पश्तून नागरिकांचा पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधात यल्गार

    दिनांक  14-May-2018

लाखोंच्या संख्याने पश्तून नागरिकांचा मोर्चा कराचीमध्ये दाखल


कराची : खैबर-पख्तूनस्थानमध्ये पाकिस्तान सैनिकांकडून होणाऱ्या हिंसाचारविरोधात पश्तून नागरिकांनी पुन्हा एकदा पाकिस्तान सरकारविरोधात यल्गार पुकारला आहे. पाकिस्तानच्या तावडीतून ख़ैबर पख़्तूनख़्वा प्रांताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखोंच्या संख्याने पख्तून नागरिक कराचीमध्ये दाखल झाले असून गेल्या दोन दिवसांपासून याठिकाणी पाकिस्तान सरकारविरोधात निदर्शने केली जात आहेत.

पश्तून तहफुझ मुव्हमेंट या संघटनेच्या नेतृत्वाखाली या आंदोलनचे आयोजन करण्यात आले आहे. ख़ैबर-पख़्तूनख़्वा प्रांताच्या विविध भागातून अगोदर मोठ्या प्रमाणात मोर्चाचे आयोजन या संघटनेकडून करण्यात आले होते. पख्तून प्रांतातील हजारो नागरिक या मोर्चांमध्ये सहभागी झाले होते. यानंतर हे मोर्चे थेट कराचीच्या दिशेने निघाले व काल रात्री ते कराचीमध्ये पोहचले. पीटीएम संघटनेकडून भली मोठी सभा घेण्यात आली. यामध्ये पाकिस्तान सैन्येकडून ख़ैबर पख़्तूनख़्वा प्रांतात सुरु असलेल्या अत्याचाराविरोधात सरकारला जाब विचारण्यात आला. तसेच पाकिस्तान सरकारने पश्तून नागरिकांना त्यांचा हक्क परत द्यावा, अशी मागणी करण्यात आली. 
 
दरम्यान गेल्या महिन्यात देखील पख्तून नागरिकांकडून अशाच प्रकारच्या या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पाकिस्तान लष्कराच्या हिंसाचार विरोधात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देखील ख़ैबर पख़्तूनख़्वा प्रांताच्या स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली होती. परंतु पाकिस्तान सरकारने तेव्हा देखील याकडे दुर्लक्ष केले होते.