आकाशाशी जडले नाते - पृथ्वीप्रकाश

    दिनांक  23-May-2018   

 
“आबा, सूर्यप्रकाश ठीक आहे, चंद्रप्रकाश ठीक आहे. पृथ्वीचा कुठला प्रकाश? पृथ्वीची तर फक्त सावली पडते!”, सुमितने विचारले.


“काय सुम्या! तू पण ना, पृथ्वीच्या पातळीवरूनच विचार करतोस बघ! जरा चंद्रावर ये! मग पहा, पृथ्वीप्रकाश कसा पसरला असतो ते!”, आबा सुमितला चिडवत म्हणाले.


“ओह! चंद्रावरून दिसणारा पृथ्वीप्रकाश?”, सुमितच्या डोक्यात प्रकाश पडला.


“Exactly! पौर्णिमेच्या रात्री पृथ्वीवर चंद्राचा कसा लख्ख प्रकाश पडतो? एखादा मोठा ट्यूब लाईट आकाशात लावल्यासारखा प्रकाश पडतो. अगदी तसाच, चंद्रावर पण पृथ्वीचा प्रकाश पडतो.”, आबा म्हणाले.


“पडत असेल, पण आपल्याला ते कळणार कसे?”, सुमितने विचारले.


“अरे! आपल्याला इथूनच चंद्रावर पडलेला प्रकाश दिसतो. चंद्रकोरीची अंधारी बाजू अगदीच काही काळीकुट्ट नसते. त्यावर हलकासा प्रकाश पडला असतो. त्यावरचे उंच सखल भाग, त्यांच्या गडद सावल्या अगदी व्यवस्थित दिसतात. हाच तो पृथ्वीप्रकाशात न्हालेला चंद्र -चंद्रकोरीच्या बारीकशा दिवसाच्या भागावर सूर्यप्रकाश आणि रात्रीच्या भागावर पृथ्वीप्रकाश. PC - Bob King

“खरेच की आबा! मी लहान असल्यापासून असा अंधारातल्या चंद्रावर हलकासा उजेड पहिला आहे, आणि आत्ता तुम्ही सांगितल्यावर ते लक्षात आले की तो पृथ्वीप्रकाश आहे.”, सुमित म्हणाला.


“गंमत सांगतो, तुला सुमित! हा जो प्रकाश आपण पाहतो तो पृथ्वीप्रकाश नसतोच खरा! तो असतो चंद्रावरून परावर्तीत झालेला पृथ्वीप्रकाश! म्हणजेच चंद्राच्या रात्रीच्या भागावरून परावर्तीत होऊन पृथ्वीवर पोचणारा चंद्रप्रकाशच तो! खरा पृथ्वीप्रकाश पाहायचा असेल तर चंद्रावरच जायला हवे!”, आबा म्हणाले.


“आबा चंद्रावर पडणारा पृथ्वीप्रकाश, पृथ्वीवर पडणाऱ्या चंद्रप्रकाशा पेक्षा कितीतरी अधिक असेल न?”, सुमितने विचारले.


“बरोबर मित्रा! एक तर चंद्राच्या आकाशात दिसणाऱ्या पृथ्वीचा व्यास, पौर्णिमेच्या चंद्राच्या चौपट असतो. दुसरे असे की, पृथ्वी चंद्रापेक्षा तिप्पट अधिक चमकदार आहे. म्हणजे असे की, पृथ्वी चंद्रापेक्षा तिप्पट सूर्यप्रकाश परावर्तीत करते. या दोन्ही कारणांमुळे चंद्रावरुन दिसणारी पौर्णिमेची पृथ्वी पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा ४० ते ५० पट अधिक प्रकाशमान असते.”, आबा सांगत होते.वरील चित्रात पृथ्वी व चंद्रामधील अंतर, व चंद्रावर पडणारा पृथ्वीप्रकाश. खालील चित्रात पृथ्वी व चंद्राची प्रकाश परावर्तीत करायची शक्ती व त्यांचा एकमेकांच्या आकाशातील दृश्य आकार. PC: NASA


“शंकरराव, अशाने चंद्रावर रात्री दिव्यांची गरजच नाही! तुमच्या सारख्या रात्री जगात वाचणाऱ्याची मजाच आहे!”, दुर्गाबाईंनी विचारले.


“तसे नाही दुर्गाबाई! पृथ्वीवर जशा चंद्राच्या कला दिसतात, तशाच पृथ्वीच्या पण कला चंद्रावरून दिसतात. पृथ्वीची कला, पृथ्वीवरील ढगांचे आवरण, बर्फाचे अच्छादन, नद्या व सरोवरातील पाणीसाठा यांमुळे तिचा प्रवर्तित होणारा प्रकाश कमी-अधिक होतो.”, आबा म्हणाले.


“आबा, इतर ग्रहांच्या प्रकाशाचे काय? त्यांचा पण प्रकाश त्यांच्या चंद्रांवर पडतो का?”, सुमितने विचारले.


“अर्थातच! आपल्या चंद्रावर जसा पृथ्वीप्रकाश पडतो तसे इतरही ग्रहांच्या चंद्रांवर त्यांचा प्रकाश पडतो. त्यातही गुरु आणि शनी या अति प्रचंड ग्रहांचा त्यांच्या जवळच्या चंद्रांवर पडणारा प्रकाश भारीच असतो. जसे या चित्रात शनीचा Enceladus या त्याच्या चंद्रावर पडलेला प्रकाश दिसत आहे. डावीकडच्या भागात सूर्यप्रकाश पडला आहे, तर उजवीकडच्या भागात पिवळसर रंगाचा शनिप्रकाश पसरला आहे. हे छायाचित्र टिपले होते NASAच्या Cassini या यानाने.
 “सुमित, तुला एक प्रश्न विचारतो. एखाद्या चंद्राचा प्रकाश त्याच्या ग्रहावर पडणे किंवा एखाद्या ग्रहाचा त्याच्या चंद्रावर प्रकाश पडणे पहिले. पण, एखाद्या ग्रहाचा प्रकाश दुसऱ्या ग्रहावर पडेल का?”, आबांनी विचारले.


“काही पण काय? आकाशात दिसणारे गुरु, शुक्र, शनी इत्यादी ग्रह प्रकाशाच्या ठिपक्यासारखे दिसतात. त्यांचा पृथ्वीवर कितीसा प्रकाश पडेल? पण, तुम्ही विचारताय म्हणजे नक्कीच काहीतरी गूढ असणार! तुम्हीच याचे उत्तर सांगा.”, सुमित म्हणाला.


“बर सांगतो! शुक्र हा सर्वात जास्त चमकणारा ग्रह आहे. त्याच्यावर पडणारा ६५% प्रकाश तो परावर्तीत करतो. सूर्य – चंद्रानंतर सर्वात जास्त चमकणारा ग्रह आहे शुक्र. पृथ्वीवर चक्क शुक्राचा प्रकाश पडतो बरे का! एखाद्या काळोख्या रात्री, शुक्राच्या प्रकाशात आपली सावली सुद्धा दिसू शकेल इतका शुक्रप्रकाश पृथ्वीवर पडतो!”, आबा म्हणाले.

संदर्भ -

१. Earthshine, the Moon’s Darker Side – Bob King

२. Shadows of Venus – Dr. Tony Phillips
 
- दिपाली पाटवदकर