भाजपच्या दक्षिण प्रवेशाचे अण्णाद्रमुकतर्फे स्वागत..!!

15 May 2018 14:57:06

 
 
भारतीय जनता पक्षाला कर्नाटकात मिळालेल्या प्रतिसादानंतर सगळीकडूनच कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. याच मालिकेत दक्षिण भारतातील प्रमुख राजकीय पक्ष अण्णाद्रमुकने देखील भाजपच्या दक्षिण प्रवेशाचे स्वागत केले आहे, ही मोठी बाब मानली जात आहे. अण्णाद्रमुक पक्षाचे नेते आणि तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी भाजपला दक्षिण प्रवेशाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
ओ. पन्नीरसेल्वम यांनी याबाबत भाजपला पत्र लिहिले आहे. त्यात नमूद केले आहे की, कर्नाटक निकालाच्या उत्साही वातावरणात मी भारतीय जनता पक्षाला माझ्या शुभेच्छा आणि अभिनंदन देतो. भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जो ऐतिहासिक विजय मिळवला आहे, तो भाजपचा दक्षिण भारतातील प्रवेश आहे.
 
 
अण्णाद्रमुक पक्ष तसा दक्षिण भारतातील एक महत्वाचा पक्ष आहे, त्याचबरोबर तामिळनाडूत आगामी विधानसभा निवडणुकीत थेट भाजपच्या पाठींबा असलेल्या पक्षाशी लढणार आहे, तरी देखील ओ. पन्नीरसेल्वम यांनी भाजपच्या दक्षिण प्रवेशाचे स्वागत केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचबरोबर एखाद्या राष्ट्रीय पक्षाचे अण्णाद्रमुकने कौतुक करणे देखील तसा राजकीय विश्लेषकांना न खपणारा विषय मानला जातो.
 
 
 
Powered By Sangraha 9.0