काँग्रेसच्या विरुद्ध जनताच महाभियोग चालविणार : संबित पात्रा

23 Apr 2018 16:01:38
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : काँग्रेस सध्या ज्या प्रकारचे राजकारण खेळत आहे हे पाहता आता काँग्रेसच्या विरुद्ध जनताच महाभियोग चालविणार आहे असे स्पष्ट मत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी मांडले आहे. आज नवी दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोणावरही विश्वास नाही. भारताचे संविधान, भारतीय सेना, सर्वोच्च न्यायालय, आधार योजना, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि निवडणूक आयोग या सगळ्यांवर आजपर्यंत काँग्रेसने अविश्वास दाखविला आहे असेही ते यावेळी म्हणाले. 
 
 
 
सामान्य जनतेतील नागरिक सध्या राजकारणात शिरला आहे, चहा विकणारा माणूस आज पंतप्रधान बनला आहे तसेच मागासवर्गीय जातीतील व्यक्ती आज राजकारणात चांगले कार्य करतो आहे या सगळ्या बाबी काँग्रेसला खपत नाहीत. काँग्रेसला या सगळ्यापेक्षा जास्त महत्वाची सत्ता आणि त्यांचे घराणे आहे असा स्पष्ट आरोप यावेळी संबित पात्रा यांनी राहुल आणि सोनिया गांधींवर केला.
 
 
 
 
कोटी रुपये काँग्रेसकडे येतात तेव्हा सगळे बरोबर, जेव्हा काँग्रेसकडून निकाल लागतो तेव्हा न्याय व्यवस्था बरोबर, काँग्रेस जेव्हा निवडणुका जिंकते तेव्हा निवडणूक आयोग आणि इव्हिएम मशीन बरोबर मग भाजप निवडणुका जिंकते तेव्हा कशी काय इव्हिएम मशीन खराब? असा खडा सवाल यावेळी संबित पात्रा यांनी काँग्रेसपुढे उपस्थित केला. 
 
 
 
 
 
भारताचे संविधान, भारतीय सेना, सर्वोच्च न्यायालय, आधार योजना, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि निवडणूक आयोग या सगळ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसने जगात भारताला कमी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने नेहमी सत्तेसाठी राजकारण केले मात्र राजकारण करतांना त्यांनी देशाच्या मानसन्मानाचा विचार केला नाही असे सडेतोड मत त्यांनी यावेळी मांडले. 
Powered By Sangraha 9.0