हाफिज सईदला अमेरिकेचा आणखीन एक मोठा झटका

    दिनांक  03-Apr-2018

सईदच्या 'मिली मुस्लीम लीग' हा राजकीय पक्ष दहशतवादी गट म्हणून घोषित इस्लामाबाद  : मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तसेच अनेक दहशतवादी संघटनांचा म्होरक्या म्हणून ओळखल्या जाणऱ्या हाफिज सईदला अमेरिकेने आता आणखीन एक मोठा झटका दिला आहे. दहशतवादी आणि त्यांच्याशी निगडीत संघटनांवर कारवाई करत असल्याचे सांगत अमेरिकेने हाफिज सईद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या नव्या राजकीय पक्षावरच अमेरिकेने बंदी घातली आहे. तसेच हा राजकीय पक्ष एक दहशतवादी गट असल्याचे देखील अमेरिकेने जाहीर केले आहे. त्यामुळे नवा राजकीय पक्ष स्थापन करून पाकिस्तानच्या राजकारणात प्रवेश करण्याचा सईदचा मनसुबा आता पूर्णपणे उधळला गेला आहे.

अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ ट्रेझरीनी नुकतीच याविषयी एक परिपत्रक काढून घोषणा केली आहे. यामध्ये अमेरिका सातत्याने दहशतवादी आणि त्यांच्या निगडीत संघटनांवर कारवाई करत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. याअंतर्गतच 'लष्कर ए तोयबा' या दहशतवादी संघटनेशी निगडीत सर्व संघटनावर कारवाई केली जात असून पाकिस्तानमध्ये सध्या कार्यरत असलेला 'मिली मुस्लीम लीग' या राजकीय पक्षाचा या संघटनेशी अत्यंत जवळचा संबंध असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. मिली मुस्लीम लीगचे सर्व संस्थापक सदस्य हे दहशतवादी संघटनांमध्ये कार्यरत राहिले असून अंक दहशतवादी घटनांमध्ये त्यांचे हात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा पक्ष राजकीय नसून एक दहशतवादी गट असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

गेल्या वर्षी हाफिजला पाकिस्तान सरकारने नजरकैदेत ठेवल्यानंतर त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी मिली मुस्लीम लीगची स्थापना केली होती. सैफुल्ला खालिद, मुजामील इक्बाल हाशिमी, मोहम्मद हरीस दार, ताबीस कवाय्म, फैजल नदीम, मोहम्मद एहसान या सात जणांचा समावेश आहे. या सातही जणांवर काश्मीर आणि पंजाबमध्ये दहशतवादी कृत केल्याचे आरोप आहे. तसेच हा पक्ष हाफिज सईदशी निगडीत असल्यामुळे मागील वर्षी अमेरिकने दोन वेळा पाकिस्तान सरकारला या पक्षावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. परंतु याकडे पाकिस्तानने नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष केले होते.