केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण

28 Apr 2018 22:29:49
 
 
जळगाव, २८ एप्रिल :
केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित सेवावस्ती विभागच्या माध्यमातून दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना शनिवार, दि. २८ एप्रिल रोजी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. जळगाव जनता सह. बँकेच्या सेवा कार्यालयात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मांगीलालजी बाफना नेत्रपेढीच्या संचालिका अनुया कक्कड, प्रमुख अतिथी जळगाव जिल्ह्याच्या क्रीडाधिकारी सुनंदा पाटील आणि श्री अरिहंत मार्गी जैन महिला संघाच्या राष्ट्रीय महामंत्री अशा पगारिया आणि ललिता श्रीश्रीमाळ, सेवावस्ती विभाग प्रमुख डॉ.विवेक जोशी उपस्थित होते.
 
 
सेवावस्ती विभागाच्या माध्यमातून गेल्या ४ वर्षांपासून पाठ्यपुस्तक सहयोग योजना कार्यान्वित आहे. ज्यात आत्तापर्यंत एकूण १२४० विद्यार्थ्यांनी पुस्तकांचा लाभ घेतला आहे. दरवर्षी इ. ९ वी ते १२ वीच्या गरजू विद्यार्थ्यांना तीन टप्प्यांमध्ये पाठ्यपुस्तक देण्यात येते. पहिल्या टप्प्यात दहावीच्या १७२ विद्यार्थ्यांना पुस्तक देण्यात आले.
 
 
अनुया कक्कड यांनी आपल्या प्रमुख भाषणात विद्यार्थी दशेतून बाहेर पडल्यावर पुस्तकांचे महत्व अधोरेखित केले आणि पुस्तकांचे व्यवस्थित जपवणूक करून पुढील वर्षी अन्य गरजूंना मदत करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांकडून घेतले. आशा पगारिया यांनी या उपक्रमाची स्तुती करून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर क्रीडाधिकारी सुनंदा पाटील यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करत खेळाचे महत्व विशद केले.
 
 
कार्यक्रमात कृणाल महाजन यांनी प्रास्ताविक केले, भाग्यश्री कोळी या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन राजश्री डोल्हारे यांनी केले. यावेळी अरिहंत मार्गी जैन महिला संघाच्या आशा कावडिया आणि सर्व सदस्या उपस्थित होत्या. माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे संचालक दीपक जोशी, ललित कला अकादमीचे प्रमुख पियुष रावळ, ज्योती रायपुरे आदी उपस्थित होते.
 
Powered By Sangraha 9.0