अजितदादांवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही : धनंजय मुंडे

    दिनांक  06-Apr-2018

गांडूळ म्हटले म्हणून उद्धव ठाकरेंना राग आला : धनंजय मुंडे


 
 
महुद (सोलापूर) : मुंबईचा कारभार २५ वर्षे शिवसेनेकडे आहे. काय अवस्था करुन ठेवली आहे मुंबईची? पुणे शहर हे दादांकडे होते. पुण्याचा बघा कसा विकास केला आहे. त्यामुळे दादांवर टीका करण्याची लायकी यांची नाही, अशा परखड शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंची कान उघडणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनादरम्यान सोलापूर जिल्ह्यात महुद येथे झालेल्या सभेत ते आज बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पक्षाचे विधिमंडळ गटनेते अजित पवार उपस्थित होते.
 
 
 
उद्धव ठाकरेंनी ‘सामना’तून अजित पवारांवर टीका केली. यांना गांडूळ म्हटले तर यांना राग आला. उद्धव ठाकरे कित्येक वेळा म्हणाले की आम्ही सत्तेला लाथ मारू, पण अजून लाथ मारली नाही. मी उद्धव ठाकरे यांना लाथ मारणारे जनावर भेट देणार आहे, जे शिवसेनेला शिकवेल लाथ कशी मारायची, असे मुंडे यावेळी म्हणाले. शेतकरी एवढा हवालदिल झाला आहे की स्वतःच स्वतःच्या पिकांचे नुकसान करत आहे. या सरकारला शेतकऱ्यांची जाणच नाही. कारण या सरकारमध्ये एकही शेतकऱ्याची औलाद नाही, असे म्हणत मुंडे यांनी भाजप - सेना युती सरकारवर ताशेरे ओढले.
 
 
 
आज भाजपचा स्थापना दिवस मुंबईत साजरा केला जात आहे. यांनी खरे तर एक एप्रिलला स्थापना दिन साजरा केला पाहिजे. कारण यांनी देशवासियांची फसवणूक केली आहे अशी टिका मुंडे यांनी भाजपवर केली. नोटाबंदीचा निर्णय चुकला, हे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळले; तेव्हा यांनी कॅशलेस भारतचा प्रचार केला. एखाद्या शेतकऱ्याला गाय-बैल विकत घ्यायचा असेल, तर कॅशलेस व्यवहार कसा करता येईल? काय बैलाच्या शिंगात कार्ड स्वाईप करायचे का? जी फसवणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेवेळी केली, तीच फसवणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या वेळी राज्यातील जनतेची केली.