सीबीएसईच्या फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय मागे

03 Apr 2018 12:40:04



नवी दिल्ली : सीबीएसई पेपरफुटीनंतर घेण्यात येणाऱ्या फेरपरीक्षांचा निर्णय केंद्र सरकारने आज मागे घेतला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी आज याविषयी आपल्या सोशल मिडीयावरून घोषणा केली आहे. परंतु यामागचे नेमके कारण मात्र स्वरूप यांनी दिलेले नाही.

'सीबीएसईच्या इ.१० वीचा गणिताचा पेपर फुटल्याची बातमी बाहेर आल्यानंतर सीबीएसईने विद्यार्थांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. पेपर फुटीमुळे विद्यार्थांचे सर्वोत्तम हित आणि त्यांच्या मुल्यांकनावर याचा कसलाही परिणाम होऊ नये म्हणून फेरपरीक्षांचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता मात्र हे फेरपरीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे' असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान फक्त १० वीचीच फेरपरीक्षा रद्द करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे इ.१२ वीच्या फेरपरीक्षा होणार का ? यावर मात्र अद्याप कसलाही खुलासा झालेला नाही.

गेल्या आठवड्यात सीबीएसईच्या पेपरफुटीमुळे विद्यार्थांच्या फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. यावरून विद्यार्थी आणि पालक हे कमालीची नाराज झाले होते. त्यातच राजकीय पक्षांनी या वादात उडी घेऊन सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली होती व पालकांनी आपल्या विद्यार्थांना परीक्षेला पाठवू नये, असा सल्ला देण्यास सुरुवात केली होती. यामुळे पालक आणि विद्यार्थांनी देखील फेरपरीक्षा नको, असा सूर लावून धरला होता. त्यामुळे आता सरकारच्या या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Powered By Sangraha 9.0