धनगर आरक्षणाबाबत सरकारने फसवणूक केली : राष्ट्रवादी

    दिनांक  06-Apr-2018

 
महुद (सोलापूर) : मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन भाजपने दिले होते. अद्यापही आरक्षण दिले गेलेले नाही. आरक्षण तर सोडाच; कागदावर धनगर शब्द लिहिण्याचे धाडसही या सरकारमध्ये नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. पक्षातर्फे सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या सोलापूर जिल्ह्यातील महुद येथील सभेत ते आज बोलत होते.
 
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लाबोल आंदोलनामुळे तरुणांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आमच्यासोबत रस्त्यावर उतरत आहे. भाजपने अनेक आश्वासने दिली होती. मात्र, आश्वासनांची पूर्तता करण्यास या सरकारला यश आले नाही. भाजपचे सरकार धर्माच्या नावावर राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
 
 
या मतदारसंघाने शरद पवार यांना निवडून दिले. पोटच्या पोराप्रमाणे पवार साहेबांनी या भागाची काळजी घेतली. येथील शेतकऱ्यांना समृद्ध केली. येथील शेतकऱ्यांना जमेल ती मदत केली. मी उर्जा मंत्री असताना या भागात अजितदादांच्या सांगण्यावरून मोठ्या प्रमाणात वीज देण्यात आली. गेली १५ वर्षे अत्यंत निस्वार्थीपणे या भागाची सेवा केली, असे तटकरे यावेळी म्हणाले. अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र यायला हवे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
 
 
 
 सोलापूर विद्यापीठाला अजूनही अहिल्याबाईंचे नाव दिले नाही : अजित पवार
 
हे सरकार शेतकऱ्यांच्या पिकांची काळजी घेत नाही. पॅकेजिंग, मार्केटिंग यावर लक्ष दिले जात नाही. काकडी, शिमला मिर्ची याला तुटपुंजा भाव दिला जातो. फळ पिकांना भाव नाही. सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची मागणी होती. सरकारने तसे आश्वासनही दिले होते, मात्र अजूनही नाव दिले जात नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत. तरुणांचे प्रश्न सोडवले जात नाहीत. राज्य सुरळीत चालवण्यासाठी सरकार काहीच करत नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली.
 
 
 
मोठ्या उद्योगपतींवर मोठे कर्ज आहे. सगळे पैसे बुडीत खाती जाईल की काय अशी भीती आहे. सरकार या मोठ्या लोकांवर काहीच कारवाई करत नाही. पण शेतकऱ्यांनी थोडे पैसे बुडवले, तर त्यांची मालमत्ता जप्त केली जाते. भाजपचे रावसाहेब दानवे म्हणतात शेतकऱ्यांच्या पायावर गोळ्या मारायला हव्यात. अशा मस्तवाल सरकारला भानावर आणण्यासाठीच हे हल्लाबोल आंदोलन आहे, असे पवार यावेळी म्हणाले.
 
 
उजनी धरणात सध्या पाणी आहे. सरकारने या पाण्याचे योग्य नियोजन करायला हवे. पण सरकार तसे करताना दिसत नाही. हे सरकार खतावर जीएसटी लावत आहेत. शेतकऱ्यांची यांना काही किंमत नाही. महागाई वाढत आहे, पण शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्याचे काम सरकार करत नाही. शेजारच्या राज्यात लिंगायत समाजाला न्याय दिला जातो. मग आपल्या राज्यात मुख्यमंत्री या समाजाच्या मागण्या मान्य का करू शकत नाहीत? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला.