शरीफांच्या वक्तव्यांचा माध्यमांनी चुकीचा अर्थ घेतला : पाक पंतप्रधान

    दिनांक  14-May-2018

एनएससी आणि शरीफ यांच्या भेटीनंतर अब्बासी यांची माहिती
इस्लामाबाद : नवाज शरीफ यांनी डॉन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचा भारतीय माध्यमांकडून पूर्णपणे चुकीची अर्थ घेतला गेला आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाक्न अब्बासी यांनी दिली आहे. तसेच पाकिस्तानच्या भूमीचा उपयोग कोणत्याही देशाविरोधात न करण्याचा पाकिस्तानचा संकल्प असून पाकिस्तान आपल्या संकल्पाचे नेहमी काटेकोरपणे पालन करत आलेला आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानच्या प्रसार माध्यमांच्या माहिती नुसार, पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीने अब्बासी यांची आज सकाळी भेट घेतली. या भेटीनंतर इस्लामाबाद येथे खास सरकारी माध्यमांसाठी म्हणून एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये कोणत्याही खासगी वृत्तवाहिनीच्या कॅमेरा टीमला परवानगी दिली गेली नव्हती. फक्त काही निवडक प्रतिनिधींना मात्र परवानगी देण्यात आली होती. यावेळी बोलताना त्यांनी शरीफ यांच्या वक्तव्याचा पूर्णपणे गैरअर्थ घेण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. परंतु शरीफ यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय होता ? हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.

तसेच 'हीच' गोष्ट स्वतः नवाज शरीफ का माध्यमांसमोर बोलत नाहीत, या पत्रकारांच्या प्रश्नाला देखील उत्तर देणे त्यांनी टाळले. शरीफ किंवा इतर कोणी सांगितले म्हणून मी ही पत्रकार परिषद करत नसून माध्यमांच्या गैरसमजामुळे शरीफ यांचा वक्तव्याचा जागतिक राजकारणात देखील चुकीचा अर्थ जात आहे. त्यामुळे देशाच्या प्रतिमेचे रक्षण करण्यासाठी म्हणून शरीफ यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आपण ही परिषद स्वतःच्या मनाने घेत असल्याचे त्यांनी म्हटले.
 

दरम्यान अब्बासी यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ मात्र कोणालाच लागत नाही. स्वतः पाकिस्तानी माध्यम देखील अब्बासी यांच्या या वक्तव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. राष्ट्र सुरक्षा समितीने शरीफ यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आणि त्यानंतर अब्बासी यांची भेट घेतली. एनएससीने स्वतः यावर अपेक्षा घेतला असताना आणि शरीफ यांच्या वक्तव्याचे पुरावे उपस्थित असताना देखील अब्बासी हे असे वक्तव्य करूच कसे शकतात ? असा प्रश्न माध्यमांकडून विचारला जात आहे. तसेच पत्रकार परिषदेमध्ये निवडक माध्यम प्रतिनिधींना दिलेल्या प्रवेशाचा काय अर्थ घ्यायचा ? असा देखील प्रश्न माध्यमे विचारात आहेत.