याला न्याय म्हणावे का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2018   
Total Views |

 
 
 
१९९८ साली हम साथ साथ है हा चित्रपट खूप गाजला. हा सिनेमा गाजण्याचे कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले दिग्गज कलाकार, त्यांचा उत्तम अभिनय हे तर होतेच. मात्र त्याव्यतिरिक्त एक कारण होते, ते म्हणजे काळवीट शिकार प्रकरण. या प्रकरणाचा अखेर २० वर्षांनंतर निकाल लागला आणि अभिनेता सलमान खान याला दोषी जाहीर करण्यात आले आणि त्याला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र हा निकाल जाहीर करण्यासाठी न्यायालयाला तब्बल २० वर्षे लागली. आणि आता देखील या शिक्षेपासून वाचण्याचे अनेक मार्ग सलमान जवळ आहेतच. त्यामुळे या न्यायाला न्याय म्हणता येईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
भारतात केवळ हे एकच असे प्रकरण नाहीये. सलमान खानच्या निमित्ताने अशा अनेक प्रकरणांची आज आपल्याला आठवण येते ज्यामध्ये न्याय मिळायला इतका उशीर झाला की त्याला न्याय तरी म्हणायचा का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
भोपाळ वायु दुर्घटना :
 
भोपाळ गॅस काण्डच्या नावाने कुप्रसिद्ध झालेली ही घटना त्याकाळी भोपाळचा आणि एकूणच देशातील कुणीही व्यक्ती विसरू शकत नाही. २-३ डिसेंबर १९८४ च्या मध्यरात्री भोपाळ येथील सूनियन कार्बाईड कंपनीच्या कारखान्यात मिथाइल आयसो सायनाइट या अत्यंत विषारी वायुची गळती झाली. युनियन कार्बाईड इंडिया लि. हा एकोणीसशे सत्तरच्या दशकात भोपाळमधला एक महत्त्वाचा प्रकल्प होता. अमेरिकन मल्टिनॅशनल कंपनीची ही भारतातील सबसिडियरी. इथे ‘सेव्हिन’ (कार्बारिल) नावाचे एक कीटकनाशक मिथाईल आयसोसायनाइट (एमआयसी) व इतर काही द्रव्यांपासून बनविले जात असे. या घटनेत सुमारे १५ हजार लोक मृत्युमुखी पडले. आणि असंख्य लोकांना आयुष्यभरासाठी शारीरिक व्याधी निर्माण झाल्या. या घटनेक संपूर्ण दोष कंपनीचा होता. मात्र यामध्ये दोषी असलेल्या लोकांना शिक्षा सुनावण्यात तब्बल २६ वर्षांचा कालावधी लोटला. अखेर २६ वर्षांनंतर म्हणजे ७ जून २०१० रोजी या प्रकरणात दोषी असलेल्या कंपनीच्या प्रमुख ८ अधिकाऱ्यांना २ वर्षांच्या तुरुंगवासाची तसेच १ लाख रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा या ८ अधिकाऱ्यांपैकी एकाचा आधीच मृत्यु झाला होता. तसेच यामुळे भोपाळ येथील नागरिकांच्या कितीतरी पिढ्या नष्ट झाल्या. त्यांचे काय? २६ वर्षांनंतर मिळालेला न्याय त्यांच्यासाठी खरंच न्याय होता का?
 
 
 
 
 
 
१९९३ मुंबई बॉम्ब स्फोट :
 
१९९३ मध्ये मुंबई येथे झालेल्या बॉम्बस्फोटांचा विषय निघाला की आजही मुंबईकरांच्या अंगावर काटा येतो. १२ मार्च  १९९३ रोजी मुंबई येथे ठिकठिकाणी साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले. यामध्ये सुमारे २५० लोक मृत्युमुखी पडले तर ७१३ लोक जखमी झाले होते. तसेच एकूण २७ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली. मात्र या घटनेसाठी दोषी असलेल्या नराधमांना शिक्षा झाली ती तब्बल २० वर्षांनंतर २१ मार्च २०१३ रोजी टायगर मेमन याचा भाऊ दहशतवादी याकूब मेमन याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तसेच या प्रकरणात अभिनेता संजय दत्तला देखील शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर याकूब मेमनला फाशी होवू नये यासाठी देखील मेमन आणि इतर अनेक लोकांनी प्रयत्न केले, प्रदर्शने झाली. मात्र अखेर ३० जुलै २०१५ रोजी याकूब मेमनला फाशी देण्यात आली. बॉम्ब स्फोटासारख्या भीषण गुन्ह्यासाठी शिक्षा व्हायला २० वर्षे लागली.
 
 
 
 
 
उपहार सिनेमागृह प्रकरण :
 
दिल्ली येथील उपहार सिनेमागृहात १३ जून १९९७ रोजी दुपारी बॉर्डर हा चित्रपट दाखवत असताना भीषण आग लागली. यामध्ये एकूण ५९ नागरिक मृत्युमुखी पडले, तसेच १०३ नागरिक जखमी झाले. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावण्या झाल्या मात्र निकाल लागला तब्बल १८ वर्षांनंतर. सर्वोच्च न्यायालयाने २५ ऑगस्ट २०१५ रोजी सिनेमागृहाचे मालक सुशील आणि गोपाल अंसल यांना २ वर्षांचा तुरुंगवास आणि ६० कोटी रुपयांचा दंड भरण्यास सांगितला, तसेच मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले. न्याय मिळाला मात्र तोवर वेळ निघून गेली होती.
  

सामान्य माणसाने काय करायचं?

अशा परिस्थीत सामान्य माणसाने काय करावं असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अद्यापही जर अशा प्रकरणांची परिस्थिती "तारीख पे तारीख" अशीत असेल तर मग सामान्य माणसाला न्याय कधी मिळणार? आजही कोटींच्या संख्येत प्रलंबित प्रकरणे न्यायालयात पडून आहेत. न्यायाधीशांची संख्या प्रकरणांच्या संख्येत खूप कमी आहे. असे असताना सामान्य मुष्याने कुणाकडे मदत मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

 
जेसिका लाल हत्याकांड :

१९९९ मध्ये घडलेले जेसिका लाल हत्याकांड प्रकरण हे देखील त्यातीलच एक. २९ एप्रिल १९९९ रोजी जेसिका लाल नावाच्या एका मॉडेलचा भर पार्टीच खून करण्यात येतो. हा खून तत्कालीन हरियाणा काँग्रेसच्या प्रमुख नेत्याचा मुगला म्हणजेच मनु शर्मा याने आपल्या ३ साथीदारांसोबत केलेला असतो. केवळ "दारु संपल्याने आणखी दारु देता येणार नाही" असे जेसिकाने सांगितल्यामुळे हा खून झाला असतो. घटनेचे अनेक साक्षीदार असतात, मात्र जेसिकाला त्वरित न्याय मिळत नाही. तिला न्याय मिळायला तब्बल ७ वर्षांचा कालावधी लागतो. २० डिसेंबर २००६ रोजी जेसिकाला न्याय मिळतो आणि मनु शर्मा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते. देशाच्या राजधानीत एका हायप्रोफाइल पार्टीत खून होतो, सर्वांना माहीत असतं खून कुणी केलाय मात्र केवळ सत्ता आणि पैशाच्या ताकदीवर ७ वर्ष लागता या प्रकरणाचा निकाल लागायला. या प्रकरणावर 'नो वन किल्ड जेसिका' नावाचा चित्रपट देखील आला आहे. ही प्रकरणं केवळ सिनेमाची कहाणी म्हणून लक्षात राहतात. मात्र या प्रकरणात न्याय मिळायला ७ वर्ष लागली हे लक्षात रहात नाही. याला आपण न्याय म्हणू शकतो का?
 
 
 
 
 
 
आरुषी तलवार हत्याकांड :
 
जेसिका लाल प्रमाणेच भरपूर गाजलेले आणखी एक प्रकरण म्हणजेच आरुषी तलवार हत्याकांड. १५-१६ मे २००८ रोजी नॉएडा येथील डॉक्टर दंपतीची एकुलतीएक मुलगी आरुषी तलवार हिचा राहत्या घरी खून होतो. त्याच्या ३ दिवसांनंतर त्याच घराच्या छतावर घरातील नोकर हेमराजचा मृतदेह आढळतो. मात्र हत्या कशी झाली? कुणी केली? याविषयी काहीच उलगडत नाही. शेवटी हे प्रकरण सीबीआयला सोपविण्यात येतं. हत्येच्या ५ वर्षांनंतर म्हणजेच २६ नोव्हेंबर २०१३ रोजी आरुषी तलवार हिचे आई वडील म्हणजेच राजेश आणि नुपूर तलवार यांना या प्रकरणात दोषी जाहीर करण्यात येतं. " आपल्या एकुलकत्याएक मुलीचा आम्ही स्वत: खून का करु? " असा प्रश्न राजेश आणि नुपर तलवार यांनी उपस्थित केला. यामध्ये नुपूर आणि राजेश तलवार यांची नार्को टेस्ट देखील करण्यात आली. यानंचर १६ ऑक्टोबर २०१७ रोजी त्यांना डासना तुरुंगातून मुक्त करण्यात आले. मात्र हत्या खरंच कुणी केली हे अद्याप कोडंच आहे. या संपूर्ण प्रकरणात राजेश आणि नुपूर तलवार यांना शिक्षा जरी झाली असली तरी अद्याप खून का करण्यात आला तसेच राजेश आणि नुपूर तलवार यांनी आपल्या एकुलत्याएका मुलीचा खून खरच केला असेल का? असे अनेक प्रश्न अदायपही सुटलेले नाही. आरुषीला न्याय मिळालाय का? हा प्रश्न अजूनही तसाच आहे.
 
 
 
 
 
पल्लवी पुरकायस्थ हत्याकांड :
 
ही कहाणी एका २५ वर्षीय मुलीची आहे. पेशाने वकील असेलेल्या पल्लवीची ९ ऑगस्ट २०१२ रोजी तिच्या वडाळा येथील राहत्या घरी हत्या करण्यात आली. हत्या तिच्याच इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने केली. बलात्काराच्या हेतूने सुरक्षा रक्षक सज्जद अहमद मोघल याने पल्लवीच्या घराच्या किल्ल्या नजरचुकीने चेरल्या, तसेच त्याने पल्लवीच्या फ्लॅटचे दिवे घालवले. त्यानंतर त्याने चोरलेल्या किल्ल्यांच्या मदतीने घरात शिरून पल्लवीचा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने या हल्ल्याला प्रत्यूत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने चाकूने वार करत तिची हत्या केली. संपूर्ण प्रकरण २०१२ मध्ये घडले. मोघलने आपला गुन्हा देखील कबूल केला. मात्र त्याला शिक्षा सुनावण्यात २०१४ उजाडला तसेच त्याला अटक करण्यात आली मात्र त्याला लगेच पॅरोलवर सोडण्यातही आले. त्यानंतर तो फरार आहे. २०१६ मध्ये पॅरोलवर सुटल्यानंतर त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. त्याला शिक्षा झाली. मात्र पल्लवीला न्याय? नाही मिळाला...
 
एका काळवीटावरुन ही सर्व प्रकरणांना उजाळा मिळाला. काळवीटालाच जिथे २० वर्षांनी न्याय मिळतो, तिथे सामान्य माणसाला कधी न्याय मिळणार असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. सलमान खानच्या आयुष्यात दोन मोठ्या घटना घडल्या. एक म्हणजे काळवीट शिकार आणि दुसरी म्हणजे हिट अॅण्ड रन प्रकरण. ज्या प्रकरणात मनुष्याच्या आयुष्याचे नुकसान झाले त्यात सलमानची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आणि जिथे प्रश्न काळवीटाचा होता तिथे न्याय मिळायला तब्बल २० वर्षे लागली.
 
असे म्हणतात शाहण्या माणसाने न्यायालयाची पायरी चढू नये. या प्रलंबित प्रकरणांमुळे कदाचित असे म्हटल्या जात असेल. आजही भारतात अशी असंख्य प्रलंबित प्रकरणे आहे. अनेक प्रकरणांमध्ये माणूस मेल्यानंतर कितीतरी वर्षांनी न्याय होतो. अशा परिस्थितीत सामान्य माणसाने काय करावे ? इंग्रजीत "justice delayed is justice denied." असे म्हणतात. या प्रकरणांवरुन ते खरेही वाटते. अशा परिस्थितीत इतक्या वर्षांनी मिळणाऱ्या न्यायाला न्याय म्हणता येईल का?
 
 
 - निहारिका पोळ 
@@AUTHORINFO_V1@@