इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान- लातूरची नव जलसंजीवनी

    दिनांक  22-May-2018
लातूर :
'दुष्काळमुक्त आणि जलयुक्त लातूर' अशी लातूर शहराची ओळख निर्माण करण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासन आणि अक्का फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या 'इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान' या अभिनव उपक्रमाला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अनेक नागरिकांनी या मोहिमेअंतर्गत 'जलयोद्धा' म्हणून आपली नोंदणी केली असून जलसंवर्धन आणि भूजल पुनर्भरणाच्या नागरिकांच्या प्रशिक्षणाला आजपासून प्रारंभ झाला आहे. दरम्यान लातूरला जलयुक्त बनविण्यासाठी लातूरकरांनी मोठ्या प्रमाणात या अभियानामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.


इंद्रप्रस्थ अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे जलसंवर्धन आणि भूजलाचे पुनर्भरणाद्वारे जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा निर्माण करणे हा आहे. इंद्रप्रस्थ म्हणजे 'धनधान्य आणि पाण्याने समृद्ध असलेला प्रदेश' अशी संकल्पना या अभियानामार्फत मांडली गेलेली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्या येत्या काही दिवसांमध्ये दुष्काळमुक्त होऊन सर्वार्थाने समृद्ध व्हावा, म्हणून या योजनेला 'इंद्रप्रस्थ' हे नाव देण्यात आले आहे. या अभियानामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक घरातील नागरिकांना जलसंवर्धनाचे धडे देऊन घरगुती पातळीवर जलसंवर्धन आणि भूजल पुनर्भरण कशा प्रकारे करता येऊ शकते, या विषयीची माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या नागरिकांना 'जलयोद्धा' अशी पदवी देण्यात येणार आहे. लातूरमध्ये असलेल्या एकूण ९४५ गावांंमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार असून २२ मे ते ५ जून २०१८ दरम्यान हे प्रशिक्षण चालू राहणार आहे.


या प्रशिक्षणामध्ये जमिनीत पाणी मुरविण्याच्या एकूण पाच पद्धतींचे प्रशिक्षण देण्यात येणार असून या पाच पद्धतींना 'पंचनिष्ठा' असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पावसाच्या पाण्याची साठवण, कुपनलिकांचे पुनर्भरण, विहिरींचे पुनर्भरण, शोषखड्डा आणि 'घर तेथे झाड' या अभिनव उपक्रमांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे पाचही उपाय अगदी घरगुती पातळीवर राबवले जाऊ शकतात, तसेच यामुळे पावसाचे पाणी हे आपल्याच शेतामध्ये आणि शेतजमिनीमध्ये जिरवले जाऊन त्याठिकाणी असलेला भूजलसाठा वाढवता येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक जण हा पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी बनेल. दरम्यान लातूरमधील कस्तुराई मंगल कार्यालय येथे प्रशिक्षणासाठीची नोंदणी सुरू असून यासाठी ८४४८१८१५२१ या क्रमांकावर मिस कॉल करून नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
भौगोलिकदृष्ट्या लातूर जिल्हा हा दक्षिण भारताच्या मध्यामागी येतो. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७ हजार १५७ चौ.किमी असून यातील अवघ्या ३५ चौ.किमीच्या प्रदेशावर जंगल आणि झाडे आहेत. बाकी उरलेल्या सर्व भागामध्ये मनुष्यवस्ती, शेती आणि पायाभूत सुविधा यांचे वर्चस्व आहे. तसेच लातूर जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर याठिकाणी झालेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे जिल्ह्यात वर्षाला सरासरी ६५० मिमी ते ८०० मिमी इतकाच पाऊस पडतो. परंतु पाणी वापराचे योग्य नियोजन आणि प्रभावी सिंचन प्रकल्प जिल्ह्यात उपलब्ध नसल्यामुळे शेतीसाठी आणि पिण्यासाठी म्हणून हे पाणी अपुरे पडते आणि यामुळेच प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये लातूरकरांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. दरम्यान गेल्या दोन वर्षांपूर्वीची जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईमुळे जिल्ह्याला रेल्वेद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. दरम्यान राज्य सरकारने राबवलेल्या 'जलयुक्त शिवार' या योजनेमुळे जिल्ह्यातील भूजल पाणीसाठ्यामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये लक्षणीयरित्या वाढ झालेली असून लातूरची 'दुष्काळी जिल्हा' म्हणून असलेली ओळख इंद्रप्रस्थ अभियानामुळे कायमची पुसली जाईल, अशी आशा आहे.

 
जाणून घ्या इंद्रप्रस्थ अभियानाबद्दल :