जगातली पहिली महिला रिव्हर पायलट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2018   
Total Views |
 
 
रेश्माच्या या यशामुळे ज्या ज्या क्षेत्रांत महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत त्यात आणखी एकाची भर पडली आहे. विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे जगातली पहिली महिला रिव्हर पायलट होण्याचा मान तिला मिळाला आहे.
 
आता असं कुठलंच क्षेत्र राहिलेलं नाही, ज्या क्षेत्रात महिला कार्यरत नाहीत. शिक्षण, राजकारण, उद्योग, समाजसेवा अशा सगळ्याच क्षेत्रांत आता महिला पुरुषांच्या बरोबरीने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. आजची महिला वैमानिकच नव्हे, तर अंतराळवीरही झाली आहे. एका क्षेत्रात मात्र अजूनपर्यंत महिलांचा प्रवेश झाला नव्हता, तो रेश्मा निलोफर नाहाच्या रूपाने झाला आहे. ते क्षेत्र म्हणजे नदीमधलं नौकाचालन. चेन्नईची रेश्मा निलोफर नाहा ही जगातली अशी पहिली रिव्हर पायलट ठरली आहे. ‘कोलकाता पोर्ट ट्रस्ट’ मध्ये तिची नौकाचालक म्हणून नेमणूक झाली आहे. सहा महिन्यांनंतर ती समुद्रातून ’कोलकाता पोर्ट ट्रस्ट’ बंदरापर्यंत २२३ किलोमीटरचं नौकाचालन करेल ज्यामध्ये १४८ किमीचं अंतर हे हुगळी नदीतून पार केलं जाईल. कुठलंही जहाज समुद्रात बंदरापासून एका ठराविक अंतरावर आलं की, रिव्हर पायलट त्याचा ताबा घेतो आणि ते बंदरापर्यंत आणण्याची जबाबदारी त्याची असते. कोलकाता पोर्ट ट्रस्टमध्ये असे एकूण ६७ नौकाचालक आहेत. रेश्मा ही पहिली महिला रिव्हर पायलट ठरणार आहे.
 
रेश्मा ही मूळची चेन्नईची. रांचीमधील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून तिने सागरी तंत्रज्ञान (मरिन टेक्नॉलॉजी) या विषयात अभियांत्रिकीची पदवी मिळवली. तिने एक वर्ष छात्रसैनिक म्हणून काम केलं होतं, ज्यामध्ये तिने सहकार्‍यांबरोबर छोटी छोटी दोन जहाजं चालवण्याचा अनुभव घेतला. २०११ साली ’कोलकाता पोर्ट ट्रस्ट’मध्ये तिची नेमणूक झाली. त्यानंतर तिने नौकाचालकासाठीची ‘ग्रेड ३-पार्ट १’ ही परीक्षा दिली आणि त्यात ती उत्तीर्ण झाली. यामुळे आता ती ‘ग्रेड ३’ या स्तरावरची महिला नौकाचालक होण्यास पात्र झाली आहे. पुढील सहा महिन्यांत ती प्रत्यक्ष नौकानयनाला सुरुवात करेल. जहाजाच्या आकारानुसार नौकाचालनाचे स्तर असतात. म्हणजे ‘ग्रेड ३’ स्तरावरच्या चालकांना सुरुवातीला छोटी जहाजं चालवायला दिली जातात. त्यानंतर जसजसा अनुभव वाढत जातो, तसतसं टप्प्याटप्प्याने ‘ग्रेड २’ आणि ‘ग्रेड १’ स्तरावरची मोठी जहाजं चालवायला दिली जातात. ‘ग्रेड १’ स्तरावरची जहाजं खूप अवाढव्य असतात. त्यांची लांबी सुमारे तीनशे मीटर लांब असते आणि त्यांची सुमारे ७० हजार टन वजन पेलण्याची क्षमता असते. रेश्मा या स्तरापर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे, असा ’कोलकाता पोर्ट ट्रस्ट’च्या सागरी विभागाच्या संचालकांचा विश्वास आहे.
 
महिला जर विमान चालवू शकतात, अंतराळवीर होऊ शकतात, तर रिव्हर पायलट का होऊ शकत नाहीत? अर्थात, ही तिन्ही क्षेत्रं तितकीच खडतर आणि आव्हानात्मक असली तरी प्रत्येकासाठी लागणारी कौशल्ये वेगवेगळी असतात. जहाज चालवणं ही सोपी गोष्ट नाही. कारण, जलमार्ग हा धोकादायक मार्ग असतो. जहाजांना एक विशिष्ट मार्ग दिलेला असतो, त्या मार्गावरूनच जहाज हाकावे लागते. यात समुद्री लाटा आणि वार्‍याची बदलती दिशा यांचा खूप मोठा अडथळा असतो. जहाजाची दिशा थोडीशी जरी बदलायची असेल, तरी खूप विचार करावा लागतो. बारीकशी चूक मोठा अपघात घडवू शकते. मात्र, तिची पात्रता जोखूनच तिला या कामासाठी नियुक्त केलं गेल्याचं तिच्या वरिष्ठांनी सांगितलं आहे.
 
घरी आईवडील, भावंडं, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींकडून मिळालेला भक्कम पाठिंबा ही आपल्या यशाची गुरुकिल्ली असल्याचं रेश्मा सांगते. ‘करिअर म्हणून कुठली तरी सर्वसामान्य नोकरी करायची नाही, इतर मुली जे करत नाहीत, तसं काहीतरी आश्चर्यकारक आपल्या आयुष्यात करून दाखवायचं,’ अशी तिची लहानपणापासूनची महत्त्वाकांक्षा होती. ‘‘पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपल्याला कसं यावसं वाटलं?’’ असं एका मुलाखतीत विचारलं असता ती म्हणाली, ‘‘विशिष्ट क्षेत्राला ‘पुरुषांचं क्षेत्रं’ असं लेबल लावणं हेच चुकीचं आहे; त्या क्षेत्रात महिला येत नाहीत म्हणून ते ‘पुरुषांचं’ राहतं.’’ ‘‘सागरी क्षेत्रात काम करणं महिलांच्या दृष्टीने सुरक्षित आहे का?’’ असं विचारलं असता रेश्मा म्हणते, ‘‘महासागरात पोहणं हे अशक्य कोटीतलं वाटत असलं तरी अलीकडे सुरक्षेची अनेक चांगली चांगली आधुनिक साधनं उपलब्ध झाली आहेत; त्यामुळे सुरक्षितता हा फार गंभीर मुद्दा राहिलेला नाही.’’
 
रेश्माच्या या यशामुळे ज्या ज्या क्षेत्रांत महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. त्यात आणखी एकाची भर पडली आहे. विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे जगातली पहिली महिला रिव्हर पायलट होण्याचा मान एका भारतीय स्त्रीला मिळाला आहे. रेश्माचं उदाहरण हे समस्त भारतीय युवा महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारं आणि एक नवी दृष्टी देणारं आहे.
 
 
 
- हर्षद तुळपुळे 
@@AUTHORINFO_V1@@