ब्राह्मोसची आणखी एक यशस्वी चाचणी

21 May 2018 19:07:21

'लाईफ एक्स्टेंशन टेक्नॉलॉजी'ची घेतली यशस्वी चाचणी



बालेश्वर : भारत आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमानाने तयार करण्यात आलेल्या ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रुज मिसाईल या अद्यावत क्षेपणास्त्राची भारतीय संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) आज आणखी एक यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. भारतात नव्याने तयार करण्यात आलेल्या 'लाईफ एक्स्टेंशन टेक्नॉलॉजी'च्या पाहणी करण्यासाठी म्हणून ही चाचणी घेण्यात आली होती. तसेच ही पहिलीच चाचणी यशस्वी झाल्यामुळे सध्या देशभरातून डीआरडीओचे कौतुक करण्यात येत आहे.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वात प्रथम याविषयी माहिती आज सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी हि चाचणी घेण्यात आल्याचे सांगितले. ओडिशामधील बालेश्वर येथे 'लाईफ एक्स्टेंशन' तंत्रज्ञानाची ब्राह्मोसवर यशस्वी चाचणी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे त्यांनी अभिनंदन करत भारतात पहिल्यांदाच हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आल्याबद्दल त्यांचे कौतूक केले. दरम्यान या तंत्रज्ञानांमुळे भारताच्या शस्त्रसाठ्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या ब्राह्मोस आणि इतर क्षेपणास्त्रांना एका जागेहून दुसऱ्या जागी नेण्यासाठी येणाऱ्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.



ब्राह्मोस ही भारतीय सैन्य दलातील सध्याची सर्वात अद्यावत आणि शक्तिशाली क्षेपणास्त्र आहे. याची एकूण लाबी ही ८.४ मीटर असून ०.६ मीटर ऐवढी आहे. याबरोबरच यामध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. याची एकूण मारक क्षमता ही ३०० किमीपेक्षा देखील जास्त आहे. तसेच हवा, जमीन आणि पाण्यामध्ये मधून देखील या क्षेपणास्त्राचा मारा करता येऊ शकतो. त्यामुळे ब्राह्मोस हे भारताचे अद्यावत 'ब्रह्मास्त्र' मानले जाते.
Powered By Sangraha 9.0