ममतांच्या राज्यात बंगालमध्ये गुन्हांची मालिका : भाजप

05 Apr 2018 13:03:20



नवी दिल्ली : ममता बनर्जी यांच्या कार्यकाळामध्ये प.बंगालमध्ये गुन्हांची एक मालिकाच तयार झाली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते बाबुल सुप्रियो यांनी केली आहे. नवी दिल्ली येथे भाजपच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप नेते एस.एस.अहलूवालिया, रुपा गांगुली आणि इतर नेते देखील याठिकाणी उपस्थित होते.

ममतांच्या राज्यामध्ये एकामागून एक गुन्हे सातत्याने घडत आहेत. संपूर्ण राज्यात कायदा आणि सुव्यव्स्थेचा पूर्णपणे बोजवारा उडला आहे. भाजपला देखील याच्या सातत्यने झळा बसलेल्या आहेत. त्यामुळे येत्या पंचायत निवडणुकांमध्ये भाजप या सर्व परिस्थितीची माहिती सामान्य नागरिकांसमोर मांडणार आहे' अशी माहिती सुप्रियो यांनी दिली. याच बरोबर ममता या स्वतः एक महिला असून देखील त्यांच्या राज्यात महिलांवर अनेक प्रकारचे अत्याचार अजूनही होत आहेत, अशी माहिती अहलूवालिया यांनी दिली. तसेच ममतांच्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची काय स्थिती आहे, याची एक चित्रफीत देखील यावेळी दाखवण्यात आली.


येत्या काही दिवसांमध्ये बंगालमध्ये स्थानिक पंचायत निवडणुकांना सुरुवात होणार आहे. यामध्ये तृणमूल कॉंग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपने पूर्ण तयारी केली आहे. परंतु ममता सरकार भाजपवर सध्या दडपशाहीचा वापर करू पाहत आहे, असा आरोप भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे पंचायत निवडणुकांच्या दरम्यान संपूर्ण राज्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात याव्यात, अशी मागणी देखील भाजपने केली आहे.

सुप्रियो आणि भाजप नेत्यांची पत्रकार परिषद :


Powered By Sangraha 9.0