चिंतामण वनगांचा खरा वारस संघर्षातूनच बनता येते !

    दिनांक  21-May-2018

पालघर पोटनिवडणूक प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांचे भाष्य


 
 
पालघर : खासदार चिंतामण वनगा हे अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेले होते. संघर्षातून ते एकेक पाऊल पुढे टाकत गेले. पक्षनिष्ठा त्यांच्या ठायी ठायी होती. त्यामुळेच एखादी निवडणूक हरल्यावरही ते कधी निराश झालेले दिसले नाहीत. मला संघर्ष करायचा आहे, आणि तो भाजपद्वारेच करायचा आहे, हेच त्यांनी शेवटपर्यंत सांगितले. त्यामुळे, अशा चिंतामण वनगा यांचा वारस बनणे तितके सोपे नसून, त्यांचा खरा वारस संघर्षातूनच बनता येते, असे सूचक भाष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकरिता कासे-चारोटी नाका येथे घेतलेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री व आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, निवडणुकीतील भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित, खासदार कपिल पाटील, आमदार पास्कल धनारे, मनीषा चौधरी, किसन कथोरे, संजय केळकर, पराग आळवणी, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, श्रमजीवी संघटनेचे माजी आमदार विवेक पंडीत आदींसह भाजपचे असंख्य पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी पालघर निवडणुकीशी संबंधित चर्चा सुरू असलेल्या अनेक विषयांवर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले की, ही निवडणूक खरेतर आलीच नसती तरच खरा आनंद झाला असता. चिंतामण वनगा यांना श्रद्धांजली वाहताना फडणवीस म्हणाले की, पक्षनिष्ठा त्यांच्या ठायी ठायी होती. त्यामुळेच एखादी निवडणूक हरल्यावरही ते कधी निराश झालेले दिसले नाहीत. मला संघर्ष करायचा आहे, आणि तो भाजपद्वारेच करायचा आहे, हेच त्यांनी शेवटपर्यंत सांगितले.
 
श्रीनिवाससाठी ३१ मेपासून मातोश्रीचे दरवाजे बंद होतील !
चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेतर्फे ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या पोटनिवडणुकीत वनगा यांच्या परिवारातील कुणालातरी तिकीट द्यायचे, असे आमचे सर्वांचे मत होते. त्यादृष्टीने मी सर्वपक्षीयांशी बोललो होतो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही बोललो होतो. त्यापूर्वी जेव्हा शिवसेनेचे घोडा यांचे निधन झाले तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा दिला, मी स्वतः पालघरमध्ये मोठी सभा घेतली होती. त्यामुळे, यावेळी आमचा मित्रपक्ष अशीच मैत्री निभावेल असे वाटले होते. आमच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता. अशाप्रकारे शिवसेना समोरून आमचे स्वागत करत होती आणि पाठिमागून मात्र वार करत होती, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर टीका केली. जे झाले त्याबाबत मी वनगा कुटुंबियांना दोष देणार नाही. परंतु, आम्ही ज्यांना मित्र मानून त्यांच्या अडीअडचणींत साथ दिली, मदतीला धावून गेलो, त्यांनीच आमच्यावर पाठिमागून वार केल्याचे फडणवीस म्हणाले.
 
याच मुद्द्यावर ते पुढे म्हणाले की, श्रीनिवास यांना शिवसेनेकडून मिळालेले हे तिकीट चिंतामण वनगा यांना सहानुभूती म्हणून मुळीच मिळालेले नाही. ३१ मे रोजी पोटनिवडणुकीचा निकाल लागेल. तेव्हा श्रीनिवास नक्कीच पराभूत होतील. आणि जेव्हा ते पराभूत होतील तेव्हापासून 'मातोश्री'चे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद होतील, अशा शब्दांत त्यांनी श्रीनिवास वनगा यांना इशारा दिला. तसेच, चिंतामण वनगा हे आमचे कुटुंब होते, त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे दरवाजे श्रीनिवासला नेहमीच उघडे असतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 
मोदींची साथ लाभल्यास गावित परिवर्तन घडवू शकतील
चिंतामण वनगा यांच्याप्रमाणेच भाजपचे या निवडणुकीतील उमेदवार राजेंद्र गावित हेही संघर्षातून वर आलेले आहेत. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीचे श्रेय दोन व्यक्तींचे आहे. एक चिंतामण वनगा तर दुसरे गावित, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गावित यांची प्रशंसा केली. पालघरला देशाच्या मुख्य धारेत आणायचे असेल तर गावित, तुम्हाला येथील नेतृत्वाची धुरा सांभाळावी लागेल, असे सांगतानाच, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची साथ राजेंद्र गावित यांना लाभली तर ते या भागात परिवर्तन घडवू शकतील, असेही प्रतिपादन त्यांनी केले. या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार पराभूत झाल्यास चिंतामण वनगा कधीही आपल्याला माफ करू शकणार नाहीत. त्यामुळे, भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांचा विजय, हीच वनगा यांना खरी श्रद्धांजली असेल, अशा शब्दांत त्यांनी उपस्थित जनतेला भावपूर्ण साद घातली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणाला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वसामान्य नागरिक व पक्ष कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या प्रचारसभेदरम्यान पालघर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बहुजन विकास आघाडी अशा अनेक पक्षांतील शेकडो प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीरपणे भाजपमध्ये प्रवेश केला.