संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे – जिल्हाधिकारी

    दिनांक  21-May-2018
 
 
 
 
औरंगाबाद :  संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे. उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एकमेकांत समन्वय ठेऊन कार्यवाही त्वरीत पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज अधिका-यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भात करावयाच्या पूर्वतयारीबाबत आयोजित आढावा बैठकीत  चौधरी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, मंजूषा मुथा, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, महसूल, पोलिस, महावितरण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, अग्नीशमन, लघुपाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
 
 
मॉन्सून पूर्व करावयाची तयारी वेळेत पार पाडावी. सर्व विभागांनी प्रत्येकी एक जबाबदार व्यक्तीस नोडल अधिकारी म्हणून नेमावे. संभाव्य आपत्तीवर वेळेत, प्रभावीपणे कार्यवाही पार पाडण्यासाठी, समन्वयासाठी सर्व विभाग प्रमुख, नोडल अधिकारी यांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर येणा-या प्रत्येक दूरध्वनीस तत्काळ प्रतिसाद द्यावा. नियंत्रण कक्ष चोविस तास सुरू ठेवावा. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. महावितरणने आवश्यक मनुष्यबळ, बहुउपयोगी वाहने आणि यंत्रणा यांची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही पार पाडावी. आरोग्य विभागाने पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील पाण्याचे नमुने तपासावेत. पाण्यापासून आजार उद्भवणार नाहीत, यासाठी तत्काळ कार्यवाही पार पाडावी. त्याबाबत जनजागृती करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील मोडकळीस आलेले पूल, साकव याबाबतचे सर्वेक्षण करून धोकादायक पुलांबाबत आवश्यक तत्काळ कार्यवाही पार पाडावी. महसूल, पोलिस, महावितरण, लघुपाटबंधारे, जलसंधारण, पाणी पुरवठा, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, अग्नीशमन या विभागांनी सातत्याने एकमेकांच्या संपर्कात रहावे, असे निर्देश उपस्थित अधिका-यांना चौधरी यांनी दिले.
 
 
 
जिल्ह्यातील सर्व अग्नीशमन यंत्रणांचा सविस्तर सर्वसमावेशक असा अहवालही तयार करावा व पंधरा दिवसांत तो जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सूचनाही चौधरी यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.