‘फिर उसी मोड पर’, ‘बॅक टू स्क्‍वेअर वन

    दिनांक  16-May-2018   
 
 
 

 
‘फिर उसी मोड पर’, ‘बॅक टू स्क्‍वेअर वन’ या चित्रपटाचा विशेष प्रयोग ‘कनिका मल्टीस्कोप प्राली’ ने ‘मुस्लीम राष्ट्रीय मंच’च्या कार्यकर्त्यांसाठी आणि सर्व समाजातील विचारवंतांसाठी दि. १४ मे रोजी महालक्ष्मी येथील ऑडिटोरियम फेमस स्टुडिओ येथे दुपारी ३ वाजता आयोजित केला होता. या प्रयोगाला इंद्रेशजी (अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, रा.स्व.संघ) हे उपस्थित होते. त्याचबरोबर विचारवंत आणि महिला समन्वयक (रा.स्व.संघ) गीताताई गुंडे, तसेच तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवणार्‍या विस्डम फाऊंडेशनच्या झिनत शौकत अली, मुस्लीम राष्ट्रीय मंचचे पदाधिकारी इरफान अली, शकिल हिंदुस्थानी, साजिद कुरेशी, असिफ कुरेशी, सिनेसृष्टीतले अनेक तारे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
फिर उसी मोड पर..’ चित्रपट. चित्रपटाच्या नावातच एक दुविधा आहे. एक खंत आहे. वळणावळणावरच्या आयुष्याने पुन्हा तेच तेच भोगवटे भोगायला लावण्याचे दुःख आहे. ते दुःख ‘स्त्री जन्मा तुझी कहाणी..’ म्हणत रडतखडत वेदना व्यक्‍त करते. त्या वेदनेला जेव्हा पुन्हा नव्याने नव्या जिवाला होणार्‍या वेदनेची जाणीव होते, तेव्हा वेदना साक्षात न्यायाची तलवार बनते आणि संघर्ष पुकारते. न जाणो, कित्येक शतकांपासूनच्या बर्बर, असंवेदनशील, अमानुष परंपरेविरुद्ध. जळालेल्या आयुष्याने जर कुणी हक्‍कासाठी उभे राहिले तर.. त्या हक्‍कासाठी लढणार्‍याच्या हृदयातली आग त्या जळालेल्या आयुष्यातही ध्येयाचे आणि न्यायाचे जीवन फुलवू शकते. होय, हे सर्व विवेचन लेख टंडन दिग्दर्शित ’फिर उसी मोड पर..’ चित्रपटासंबंधी आहे.
 
 
 
 
 
सुरुवातीपासून ‘फिर उसी मोड पर’.. चित्रपट चर्चेतच आहे. असणारच, कारण विषय आहे ’तिहेरी तलाक’चा. ’तिहेरी तलाक’ हा विषय असा आहे की, त्यात मुस्लीम भगिनी अक्षरशः पिसल्या जात आहेत. नेमक्या याच विषयावर या चित्रपटाची कथा बेतलेली. म्हणावं तर चित्रपट इतर हिंदी चित्रपटाच्या पठडीतलाच आहे, पण त्याचे वैशिष्ट्य असे की, धंदेवाईक हिंदी सिनेमाचा बाज सांभाळतानाच चित्रपटाने मुस्लीम भगिनींचे दुःख, तिहेरी तलाकमुळे मिळालेल्या वेदना, तिचा संघर्ष, तिचा लढा अत्यंत संयमितपणे मांडला आहे.
 
 
 
टिपिकल मुस्लीम धाटणीचे कपडे घातलेली एक स्त्री जिवाच्या आकांताने पळू पाहत आहे. तिला पाच-सहा गुंड गुरासारखे मारत आहेत. इतक्यात पोलिसांची गाडी येते. गुंड पळून जातात. ती कशीबशी समोरून येणार्‍या बसमध्ये चढते. विमनस्क अवस्थेत ती बसमधून उतरते. समोर नारळपाणीवाला मलई नारळ मोठ्या धारदार सुरीने सोलत असतो. ती वेगाने त्या नारळपाणीवाल्याकडे धावते. धारदार सुरा घेते आणि स्वतःच्या पोटात खुपसते. नारळपाणीवाला “अय्योरामा, अय्योरामा” करत नारळाची हातगाडी उलटवत त्या रिकाम्या हातगाडीवर त्या जखमी स्त्रीला म्हणजे नाझला टाकतो. नाझला घेऊन एका इस्पितळात येतो. हातगाडीवरची जखमी नाझ बेशुद्धीतही म्हणत असते, ”मला मरू द्या. मला नको आहे हे बाळ. आम्हाला मरू द्या. माझ्या पोटातल्या बाळासकट मला मरू द्या.” नाझ त्यावेळी चार महिन्यांची गरोदर असते, हे कळते. बाजूच्या खोलीत उपचार घेत असलेला रशिदही नाझचे मरणगाणे ऐकत असतो. रशीदला घरी सोडण्यात येते. पण घरी न जाता रशीद पळून पुन्हा इस्पितळात येतो आणि नाझला सांगतो, ”जीवन का संपवते आहेस? त्यांना जीवनाची किंमत विचार, ज्यांच्या वाट्याला कमी आयुष्य आले आहे,”असे सांगून तो नाझच्या होणार्‍या बाळाला पित्याचे नाव द्यायचे कबूल करतो. या गोष्टीला रशीदची आई तसेच मौलवी आणि समाज नकार देतो. त्यामागे कारण हेे की, इस्लाममध्ये गरोदर स्त्रीसोबत निकाह होऊ शकत नाही. तरीही रशीद नाझला आश्रय देतो. रशीदची आई प्रेमळ असते, पण शरियत कायद्यानुसार तिला वागायचे असते. त्यामुळे ती नाझला आणि रशीदला घरात घेत नाही. पुढे नाझ घरकाम वगैरे करून आर्थिक पाठबळ तयार करते. तिला मुलगा होतो. ती आता गरोदर नसते म्हणून रशीद आणि नाझ इस्लाम कायद्यानुसार लग्‍न करतात. इथेही कथा अशी आहे की, रशीदला दुर्धर जीवघेणा आजार असतो. अकाली मृत्यूनंतर आपल्या आईला कुणीतरी हक्‍काचे असावे म्हणून तो नाझ आणि नाझच्या मुलाला स्वीकारतो. इथे रशीदच्या आईचीही कथा आहे की, तिच्या नवर्‍याने ’तिहेरी तलाक’ उच्चारून तिला तलाक दिलेला असतो. तो दुसर्‍या स्त्रीसोबत जातो. ती वारल्यावर तो दुसर्‍या स्त्रीपासून झालेल्या अपत्यालाही वार्‍यावर सोडतो. त्या मुलाला रशीदची आई मुलासारखे सांभाळते. ’तिहेरी तलाक’च्या जाळ्यात तिचे आयुष्य जळून गेलेले आहे. 
 
 
 
 
 
पुढे एका वळणावर कळते की, नाझ एक चांगल्या घरची मुलगी असते. पण लहानपणीचा कौटुंबिक मित्र शाहिदच्या ती प्रेमात पडते. शाहिद चोरून लपून तिच्याशी निकाह करतो. ती गरोदर राहते. मात्र श्रीमंत शाहिदला आता ती नको असते. नाझचे वडील शाहिद आणि नाझला नको त्या अवस्थेत पाहतात आणि मानसिक धक्का बसून त्यांचे निधन होते. शाहिद अशा परिस्थितीत नाझला सोडून लोणावळ्याला आपल्या वडिलांकडे जातो. तिथे त्याचा दुसरा विवाह होणार असतो. नाझला हे कळताच ती तिथे जाते. त्याला निकाहनामा दाखवते. त्यावेळी उच्चशिक्षित शाहिद निकाहनामा फाडून ‘तलाक, तलाक, तलाक’ म्हणून तिला उद्ध्वस्त करतो आणि वर म्हणतो, ”मुस्लीम पुरूष चार विवाह करू शकतो.” तीन वेळा तलाक म्हटले म्हणजे ती तलाकशुदा असाहाय्य स्त्री होते. तिने आणखी आवाज उठवू नये म्हणून तिला मारले जाते. सुरुवातीला दाखविलेल्या दृश्यामागची ही कथा. नाझ, नाझची सासू (तिहेरी तलाकने होरपळलेली) या पार्श्‍वभूमीवर स्वार्थी वृत्तीचा मौलवी समाजातील तरुणांची नाझबाबत माथी भडकवतो. कारण नाझने मौलवीचेे पितळ उघडे पाडलेले असते. कालांतराने रशीद मरतो. रशीदला वचन दिल्याप्रमाणे नाझ ज्युनिअर रशीदला आयआयटी इंजिनिअर बनवते. त्याचेही लहानपणीच्या मैत्रिणीसोबत सूत जुळते. तिच्याशी तो लग्‍न करतो. उच्चशिक्षित ज्युनिअर रशीद दुबईला सपत्नीक जातो. त्याची पत्नी गरोदर राहते, त्याचवेळी ज्युनिअर रशीद त्याच्या विदेशी सेक्रेटरीच्या जाळ्यात अडकतो. ज्युनिअर रशीदला मुलगा होतो. अशावेळी सेक्रेटरी ज्युनिअर रशीदला धमकी देते की, त्याने तिच्याशी विवाह करावा; अन्यथा ती सरकारी कार्यालयात त्याची तक्रार करेल. मग त्याची नोकरी जाईल. वर असेही म्हणते की, मुस्लीम पुुरुष चार लग्‍न करू शकतात. तुलाही माझ्याशी लग्‍न करावे लागेल. ज्युनिअर रशीदही तिच्या जाळ्यात अडकलेला असतो. तो पत्नीला भारतात परत पाठवतो आणि दुबईहून टपालाद्वारे कागदावर ’तलाक,तलाक,तलाक’ असे लिहून कळवतो. हा एक अनपेक्षित धक्‍का असतो. नाझला जेव्हा हे कळते तेव्हा तिच्या पायाखालची वाळू सरकते. ती म्हणते तलाक देऊन शाहिदने तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले, आता मुलगा सुनेचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. शाहिदला सोडले पण मुलाला सोडणार नाही आणि नाझ न्यायालयाचे दरवाजे ठोठावते. तिने ’तिहेरी तलाकला’ विरोध केला म्हणून समाजातले काही लोक आणि मौलवी आक्रमकरित्या विरोध करतात. इथेच सिनेमा नाट्यमय वळण घेतो. न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नेमका येतो तो नाझला ’तिहेरी तलाक ’देणारा शाहिद. तसेच मुस्लीम समाजातली ज्येष्ठ व्यक्‍ती म्हणून ’तिहेरी तलाक’ योग्य की अयोग्य याची शहानिशा करायला येतो, तो नाझच्या सासूला ’तिहेरी तलाक’ देणारा तिचा पती. ’तिहेरी तलाक’ योग्य कसा यावर बरीच खलबते होतात आणि शाहिद निर्णय द्यायला सरसावतो की, ज्युनिअर रशीदने अगर तीन वेळा ’तलाक’ लिहिले आहे तर ’तलाक’ मंजूर आहे. शरियतच्या पुढे कसे जाणार? याचवेळी बुरख्याआड असलेली नाझ न्यायालयाला विनंती करते की, तिला बोलायचे आहे. पण केस ऐकायला आलेले मौलवी, त्यांचे सोबती गोंधळ घालतात की, शरियतनुसार महिला ’तिहेरी तलाक’बद्दल बोलू शकत नाही. मात्र कोणालाही न जुमानता नाझ न्यायालयात आपली कहाणी सादर करते. ”तिहेरी तलाक हा स्वार्थी लोकांच्या स्वार्थासाठीचा उपचार आहे. जर २२ देशांत त्यातही कट्टर मुस्लीम देशांत ’तिहेरी तलाक’ला बंदी आहे तर आपल्याकडे का नाही?,” असे ती विचारते. तसेच ”शरियतच्या कायद्याचा अर्थ चुकीचा लावला गेला आहे. मुस्लीम धर्म आणि त्याचे कायदे माणसासाठी आहेत,” हे सांगताना ती शरियतचे विविध कायदे अर्थासकट सोप्या भाषेत उलगडते.”अल्‍लाहचा न्याय आणि त्याने दिलेला कायदा माणसासाठीचा आहे. तो स्त्री-पुरुष सर्वांसाठी आहे,” असे ती भावनातिरेकाने निक्षून सांगते. जज शाहिद तिच्या खुलाशाने हतबल होतो, तर ज्युनिअर रशीदला त्याची चूक कळते की, त्यानेही ’तिहेरी तलाक’ हा केवळ शब्द वापरून एका स्त्रीचे भावविश्‍वच उद्ध्वस्त केले आहे. तो पुन्हा आजी, आई आणि पत्नीकडे परततो. एक वर्तुळ पूर्ण होते. त्या वर्तुळात नाझ आपल्यावर झालेल्या अन्यायाला शेवटी का होईना जाब विचारते. 
 
 
 
या चित्रपटामधून ’तिहेरी तलाक’ला विरोध करणार्‍यांची पोल खोलण्यात आली आहे. धर्माच्या नावावर पुरुषी अहंकार जोपासणार्‍यांना न्यायाच्या दरबारात खेचले आहे. त्याचवेळी शरियतचा न्याय हा मानवतापूर्ण आहे. असे असूनही त्या न्यायाला स्वार्थासाठी स्त्री-पुरुषांमध्ये विभागणारे, तसेच मुस्लीम भगिनींच्या आयुष्याला ’तिहेरी तलाक’च्या रूढीने नरकयातना देणारे हे अल्‍लाहचे गुन्हेगार आहेत, हे ’फिर उसी मोड पर’.. हा चित्रपट अनाहूतपणे सांगून जातो. मुळात हा चित्रपट पाहताना कुठेही वाटत नाही की, यामध्ये ’तिहेरी तलाक’ कायद्याबाबत जागृतीचे प्रयोजन आहे, पण तरीही नाझ ’तिहेरी तलाक’ हा शरियत कायद्याच्या विरोधात असून ’तिहेरी तलाक’ला विरोध झालाच पाहिजे, या भावनेने उभी राहते. त्यावेळी प्रेक्षागारातला प्रेक्षक स्वतःच्या नकळत पाणावलेले डोळे पुसतो आणि टाळ्यांचा कडकडाट करतो. संपूर्ण मुस्लीम वातावरणात, संस्कृतीचा वेध घेत हिंदू मुस्लीम समाजाचे स्नेहसंबंध प्रकाशमान करणार्‍या ’फिर उसी मोड पर’ या सिनेमाचे हेच यश आहे. हा सिनेमा मनोरंजनासोबतच भावविश्‍वाचे मानवी न्यायाचेही दरवाजेही खुले करतो.
 
 
नाझच्या भूमिकेत जिवीधा आष्टा, रशीदच्या भूमिकेत कंवलजीत, शाहिदच्या भुमिकेत परम सेठी, ज्युनिअर रशीदच्या भूमिकेत कैफ खान, रशीदच्या आईच्या भूमिकेत विनिता मलिक, नाझच्या सुनेच्या भूमिकेत शिखा इटकान, इतर भूमिकेत एमएस जहिर, गोविंद नामदेव, स्मिता जयकर, कनिका बाजपेयी, राजीव वर्मा, भारत कपूर, अरूण बाली, हैदर अली, संजय बत्रा यांनी भूमिकेत रंग भरले आहेत. 
 
 
-योगिता साळवी