अनाम कलाकार

02 May 2018 12:53:19





कोणतीही चांगली गोष्ट पाहिल्यावर आपल्याकडे त्यातलं काय आहे ह्याची साहजिक तुलना आपल्या मनात का होईना होतेच. तो मानवी स्वभाव आहे.

कलेत तुलना ही कधी नसते. कारण दोन अधिक दोन चार हे गणिताचं स्टॅंडर्ड समीकरण तिकडे लागू होत नाही. प्रत्येक कलाकारांची कृती आपल्या जागी श्रेष्ठच असते.

सिस्टीन चॅपल आणि मायकलेंजेलोचं काम ह्यावर बरंच संशोधन झालं आहे. त्या अनुषंगाने त्याचे विचार, त्याची कामाची पद्धत ह्यावरही बराच प्रकाश पडलाय.

सिस्टीन चॅपलच्या इतकीच उत्तुंग चित्रं, शिल्प, मंदिरं, शेकडो देवळं आपल्याकडे आहेत. त्यामुळे कलाकृतींची तुलना झाली नाही तरी कुतुहल म्हणून कामाच्या पद्धतीची, त्याच्या विकासाची, त्याच्या प्रत्यक्ष अमलात आणायच्या पध्दतीची होऊ शकते.

मायकलेंजेलोच्या आठशे वर्षं आधी घडलेली अद्भुत अजंठा वेरूळची लेणी, दोनकशे वर्षं आधी घडवलेली विजयनगरातली शिल्प, काहीशे वर्षं आधी कोरलेलं मीनाक्षी मंदिर, अगदी आपल्या जवळचं अंबरनाथचं शिवमंदिर, हेमाडपंथी देवळं, पुरातन बौद्ध स्तूप, जैन मंदिरं हे सर्व अफाट काम कमीत कमी तंत्रज्ञान उपलब्ध असताना कसं केलं असेल?

मानवी शरीर, त्याची मापं, त्यातले बारकावे ह्यांचा फार गहन अभ्यास असल्याखेरीज इतकं सुंदर आणि इतकं मनमोहक काम अशक्य आहे. नैसर्गिक रूपातील मानवी देहाच्या सौंदर्यावर जगभरातल्या जवळपास सर्वच कलाकारांना मोहिनी घातली आणि त्याचं प्रकट स्वरूप त्यांच्या कामातून उमटलं.

हा सर्व अभ्यास करणाऱ्या अनेक कलासक्त पिढ्या त्या काळात आपल्याच देशात जन्माला आल्या असतील. वर्षानुवर्षे घोटून त्यांनी आपल्या हातावर अफाट कमांड मिळवली असेल.
 
मायकलेंजेलोला त्याच्या जिवंतपणी दैवी मानलं गेलं.

आपल्या भारतीय मूर्तिकारांमध्ये असा एखादा कलाकार त्याच्या हयातीत 'लेजेंड' म्हणून मानला गेला असेल. देशभरात, आजूबाजूच्या खंडात त्याची कीर्ती गाजली असेल.

 
अवघ्या पंचविसाव्या वर्षी मायकलेंजेलोने त्याचं 'पीएता' हे जगप्रसिद्ध शिल्प कोरलं. इतक्या लहान वयातला इतकाच प्रभावी कलाकार दैवी देणगी घेऊन आपल्याकडेही जन्माला आला असेल.

लिओनार्दो दा विंची हा जगप्रसिद्ध चित्रकार मायकलेंजेलोच्याच काळातला. लिओनार्दो मायकलपेक्षा २३ वर्षांनी मोठा. दोघेही आपापल्या क्षेत्रातले अनभिषिक्त सम्राट. पण त्यांच्यातही प्रचंड स्पर्धा होती. अशी स्पर्धा आपल्याकडेही त्यावेळी झाली असेल. समोर दिसणारी उत्तुंग शिल्प, उत्कृष्ठ चित्रं त्यावेळच्या कलाकारांच्या एकमेकांमधल्या स्पर्धेचा परिपाक असतील.

आजच्या काळात ग्राह्य धरली गेलेली एखादी मूर्ती त्याकाळी नवीन प्रयोग म्हणून लोकांना नवलाईची वाटली असेल. ती कल्पना कदाचित लोकांच्या पचनी पडली नसेल. लोकांपेक्षा राजसत्तेला ती मान्य न झाल्यास तेव्हाही खटके उडाले असतील. क्वचित प्रसंगी कलाकाराने आपलीच कल्पना पुढे रेटत हट्टाने शिल्पात चित्रात बदल केला नसेल.

'विस्तार में कलाकार होता है' असं म्हणतात.

इतकं डिटेल्ड काम कसं केलं असेल? त्याची स्केचेस केली असतील. मग तेव्हाचा चांगला कागद वापरला असेल. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होऊ शकतील हे बघताना 'ब्लु प्रिंट्स' जपून ठेवल्या असतील. एका कामाची दुसऱ्याने नक्कल करू नये म्हणून 'कॉपी राईट्स' हा प्रकार असेल का?

केलेली स्केचेस, आराखडा कोणत्या मापाने प्रत्यक्ष कामात उतरवला असेल? चित्रकार शिल्पकाराला नुसती रेखाटने करून चालत नाही तर त्याच्या मोठ्या स्वरूपात रूपांतरित करताना त्या 'थंबनेल'ची प्रतिकृतीदेखील तितकीच सुंदर होईल, चेहऱ्यावरचे भाव कुठेही बदलणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागते. हे सर्व शिक्षण त्या त्या कलाकारांनी त्याकाळच्या एखाद्या नामवंत गुरूकडून गुरुकुल परंपरेतुन घेतलं असेल. सर्व मूर्ती, स्केचेस करताना लाईव्ह मॉडेल्सदेखील कदाचित वापरली असतील. हत्तीपासून सर्व प्राण्यांची इतकी उत्कृष्ट अनाटॉमी करताना त्यांचीही मापं घेतली असतील. त्यांच्या कलेच्या शाळेत त्यांना हेही विषय असतील.

सर्व कलाकृती पूर्ण झाल्यावर एकत्रच त्यांचं अनावरण झालं असेल? की काम पूर्ण होत जाईल तसं ते लोकांसाठी खुलं केलं गेलं असेल?
 
कदाचित ह्या सर्व उद्घाटनाचा एखादा मोठा सोहळा झाला असेल. त्या त्या कलाकारांचा सत्कारही झालं असेल. गावोगावहून येणाऱ्या भाविकांच्या, पर्यटकांच्या, रसिकांच्या नजरेतल्या कौतुकाने सर्व कलाकारांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळाली असेल.

हजारपाचशे वर्षं सतत होत असलेली परकीयांची आक्रमणं फक्त धार्मिक अत्याचारापुरती मर्यादित राहिली नाहीत. त्यामध्ये सामाजिक, आर्थिक घडी जशी विस्कटली गेली त्याच प्रमाणे पारंपरिकरीत्या जोपासलेलं ज्ञान धुळीला मिळवलं. फक्त मूर्तींचा विध्वंस केला नाही तर त्याबरोबर कलांचाही विनाश केला.

शिल्पं आणि चित्र जशी कोण होते हे कलाकार? कुठेयत त्यांचे वंशज? कुठेयत त्यांनी केलेले आराखडे? त्यांच्या शोधलेल्या पद्धती? त्यांची कला?

श्रेय न घेता नामनिर्देश इत्यादींचा मागमूसदेखील मागे न ठेवण्याच्या संस्कारात महान परंपरांच्या कलाकारांच्या ओळखीला आपण मुकलो आहोत.
 
त्यामुळे ह्यापुढे कधीही भव्यदिव्य जे काही असेल त्याच्या अनाम कर्त्याला त्याचं श्रेय द्यायची जवाबदारी आपली असायला हवी.



- सारंग लेले
Powered By Sangraha 9.0