पंतप्रधानांनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याचे पद देखिल रद्द

    दिनांक  26-Apr-2018

पाकचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा यांची खासदारकी रद्द
इस्लामाबाद :
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यानंतर आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांच्यावर देखील इस्लामाबाद उच्च न्यायालयाने कारवाई करत, त्यांचे संसद सदस्यपद रद्द केले आहे. पाकिस्तानमध्ये २०१३ झालेल्या निवडणुकांदरम्यान असिफ यांनी निवडणूक अर्जादरम्यान काही गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. यामध्ये दोषी असल्याचे सांगत न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ही कारवाई केली.

पाकिस्तानमधील विरोधी पक्ष असलेल्या तारिक-ए-इन्साफ या पक्षाचे नेते उस्मान दार यांनी असिफ यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यामध्ये असिफ यांनी २०१३ च्या आपल्या निवडणूक अर्जामध्ये त्यांच्या युएईच्या (युनायटेड अरब अमिरात) वर्क परमिट व्हिसासंबंधी तसेच त्याठिकाणी असलेल्या त्यांच्या संपत्तीबद्दल योग्य माहिती दिलेली नाही, असा आरोप त्यांनी केला होता. यावर इस्लामाबाद न्यायालयाने सर्व पुराव्यांची पाहणी करून, असिफ हे दोषी असल्याचे स्पष्ट केले. तसेच च्या खंडपीठाने सुनावणी करत असताना, असिफ यांच्या वर्तनावर ते 'प्रामाणिक' आणि 'विश्वास पात्र' नसल्याची देखील टिप्पणी केली. त्यामुळे असिफ हे निवडणूक लढवण्यासाठीच अपात्र असल्याचे म्हणत त्यांचे संसदीय सदस्यपद रद्द करण्यात येत असल्याचे न्यायालयाने जाहीर केले.


दरम्यान ख्वाजा यांचे पद रद्द झाल्यानंतर पाकिस्तान तारिक-ए-इन्साफ या पक्षाकडून मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली या त भ्रष्ट सरकारविरोधात हा पक्षाचा आणखी एक मोठा विजय असल्याचे पक्षाकडून बोलले जात आहे.न्यायालयाने नमूद केलेले मुद्दे :


गेल्या दोन दोन वर्षांमधील पाकिस्तान सरकारवरील ही दुसरी सर्वात मोठी न्यायालयीन कारवाई मानली जात आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर पनामा पेपर्स लिक प्रकरणी पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने थेट कारवाई करत, त्यांना पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचे आदेश दिले होते. यानंतर सरकारमधील एक अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाण्याऱ्या परराष्ट्र मंत्र्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच या घटनेचा पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होणार आहे.