कल्पवृक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2018   
Total Views |
 
 

 
 
नारळाच्या झाडाचे उपयोग आर्थिक उत्पन्नाच्या परिभाषेत कदाचित नाही मोजता येणार, पण हा वृक्ष ग्रामीण लोकजीवनात आपलं स्थान टिकवून आहे. माणसासहित निसर्गातल्या अनेक जीवांना जीवन देणारा माड हा खऱ्या अर्थाने ‘कल्पवृक्ष’ आहे.
 
 
एकदा एका पत्रकाराने एका शेतकऱ्याला विचारलं, ''काका, तुमच्या नारळाच्या बागेतून तुम्हाला वर्षाला किती रुपये उत्पन्न मिळतं हो?''
 
 
शेतकरी म्हणाला, "पैशात नाही सांगता येणार.''
 
 
पत्रकार : ''म्हणजे?''
 
 
शेतकरी : ''म्हणजे आमच्या बागेत दहा नारळाची झाडं आहेत. नारळ घरी रोजच्या जेवणाला लागतात. एकही नारळ विकत घ्यावा लागत नाही. घरच्या घरीच खोबऱ्याचं तेल काढतो. त्याच्यामुळे गुरांना पेंडही मिळते. नारळाची सोडणं, पिढे, पिसुंदऱ्या आणि पात्या जळणासाठी उपयोगी येतात. त्यामुळे पाणी तापवायला गिझर बसवावा लागलेला नाही. नारळाच्या किशा (काथ्या) भांडी घासायला आणि इतर साफसफाईला उपयोगी येतात. माडाच्या पात्यांचे हीर काढून घराच्या घरीच झाडू बनवतो. माडाच्या सावळ्या उन्हाळ्यात मांडव घालायला उपयोगी पडतात. करवंट्यांचा उपयोग जेवणात वाटी म्हणून होतो. नारळाची सोडणं जवळच्याच कारखान्यात देऊन त्याच्यापासून दोरखंड बनवून घेतो. या सगळ्यातून मला एकही पैसा मिळत नाही. घरगुती उपयोगाच्या वस्तूंसाठी खर्च करावा न लागल्यामुळे वाचलेला पैसा हेच माझं उत्पन्न. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही हिशोब करून शेतकऱ्याचं हे अर्थशास्त्र आपल्या विचारांची कक्षा रुंदावणारं आहे. 'उत्पन्न' म्हणजे 'वस्तू वा सेवा विकून मिळालेला पैसा' अशी प्रचलित व्याख्या आहे. पण ही उत्पन्नाची व्याख्या शेती- बागायतीला लागू पडत नाही. निसर्गाकडून फुकट मिळालेल्या सेवा, शेतकऱ्याचा 'स्वयं-उपभोग' (Self Consumption) आणि गावपातळीवर वस्तुविनिमयात (Barter Transactions) होणारे व्यवहार हे राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) मोजले जात नाहीत. पण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा तो एक महत्वाचा भाग असतो. आपल्या अनंत उपयोगांमुळे कल्पवृक्ष म्हणवलं जाणारं नारळाचं झाड हे भारतातच नव्हे, तर जगभरात ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. नारळाच्या झाडाचे उपयोग आर्थिक उत्पन्नाच्या परिभाषेत कदाचित नाही मोजता येणार, पण हा वृक्ष ग्रामीण लोकजीवनात आपलं स्थान टिकवून आहे. आज पर्यावरणजागृतीमुळे त्याचं महत्व वाढलं आहे.
 
भारतात खेडेगावांमध्ये जिथे जिथे नारळ पिकतो तिथे तिथे अनेक लघुउद्योग परंपरेने चालत आलेले आहेत. आज खोबरेल तेलाच्या मोठ्या गिरण्या सगळीकडे आहेत, पण पूर्वी बैलाच्या घाण्यावर तेल काढलं जायचं. पूर्वी प्रत्येक गावात एकतरी तेलाचा घाणा असायचा. गावांमध्ये लोकप्रिय असलेलं 'माडी' हे पेय माडापासूनच मिळतं. नारळाच्या झाडाला साधारण मध्यभागी एक खोप पाडून त्याच्याखाली करवंटी वा काहीतरी भांडं लावून ठेवतात. माडाच्या खोडातून डिंकासारखाच एक पातळ चिकट द्रव स्त्रवतो. तो त्या भांड्यात गोळा होतो. हीच 'माडी'! हे पेय दारूइतकं तीव्र नसलं तरी तरतरी आणणारं असतं. अजूनही कोकणात आणि नारळाचं पीक असलेल्या इतर भागांत माडी काढण्याचा घरगुती उद्योग चालतो. या उद्योगाला विशिष्ट हंगाम नसतो. वर्षाचे बारा महिने हा उद्योग चालतो.
 
दुसरा उद्योग म्हणजे झापं विणण्याचा. माडाच्या सावळ्यांची झापं विणणं ही एक कला आहे. 'अंगण' हे गावांतल्या घरांचं खास वैशिष्ट्य. उन्हाळ्यात प्रत्येक घराच्या अंगणात घातला जाणारा 'मांडव' हा गारवाही देतो आणि घराची शोभाही वाढवतो. (हल्ली आधुनिकतेच्या नावाखाली अंगणात पत्रे घालतात आणि मग मरणाचं उकडतं म्हणून एसी बसवतात ते सोडा...) पण झापांमुळे मिळणारा नैसर्गिक गारवा हा अनुभवल्यानंतरच कळेल. काही ठिकाणी नुसत्या सावळ्या टाकून मांडव घालतात, पण झापं विणल्यामुळे त्याला एक भक्कमपणा येतो आणि जास्त गर्द सावली मिळते. झापं विणण्यासारखीचीच दुसरी एक कला म्हणजे झाडू बनवणं. स्थानिक भाषेत झाडूला 'वाढवण' म्हणतात. हल्ली सगळ्या घरांमध्ये लाद्या बसवतात, पण अजूनही जिथे जिथे मातीची जमीन आहे अशा ठिकाणी केर काढायला वाढवणच उपयोगी पडते. हिरांचा मागचा भाग कठीण व टोकाकडचा भाग लवचिक, तंतुमय असल्याने मुठीत पकडून केर काढायला ती सोपी, सुटसुटीत पडते. पूर्वी झापं विणणं, वाढवणी बांधणं हे उद्योग घरगुती पातळीवर चालायचे. हल्ली अनेक ठिकाणी महिला बचत गटांच्या माध्यमातून हे उद्योग टिकवले गेले आहेत. आणखी एक सर्वपरिचित असलेला आणि अजूनही मोठ्या प्रमाणावर चालणारा उद्योग म्हणजे माडाच्या काथ्यांपासून सुंभ (दोऱ्या) बनवणे. कोकणात वेंगुर्ल्याला असा मोठा कारखाना आहे. चिवटपणा या गुणधर्मामुळे सुंभाचा उपयोग बांधकामात बराच होतो. शिवाय कपडे वाळत घालायची दोरी, गाई-म्हशींना बांधण्याचं दावं, रहाटाची माळ, असे सुंभाचे नानाविध उपयोग होतात. पूर्वी जेव्हा पंप नव्हते तेव्हा विहिरीतून पाणी काढण्यासाठी पायरहाट वापरले जायचे. रहाटाने पाणी काढणं हा उत्तम व्यायाम होता. शिवाय त्यामुळे विहिरीच्या पाण्यात ऑक्सिजन मिसळून नैसर्गिकरित्या पाणी शुद्ध राहायचं. रहाटाची माळ वळणं हा एक मोठा कार्यक्रम असायचा. ते एकट्या-दुकट्याचं काम नव्हतं. प्रत्येकाच्या घरी सगळे गावकरी लोक एकत्र येऊन माळ वळत. त्यासाठी सुंभाचा जाड आणि अतिशय चिवट, घट्ट विणलेला दोरखंड लागायचा. हल्ली काथ्यांमध्ये थोडंसं प्लास्टिक वा कृत्रिम धागे मिसळून टिकाऊ दोऱ्या बनवतात. याशिवाय काथ्यांपासून बनवलेल्या चटया आणि पायपुसणी आजही सर्रास वापरली जातात. ग्रामीण भागांत जिथे जिथे अजूनही चुलीवर जेवण केलं जातं तिथे तिथे विस्तव पेटवायला माडाच्या पात्यांचा उपयोग होतो. पात्या पटकन पेट घेतात. त्यामुळे विस्तव पेटवायला रॉकेल वापरावं लागत नाही. किनारी प्रदेशांत बरेचदा वादळामुळे माड उन्मळून पडतात. उन्मळून पडलेल्या माडाच्या टोकाला खोडात एक खोबऱ्यासारखा पदार्थ तयार झालेला असतो, त्याला 'कोळू' म्हणतात. हा पदार्थ खायला अतिशय गोड आणि चविष्ट असतो.
 
 
 
नारळाचा आणखी एक बहुउपयोगी अवयव म्हणजे करवंटी. केळीचं पान आणि करवंटी ही पूर्वीची 'ताट-वाटी' होती. करवंटीला सुबक आकार देऊन त्याला एक बांबूची छोटी काठी जोडून त्याची पळी बनवली जायची व ती तेलाच्या घाण्यामध्ये वा घरांमध्येही वापरली जायची. करवंटीला मध्ये भोक पाडून जिलब्या पाडायला ती उपयोगी यायची. करवंटी पटकन जळते कारण तिच्यात तेलाचा अंश असतो. पूर्वी करवंटीचंही तेल काढून ते वंगण म्हणून वापरलं जाई. हल्ली यंत्रांद्वारे करवंटीपासून बाउल्स, पळ्या, किटली, खेळणी आणि कलाकुसरीच्या वस्तू बनवल्या जातात. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे या सगळ्या पारंपरिक उद्योगांचं पुनरुज्जीवन करणं काही प्रमाणात का होईना, पण शक्य झालं आहे. पूर्ण वाढलेलं माडाचं खोड हे उत्तम इमारती लाकूड म्हणून घरबांधणीमध्ये पूर्वीपासून वापरलं जातं. आज मलेशिया, सिंगापूर, थायलंड या देशांमध्ये पर्यटनस्थळी माडाच्या लाकडापासून आणि काथ्यांपासून बनवलेली घरं (Coconut House) पाहायला मिळतात. फिलिपिन्समध्ये 'कोकोनट पॅलेस' नावाचा मोठा राजवाडा आहे, ज्याच्या भिंती आणि छप्पर माडाच्या लाकडापासून बनवलेलं आहे. ते फिलिपिन्सच्या उपराष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान आहे. याशिवाय टेबल, खुर्ची, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर माडाच्या लाकडापासून बनवतात. प्लास्टिक फर्निचरला हा उत्तम इको- फ्रेंडली पर्याय आहे.
 
 
माडाचं झाड हे अनेक पक्ष्यांचं निवासस्थान आहे. सुगरण पक्षी घरटं बांधायला माडाचंच झाड निवडतो, कारण त्याला घरटं बांधायला लागणारे तंतुमय धागे या झाडावरच उपलब्ध होतात. खाडी किनार्‍यावरची माडाची झाडं सुगरणीच्या घरट्यांनी लगडलेली दिसतात. याशिवाय पोपट, घुबड, साळुंकी, वसंत, सागरी गरूड, गिधाड हे पक्षी माडाच्या झाडावर घरटी करतात. शहाळी हे माकडांचं आवडतं अन्न. माकडं माडावरची शहाळी काढून त्यातलं खोबरं खरवडून काढतात आणि उरलेला भाग फेकून देतात. माणसासहित निसर्गातल्या अनेक जीवांना जीवन देणारा माड हा खऱ्या अर्थाने ‘कल्पवृक्ष’ आहे.
 
 
 
 
- हर्षद तुळपुळे
 
@@AUTHORINFO_V1@@