गाडगेबाबांच्या वेशात विदर्भभर प्रबोधन करणारा हनुमंत

03 Apr 2018 08:29:30
 
 
 
राष्ट्रीय स्तरावर व्यसनमुक्तीवर कीर्तन व प्रबोधनातून समाजजागृती करणारा वर्तमान काळातील गाडगेबाबा म्हणजे धामणगांव शहरातील हनुमंत ठाकरे. केवळ बोलाने नव्हे, तर कृतीनेही हा हनुमंत प्रत्यक्ष गाडगेबाबांचेच जीवन हल्ली जगतोय्‌. या वर्तमान काळातील गाडगेबाबांचा यथोचित सत्कार, सन्मान झाला तो संघाचे प्रांत सहसंघचालक चंद्रशेखर राठी, अ. भा. गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक काठोळे, संस्कार भारतीचे प्रांत कार्यकारिणी सदस्य दत्ता सराफ आणि जिल्हा कार्यकारिणीचे गजानन उपरीकरसह समाजातील विविध नामांकित संघटनांकडून.
 
वर्धा-अमरावती जिल्ह्याच्या सीमेलगत पूर्वेकडे वसलेल्या सोनोरा काकडे या गावात अत्यंत हलाखीच्या स्थितीत हनुमंत ठाकरे यांची आई जगत होती. याच परिसरात हनुमंताचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या दिनचर्येत हनुमंताचे बालपण गेले. बालपणीची पितृछत्र हरवले. आई सुभद्राबाई, हनुमंत यांचा जगण्यासाठीच त्यावेळी खूप संघर्ष झाला. एक दिवस कोकिळाबाई काकडे व शशिकलाबाई काकडे यांची मेहेरनजर या दोघांवर पडली. आपल्या स्वगृही दोघांनाही नेऊन त्यांनी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. सुशिक्षित समजूतदार कोकिळाबाईने हनुमंताच्या भावी आयुष्याचा अंदाज बांधला आणि आपल्या माहेरी धामणगांव रेल्वे येथे डॉ. भाऊसाहेब खोले यांच्याकडे राहण्याची व शिक्षणाची व्यवस्था करुन दिली. सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या धामणगांव नगरीने हनुमंतला आपल्या कवेत घेतले. संस्काराचे बीजारोपण करीत हनुमंत नावाचा सुशील, कष्टाळू, मायाळू, उदार स्वभावाचा उमदा तरुण घडला.
 
पुढे संत अच्युत महाराजांशी हनुमंताची भेट घडली. अच्युत महाराजांच्या योगदृष्टीचा विलक्षण प्रभाव हनुमंताच्या विचारशक्तीला कलाटणी देणारा ठरला आणि आता ‘उरलो उपकारापुरता’ अशी मनोवस्था आकारास येऊ लागली. याच काळात आनंदवन येथील प्रवास घडला. सेवामूर्ती बाबा आमटे व साधनाताई यांचे उत्तुंग सेवाकार्य जवळून न्याहाळले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कृपाप्रसादाने आत्मसाधनेचे वेध लागले. ज्याने आयुष्य निर्माण केले, त्या निर्मात्याच्या प्रत्यक्ष भेटीची ओढ, आतुरता अगतिकता दाखवू लागली. आपणही तरावे व इतरासी तारावे, यानुसार हनुमंताने प्रबोधनाची कास धरली. कर्मयोग साधण्याकरिता कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या कार्यकर्तृत्वाची धुरा खांद्यावर पेलण्याचा अट्टहास करीत हनुमंताने गाडगेबाबाचा वेश धारण केला. आवश्यक साहित्य एकत्र करुन गाडगेबाबा साकारले गेले. बाबांचे अखेरचे कीर्तन बाबांच्याच आवाजाची नक्कल करीत अख्खा विदर्भ हनुमंताने पिंजून काढला. या कार्याची दखल घेत देशातील पाचव्या राष्ट्रीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात प्रत्यक्ष संत गाडगेबाबाच्या वेशात बाबांचे अखेरचे कीर्तन सादर केले. सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज, मराठी सिनेतारका निशिगंधा वाड यांच्या उपस्थितीत हनुमंतला गौरविण्यात आले. याचसोबत अमरावती विद्यापीठाद्वारे कीर्तन सादर करण्याची संधी प्राप्त करून देण्यात आली. तालुका गुरुदेव सेवा समितीच्या माध्यमातून उन्हाळी बालसुसंस्कार शिबिरात बालमनावर सुसंस्काराचे बीजारोपण करण्याचे सत्कार्य मुख्य शिक्षक हनुमंतला लाभले. मित्र परिचयातून डॉ. मुकुंद पवार पब्लिक मिल्ट्री स्कूलमध्ये वसतिगृह अधीक्षकाचे काम मिळाले. मुलांना पहाटे उठवून प्रार्थना, ध्यान, योगासन, मैदानी खेळ शिकविण्यात जीवनानंद मिळत गेला. बालमुले सुद्धा हनुमंताच्या लडीवाळ, प्रेमापायी घरदार विसरुन अभ्यासात रममाण होऊ लागली. जीवनकलेसह नाट्यकलाही हनुमंताने जोपासली. कला क्षेत्रात कार्य करणार्‍या संस्कार भारतीतर्फे निर्मित ‘सासरेबुवा जरा जपून’ या नाटकात साधुच्या सेवेकरीची उत्तम भूमिका हनुमंताने साकारली आहे.
 

//हनुमंताचा विवाह
 
एका शासकीय वसतिगृहात सेवाव्रती अधीक्षिका चंदा हनुमंतासारखेच जीवन व्यतीत करीत होती. चंदाच्या कल्याणाचा विडा उचललेल्या शिक्षक जुनोनकरांना चंदासाठी सात्विक आणि जाणता उपवर शोधायचा होता. लागलीच त्यांनी धामणगांव गाठले. हनुमंताशी चर्चा झाली. आनंदरावांची एम. ए., बी. एड. झालेली कन्या चंदाशी थेट फोनवरून हनुमंताने संवाद साधला. चंदाने आपली संघर्षगाथा हनुमंताला कळविली. फोनवरूनच दोन जिवांच्या मनोमिलनाचा सोहळा रंगला आणि लग्नही ठरले. स्वतःच्या या लग्नसोहळ्यात नवरदेवानेच म्हणजेच हनुमंतानेच प्रत्यक्ष मंगलाष्टके म्हणत आपला आदर्श विवाह नुकताच
केला.
 
कमल छांगाणी
धामणगांव रेल्वे,
 
Powered By Sangraha 9.0