किशनगंगा प्रकल्पाविरोध पाकिस्तानची वर्ल्ड बँकेत तक्रार

    दिनांक  22-May-2018
इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरमध्ये भारताकडून सुरु करण्यात आलेल्या किशनगंगा हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पाविरोधात पाकिस्तानने जागतिक बँकेचे (वर्ल्ड बँक) दार ठोठावले असून या प्रकल्पावरून पाकिस्तानने भारताची तक्रार वर्ल्ड बँकेकडे केली आहे. भारताने किशनगंगा प्रकल्पाचे उद्घाटन करून सिंधू जलवाटप कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. तसेच यावर कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे.

आज दुपारीच पाकिस्तानच्या एका शिष्टमंडळाने अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे असलेल्या वर्ल्ड बँकेच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. याठिकाणी वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेत, पाकिस्तानने आपले गाऱ्हाणे या अधिकाऱ्यांसमोर मांडले व भारताने पाकिस्तानशी कसल्याही प्रकारची चर्चा न करता हा प्रकल्प पूर्ण केल्याची तक्रार पाकिस्तानने केली. याचबरोबर या प्रकल्पामुळे सिंधू नदीचे पाकिस्तानला मिळणारे पाणी कमी होणार असून यासाठी वर्ल्ड बँकेने भारताविरोधात काही तरी कारवाई करावी, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. परंतु वर्ल्ड बँकेने मात्र कारवाईसंबंधी अजून कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


 
गेल्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांदीपोरा जवळील या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. भारतातील किशनगंगा या नदीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. परंतु पाकिस्तानचा मात्र नेहमीपासून या प्रकल्पाला विरोध होता, पाकिस्तानच्या मते भारताच्या या प्रकल्पामुळे पाकिस्तानच्या नीलम (किशनगंगा नदीचे पाकिस्तानमधील नाव) नदीची पाणी कमी होईल. ज्यामुळे सिंधू कराराचा भंग होईल. परंतु आंतरराष्ट्रीय न्यायालयाने देखील या प्रकरणी भारताची बाजू घेतली असून भारताला यासाठी आवश्यक असलेले सर्व अधिकार न्यायालयाने दिलेले आहेत. तरी पाकिस्तानला या प्रकल्पावर आक्षेप आहे.