स्वराज यांनी घेतली म्यानमार नेत्यांची भेट

    दिनांक  11-May-2018


नेपिडो : भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज आपल्या म्यानमार दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्यानमारच्या राज्य सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री आंग सान स्यू की यांच्यासह अनेक म्यानमार नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये भारत आणि म्यानमार यांच्यात गेल्यावर्षी झालेले प्रमुख करार, दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध आणि सीमासुरक्षा याविषयावर स्वराज यांनी चर्चा केली.

म्यानमार राष्ट्रपतींच्या भेटीनंतर आज सकाळी स्वराज यांनी प्रथम स्यू की यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्यानमार भेटी दरम्यान दोन्ही देशांमध्ये झालेल्या ७ करारांवर यावेळी स्वराज यांनी चर्चा केली. तसेच या करारांसंबंधीच्या गोष्टींचा आढावा घेतला. यानंतर म्यानमारचे लष्कर प्रमुख जनरल मिन आंग हलांग यांची भेट घेतली. भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांच्या सीमेवरील सुरक्षा व्यवस्था आणि दोन्ही देशांमधील सैनिकी करारसंबंधी त्यांनी हलांग यांच्याशी चर्चा केली. तसेच म्यानमारच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली सर्व मदत भारत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.