गडचिरोलीमध्ये ६ नक्षलवाद्यांचा खात्मा, शोध मोहीम सुरु

24 Apr 2018 09:18:59
 
 
 
 
 
 
गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली येथील राजाराम खांदला भागात आज सुरक्षा रक्षकांना मोठे यश हाती आले आहे. या भागात आज ६ नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा रक्षकांना यश मिळाले आहे. ४८ तासांपासून या भागात नक्षलवादी विरोधी शोध अभियान सुरु होते. या अभियानादरम्यान सुरक्षा रक्षकांना एकूण २२ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील सीमारेषेवर या नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे.
 
 
बऱ्याच दिवसांपासून या भागामध्ये शोध मोहीम राबवली जात होती. त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात कधी कधी चकमकी होत होत्या. या चकमकीत काही सुरक्षा रक्षक आणि जवान शहीद देखील झाले. मात्र आज सुरक्षा रक्षकांना मोठे यश हाती आले आहे. छत्तीसगडमधील सुकमा येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या सीआरपीएफ जवान आणि नक्षलवादी यांच्या चकमकीत एक जवान शहीद झाला होता.
 
 
 
काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांविरोधात पोलिसांकडून करण्यात आलेल्या 'कोबिंग ऑपरेशन' या मोहिमेमध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले होते. गडचिरोलीतील भामरागड येथे एकूण १४ नक्षलवाद्यांच्या खात्मा करण्यात पोलिसांना यश आले होते. यामध्ये काही कुख्यात नक्षलवाद्यांचा देखील समावेश होता. 
Powered By Sangraha 9.0