श्रीगुरुजी रुग्णालयाची ‘आरोग्य संपदा’ योजना

    दिनांक  23-May-2018
 
 

श्रीगुरुजी रुग्णालय ही एक आरोग्य क्षेत्रातील चळवळ आहे. हे रुग्णालय लोकांनी लोकांसाठी चालवले आहे. प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते श्रीगुरुजी रुग्णालयाच्या आनंदवली येथील इमारतीचे उद्घाटन होऊन नवा शुभारंभ झाला. त्यानंतर रुग्णालयाची दमदार वाटचाल सुरू आहे. श्रीगुरुजी रुग्णालयात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, कॅन्सर व इतर सर्व छोटेमोठे आजार या सर्वांवर माफक दरात उपचार व आपुलकीची सेवा देण्यात रुग्णालय यशस्वी झाले. तरुण, ध्येयप्रेरित अनुभवी डॉक्टरांचा संच, प्रामाणिक सल्ला व उपचार, पारदर्शिता ही रुग्णालयाची वैशिष्ट्ये आहेत. रुग्णाला केंद्रस्थानी ठेऊन देण्यात येणार्‍या सेवांमुळे रुग्णालयाने आपले वेगळेपण जपले आहे. या रुग्णालयाने सुरू केलेली ‘आरोग्य संपदा’ योजना समाजातील विविध घटकांना लाभदायक आहे.
 
उद्योजकांना, व्यावसायिकांना व इतर अन्य संघटना व संस्था आपल्या कर्मचार्‍यांना व त्यांच्या कुटुंबीयांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी, अशी अपेक्षा असते. परंतु, बरेच वेळा त्यांना योग्य वैद्यकीय सेवा अपेक्षेनुसार मिळत नाही. अपेक्षेप्रमाणे मिळणारी वैद्यकीय सेवा अनेकदा न परवडणारी असते. म्हणून उद्योजक व व्यावसायिकांच्या भावना समजावून घेऊन ‘आरोग्य संपदा’द्वारे योग्य व परवडेल अशा दरात ही वैद्यकीय सेवा पुरविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कामगारांना, समाजातील इतर घटकांना व त्यांच्या कुटुंबीयांना सर्वांगीण परवडेल अशी आरोग्य सेवा, सुविधा पुरविणे हा या योजनेचा उद्देश आहे.
 
ही योजना सर्व उद्योजक, व्यावसायिक ज्याच्या कर्मचार्‍यांमध्ये ESIC समाविष्ट नाही, परंतु ते आपल्या कर्मचार्‍यांना एक सर्वांगीण आरोग्य सेवा देऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी आहे. तसेच अन्य संस्था, मंडळे, एकत्रित ग्रुप, ज्येष्ठ नागरिक संघ, हास्य क्लब, महिला मंडळे, अन्य मंडळे, व्यापारी, आस्थापना या सर्वांसाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते.
 
आरोग्य संपदा काय देणार? : श्रीगुरुजी रुग्णालय ही एक सेवाभावी संस्था असल्यामुळे येथील आरोग्य सेवा इतर रुग्णालयाच्या मानाने अगोदरच वाजवी दरात उपचार देणारी आहे. ’आरोग्य संपदा’द्वारे सध्याच्या किफायतशीर सेवेवरदेखील पुढीलप्रमाणे सूट दिली जाणार आहे-. १) एका वर्षात १० आरोग्य सल्ले (कन्सल्टेशन) मोफत. २) पुढील सल्ल्यासाठी ५० टक्के सूट देण्यात येईल. ३) पॅथॉलॉजी व इतर तपासण्यांवर १० टक्के सूट. ४) हॉस्पिटल बिलावर १० टक्के सूट. ५) कॅन्सर किरणोपचार ५ टक्के सूट. 6) रुग्णालयातून घेतलेल्या औषधांवर ५ टक्के सूट.
 
आरोग्य संपदाचे सभासद कसे व्हावे? उद्योजकाने/व्यावसायिकाने/संस्थेने/ मंडळाने प्रथम आपल्या संस्थेची नोंदणी श्रीगुरुजी रुग्णालयाकडे करावी, उद्योजकाने / व्यावसायिकाने / संस्थेने / मंडळाने आपल्याकडील किती कर्मचार्‍यांना / सभासदांना ‘आरोग्य संपदा’ची सेवा द्यावयाची आहे, हे ठरवून त्यांच्याकडे श्रीगुरुजी रुग्णालयाचा फॉर्म भरून घ्यावा. कर्मचारी /सभासद स्वत: धरून कुटुंबातील एकूण सहा जणांना ‘आरोग्य संपदा’चे सभासद करून घेऊ शकतो. अर्जदारासोबत कुटुंबप्रमुखाचा एक फोटो जोडणे आवश्यक आहे. श्रीगुरुजी रुग्णालय कर्मचार्‍याला त्याचा फोटो असलेले व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाचे ओळखपत्र देण्यात येईल. जे रुग्णालयात येताना न विसरता आणणे जरूरीचे आहे. या योजनेची मुदत एक वर्षाची असेल व १ वर्षानंतर ती पुन्हा शुल्क भरून नूतनीकरण करून ठेवता येईल. उद्योजक व्यावसायिकाच्या संस्थेची किंवा सामाजिक संस्थेची नोंदणी रु.५००/- फक्त एकदा. कर्मचारी व त्याच्या सहा कुटुंबीयांची सभासदत्व वार्षिक फी रु.५००/- व रु. ८००/- ज्या कर्मचार्‍याचे दरमहा उत्पन्न १५ हजारांपेक्षा कमी आहे. त्यांना शुल्क रु. ५००/-(आरोग्य संपदा).ज्या कर्मचार्‍याचे उत्पन्न रु.१५ हजारपेक्षा जास्त आहे, त्यांना शुल्क रु. ८००/- (आरोग्य संपदा+)‘आरोग्य संपदा’चे सदस्य असलेल्या व रुग्णालयात दाखल झालेल्या सदस्यास केवळ साधारण (जनरल वॉर्डमध्ये व सेमी स्पेशल वॉर्डमध्येच बिलातून सवलत मिळेल). आरोग्य संपदा + चे सदस्य असलेल्या व रुग्णालयात दाखल झालेल्या सदस्यास कुठल्याही वॉर्डमध्ये बिलात सवलत मिळेल. कॅशलेस सुविधा घेणार्‍या रुग्णास ‘आरोग्य संपदा’ची कोणतीही सवलत मिळणार नाही.
 
खालील उपलब्ध सुविधांवर १० टक्के सवलत दिली जात आहे -
 
१. जनरल फिजिशियन, २. नेत्ररोग विभाग, ३. पॅथॉलॉजी विभाग, ४. कान-नाक-घसा विभाग, ५. स्पीच थेरपी विभाग, ६.आय.सी.यू, ७. जनरल सर्जन, ८. जनरल सर्जरी व एन्डोस्कोपी, ९. स्त्रीरोग व प्रसूती विभाग, १०. बालरोग विभाग, ११. ऑक्युपेशनल विभाग, १२. दंतचिकित्सा विभाग, १३. भूल व वेदनाशमन विभाग, १४. फिजिओथेरपी विभाग, १५. अस्थिरोग विभाग, १६. सी.टी.स्कॅन, १७. पाच ऑपरेशन थिएटर्स, १८. एन.आय.सी.यू., १९. एक्स रे व सोनोग्राफी, २०. सेमी स्पेशल रूम्स, २१. डायलिसीस, २२. २ डी इको व स्ट्रेस टेस्ट, २३. स्पेशल व डिलक्स रूम्स, २४. अद्ययावत रिहॅबिलिटेशन सेंटर.
‘आरोग्य संपदा’योजनेचे प्रतिनिधी म्हणून अशोक सौंदाणकर, प्रकाश जाजू, गजानन दीक्षित हे काम पाहत आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी ०९३७२६५१७५० या क्रमांकावर किंवा ashokvasant1gmail.com या मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
श्रीगुरुजी रुग्णालय रुग्णांसाठी सेवा करण्यात तत्पर असून आरोग्य संपदा योजनादेखील त्यापैकी एक आहे. या योजनेचा लाभ घेऊन समाजाच्या विविध घटकांना आपले आरोग्य निरामय राखता येईल.
- डॉ.विनायक गोविलकर,
अध्यक्ष, श्रीगुरुजी रुग्णालय
 
 
 
 
 
- पद्माकर देशपांडे