लोकवर्गणीतून सव्वा तीन लाख रु. भरुन मिळवले सुकी धरणाचे पाणी

28 Apr 2018 12:09:36

न्हावी, बोरखेडा, कळमोदा परिसरातील १० गावांना लाभ
पाटचार्‍याद्वारे पाझर, विहिरींचे पुनर्भरण


न्हावी, ता.यावल :
येथील जलपातळी खालावल्याने लोकवर्गणीद्वारा आमदार हरिभाऊ जावळे व येथील सामाजिक कार्यकर्ते ,कृषी उत्पन्न बाजारसमिती यावलचे सभापती भानुदास चोपडे व खरेदी विक्री शेतकरी संघ यावल चे उपसभापती यशवंत तळेले यांच्या पुढाकारामुळे लोकवर्गणीतून ३ लाख २३ हजार रुपये भरुन सुकी धरणातून पाटचार्‍याद्वारे येथील पाझर तलाव व जुने तलाव आणि विहिर पुनर्भरण करण्यात आले
 
 
हे पाणी दर सेकंदाला २ एमक्यू क्सुसेक पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे न्हावी, बोरखेडा, कळमोदा परिसरात शेतकर्‍यांच्या विहिरीच्या भूजलपातळीत वाढ होईल, यासाठी भानुदास चोपडे, यशवंत तळेले, विलास चौधरी, हेमा चौधरी, मिलिंद चौधरी, शरद ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र चोपडे, अरुण झोपे, रवींद्र झोपे अनेक सहृदय व दानशूर नागरिक व शेतकरी बांधवांनी दिलेल्या निधीतून लोकवर्गणीतून ही मोठी रक्कम भरण्यात आली. सुकी धरणातून १५ दिवस पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सभोवतालच्या दहा गावातील शेतकरी बांधवांना लाभ होणार आहे.
 
वन्यप्राणी व पशु, पक्ष्यांची तहान भागणार
वन्यप्राणी व पशु, पक्षी यांची तहान काहीकाळ का होईना मिटणार आहे, या प्रयत्न आणि कार्यवाहीचे परिसरात सर्वत्र मुक्तकंठाने कौतुक होत आहे. अशाच प्रकारचे भूजलपातळी वाढविण्याचे प्रयत्न पुरापाण्याच्या दिवसात, पावसाळ्यातही केले जावेत, अशी अपेक्षाही सूज्ञ, पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
 
Powered By Sangraha 9.0