किटक नाशकांच्या सुरक्षित वापराची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी

    दिनांक  29-Apr-2018

नांदेड जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांचे आवाहन

 
 
 
 
नांदेड : किटक नाशकांच्या सुरक्षित वापरासंबंधी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. खरीप हंगाम नियोजन व किटक नाशकांचा सुरक्षित वापर या विषयावर नांदेड येथे नुकताच एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक एच. आर. गुंटूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी अधिकारी पंडित मोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
 
 
शिनगारे पुढे म्हणाले, सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून सर्वांना शेती - तंत्रज्ञानाच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी विक्रेते, गुणनियंत्रण अधिकारी, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी किटक नाशकांच्या सुरक्षित वापरासंबंधी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी. तसेच विषबाधेची घटना घडू नये म्हणून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विक्रेते, कृषि अधिकारी यांनी शेतकऱ्यांसाठी मोहिम स्वरुपात काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
 
डॉ. मोटे यांनी अनुदानित खतांची विक्री ई-पॉस मशिनद्वारे करणे बंधनकारक असल्याचे सांगून शेतकऱ्यांना आधार कार्ड आवश्यक असल्याचेही सांगितले. तसेच यावेळी कायदेविषयक, परवाना विषयक, किटक नाशकांचा सुरक्षित वापर, विषबाधा झाल्यास लक्षणे आणि उपाययोजनेची माहिती दिली.