आता विमानात देखील मिळणार मोबाईल नेटवर्कच्या सुविधा

01 May 2018 18:37:51


 
नवी दिल्ली : विमान उड्डाणांच्या दरम्यान मोबाईल नेटवर्क वापरा संबंधीच्या सरकारच्या प्रस्तावाला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने हिरवा कंदील दाखवला आहे. विमान प्रवास करत असताना प्रवाश्यांना मोबाईल कॉल तसेच इंटरनेट सेवेचा वापरत करता यावा विमान कंपन्यांच्या विनंतीला ट्रायने मंजुरी दिली असून येत्या काही दिवसांमध्ये प्रवाशांना या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.


आज दुपारी झालेल्या ट्रायच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला ट्रायने मंजुरी दिली आहे. सरकारने दाखल केलेल्या प्रस्तावावर चर्चा करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व विमान प्रवासांमध्ये ही सेवा सुरु करण्याला मंजुरी दिली. परंतु ही मंजुरी सशर्त असून या दोन्ही वापरण्यासाठी प्रवाशांना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे ट्रायने म्हटले आहे. ज्यातील सर्वात पहिला नियम म्हणजे विमान ३ हजार फुट उंचीवर गेल्यानंतरच या दोन्ही सुविधांचा वापर प्रवाशांना करता येईल, असे ट्रायने स्पष्ट केले आहे. तसेच आणखी काही किरकोळ अटी सांगत ट्रायने याला मंजुरी दिली आहे.



दरम्यान केंद्रीय विमान मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्रायच्या या निर्णयाचे स्वागत करत, यामुळे भारतीय विमान कंपन्यांना आणि प्रवाशांना मोठा फायदा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. प्रवाशांना उत्तम सेवा देणे हे सरकारचे ध्येय आहे. ट्रायच्या या निर्णयामुळे प्रवासादरम्यान होणारी प्रवाशांची अडचण आता दूर होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांशी भारतीय कंपन्यांना स्पर्धा करता येणार आहे. त्यामुळे येत्या ३ महिन्यांच्या आत ही सुविधा सर्व विमानांमध्ये सुरु करण्यात येईल, असे देखील प्रभू यांनी म्हटले आहे.

Powered By Sangraha 9.0