आता झोपडपट्टी धारकांना मिळणार मालकी हक्काचे पट्टे

29 Apr 2018 19:58:51

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये घोषणा





नागपूर :
गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मालकी हक्काचे पट्टे देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवरील कस्तुरबा नगर व इंदिरा नगर येथील झोपडपट्टी मालकी हक्काचे पट्टे वाटप कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूर जिल्ह्याचे प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते.


'सामान्य माणसाचा सर्वात मोठा अधिकार म्हणजे त्याच्या मालकीची जमीन होय, ज्यांच्याकडे जमिनीचा तुकडाही नाही तो अस्तित्वहीन समजला जातो. त्यामुळे स्वत:च्या मालकीच्या जमिनीचा हक्क मिळणे ही जीवनात अत्यंत महत्वाची बाब मानली जाते. म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून ज्या जागेवर झोपडपट्टीधारक वास्तव्य करीत आहेत, त्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला असून शहरातील झोपडपट्टीधारकांना एक लाख मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात येणार आहे' असे त्यांनी जाहीर केले. सध्या नागपूर सुधार प्रन्यासच्या जमिनीवर ४० झोपडपट्टयांमधील पट्टे वाटप येत्या तीन महिन्यात करण्यात येईल व हीच कार्यवाही महानगरपालिकेच्या स्तरावर संपूर्ण शहरात लागू करण्यात येईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.


गरिबांच्या हिताचे रक्षण करणे सरकारचे ध्येय : गडकरी

गरीब व सामान्य माणसाच्या हिताचे संरक्षण करणे हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट असून गरिबांच्या हिताचे निर्णय घेण्याला सरकार प्राधान्य देत आहे, असे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले. गरिबांच्या विकासाच्या विविध योजनांची सध्या प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असून मुख्यमंत्री फडणवीस हे सामान्य नागरिकांच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहेत, असे त्यांनी यावेळी म्हटले. .

Powered By Sangraha 9.0