल्यावर म्हणू) किंवा कुटुंबाच्या नावावर चालणारा पक्ष नसल्याने तिथे एक श्रीनिवास सोडून गेले तरी बाकी कोणीही सहजासहजी फुटणारं नाही. गेली वीस-तीस वर्षांत कोणत्याही प्रलोभनांना न भुलता, गुंडागर्दीला न डगमगता निष्ठेने पक्षाचा विचार पुढे नेणाऱ्या चिंतामण वनगांच्या परंपरेतील असंख्य कार्यकर्त्यांची फळी पालघर भाजपकडे आहे. त्यामुळे केवळ कुटुंब फोडून काम होणारं नाही, हे लक्षात आलं. त्यामुळेच मग हिंदुत्व वगैरे सोयीस्कररित्या बाजूला ठेवून चर्चमध्ये ख्रिस्ती पाद्रयांचे पाय धरणं वगैरे सुरू झालं. उठसुठ बाळासाहेबांचं नाव घेणाऱ्यांना तेव्हा बाळासाहेब आठवले नाहीत. पालघरवासीय साधे, भोळेभाबडे असले तरी अडाणी नक्कीच नाहीत. ते हे सगळं पाहत आहेत, त्यातून योग्य तो अर्थबोध घेत आहेत. ते तोंडदेखलं बोलणार नाहीत, ते शांतपणे मतपेटीतून व्यक्त होतील. त्यामुळे, केवळ घर फोडलं असलं, तरी मतदारसंघ काबीज करण्यासाठी अजून बराच पल्ला गाठणं बाकी असून तो आपल्या आवाक्यातही नाही, हेच शिवसेनेने शांतपणे समजून घेण्याची गरज आहे...
 
 
 
 
- निमेश वहाळकर