उ. कोरिया करणार अणु चाचणी स्थळ बंद

29 Apr 2018 17:56:44


सिओल : उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये झालेल्या ऐतिहासिक चर्चेनंतर आता उ. कोरिया आपले अणु चाचणी स्थळ कायमचे बंद करणार असल्याची घोषणा उ. कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने केली आहे. तसेच या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून दक्षिण कोरिया आणि अमेरिकेचे प्रमुख अधिकारी तसेच पत्रकारांनी उत्तर कोरियामध्ये यावे, असे आवाहन देखील किमने केले आहे.

पुंग्ये-री (Punggye-ri) हे आपले अधिकृत अणु चाचणी स्थळी येत्या मे महिन्यामध्ये बंद करणार असल्याचे किमने जाहीर केले आहे. दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष मून जाय इन यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांमधील करण्यासाठी तसेच कोरियामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी उत्तर कोरियाने अणु चाचणी करणार नसल्याचे मान्य केले आहे. तसेच जगाला याची खात्री पटावी, म्हणून पुंग्ये-री हे अणु चाचणी स्थळ सर्वांच्या उपस्थितीत कायमचे बंद करण्यात येणार असल्याचे किमने जाहीर केले. दरम्यान दक्षिण कोरियाच्या राष्ट्रध्यक्ष कार्यालयाने देखील या वृत्ताला आपला दुजोरा दिला असून उत्तर कोरिया आपले अणु चाचणी स्थळ आणि प्रयोगशाळा बंद करणार असल्याचे म्हटले आहे.
गेल्या शुक्रवारी किम जोंग उन याने दक्षिण कोरियामध्ये जाऊन द. कोरिया प्रमुखांची भेट घेतली. याभेटीमध्ये किमने दोन्ही देशांमधील गेल्या ६५ वर्षांच्या कोरियन युद्धाच्या समाप्तीची घोषणा केली. तसेच यापुढे उत्तर कोरिया कसल्याही प्रकारची अणु चाचणी करणार नाही, तसेच दोन्ही परस्परांच्या विकासासाठी म्हणून सातत्यने प्रयत्न करतील, असे आश्वासन दिले होते.
Powered By Sangraha 9.0