आग लावण्याचा खेळ सुरू झाला आहे...

    दिनांक  21-Apr-2018   


  

राहुल गांधी आणि काँग्रेस यांचे वस्त्रहरण झाले. आपण नग झालो आहोत, हे ते स्वीकारायला तयार नाहीत. उलट न्यायालयावरच त्यांनी आक्षेप घ्यायला सुरूवात केली आहे. असत्याची कास धरल्याशिवाय पुढे जाता येत नसल्यामुळे असत्याच्या घोड्यावरून त्यांना उतरताच येत नाही. साथीला येचुरींसारखे कम्युनिस्ट आहेतच.

म्मूमध्ये आठ वर्षांच्या आसिफाचे अपहरण झाले आणि तिची हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशात उन्नाव येथे एका महिलेवर बलात्कार झाला आणि भाजपच्या आमदाराला अटक करण्यात आली. आसिफाचे अपहरण हिंदूंनी केले, तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली, अशी बातमी सर्व ठिकाणी पसरली. पुढल्या वर्षी निवडणुका असल्यामुळे सत्ताधारी पक्षाला घेरण्यासाठी हे विषय अतिशय चांगले, असे वाटून प्रत्येक राजकीय नेता अर्थात विरोधी पक्षाचा, त्यावर तोंडसुख घेऊ लागला. अगदी राज ठाकरेंनीदेखील खास ठाकरे’ शैलीत जबरदस्त भाषण ठोकले. त्याची व्हिडिओ क्लिप माझ्या एका मित्राने माझ्याकडे पाठविली. एका कार्यक्रमात त्याची भेट झाली. त्याने विचारले की क्लिप पाहिली का? ‘‘असल्या क्लिप्स मी बघत नाही,’’ असे उत्तर मी त्याला दिले नाही. केवळ ‘‘बघतो’’ म्हणून सांगितले.

गेल्या महिन्याभरात घडलेल्या अशा घटनांमुळे भाजपचा सामान्य कार्यकर्ता आणि हितचिंतक फारच अस्वस्थ झालेला आहे. प्रसिद्धीमाध्यमांद्वारे देशात कुठेही काहीही वाईट घडले की, पहिला टोला मोदींना मारला जातो. मोदींनी मौन धारण केले आहे असा प्रचार सुरू होतो. घटनांना दलितविरोधी, अल्पसंख्यविरोधी, महिलाविरोधी असा रंग देण्यात येतो. भारतीय जनता पक्ष आणि तिची विचारधारा ही मुळातच दलित, अल्पसंख्य, महिला विरोधी असल्यामुळे मोदींच्या राज्यात वेगळे काय घडणार? असा प्रश्न उपस्थित केला जातो. सामान्य कार्यकर्ता त्यामुळे भांबावून जातो आणि गोंधळात पडतो. मी माझ्या मित्राला, ज्याने राज ठाकरेंची क्लिप पाठवली होती, त्याला माधवराव पेशव्यांच्या जीवनातील एक उदाहरण सांगितले. शनिवारवाड्यातून माधवराव यांची स्वारी निघाली होती. पाणी भरणारा एक पाणक्या घोड्यावर बसलेल्या माधवरावांना म्हणाला,‘‘श्रीमंत तुमचा शिरपेच थोडा डावीकडे झुकला आहे, तो नीट करा.’’ माधवरावांनी त्याच्याकडे क्षणभर बघितले आणि त्याला विचारले,‘‘तू रोज पाण्याच्या किती खेपा टाकतोस.’’ त्याने एक आकडा सांगितला. माधवरावांनी आपल्या हाताखालच्या अधिकार्‍याला सांगितले,‘‘त्याला दुप्पट पाणी भरायला लावा आणि जेवढे कमी भरेल तेवढे फटके मारा.’’ पाणक्या रघुनाथरावांकडे गेला. रडतरडत त्याने आपली कहाणी सांगितली. रघुनाथराव त्याला म्हणाले, ‘‘मूर्ख माणसा! तुझे काम पाणी भरण्याचे आहे. पेशव्यांच्या शिरपेचाची चिंता तुला कुणी सांगितली करायला?’’ ज्या राज ठाकरेंना आपली राजकीय लंगोटी सांभाळता येत नाही, त्यांनी मोदींच्या जॅकेटची चर्चा करू नये. मुंबईतील नगरसेवक ज्यांना सांभाळता आले नाहीत, नाशिक महानगरपालिका सांभाळता आली नाही, ते देश सांभाळणार्‍या मोदींना उपदेश करतात, वाचकांनी जे काय समजून घ्यायचे ते समजून घ्यावे.

कठुआ घटनेवर झी’ न्यूजने आपले पत्रकार पाठवून, सत्य शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांनी एका लेखात मांडले आहे. ज्या मंदिरात आसिफाला ठेवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला असा प्रचार झाला, त्या मंदिराला चार खिडक्या आणि दोन दरवाजे आहेत. दर्शनार्थींची तिथे सतत गर्दी असते. १५ जानेवारीला देवस्थानात भंडारा झाला. चार्जशीटमध्ये मुलगी १५ जानेवारीला तिथेच होती असे म्हटले आहे. बलात्काराची घटना मंदिरात होत नाही आणि असंख्य लोकांच्या उपस्थितीत होत नाही, एवढे तरी ‘मेणबत्ती मोर्चावाल्यां’ना समजायला हवे होते. मेहबूबा मुफ्तीच्या सरकारच्या क्राईमब्रांचने तपास आपल्या हाती घेतला आणि तयार केलेल्या चार्जशीटवर चर्चा चालू आहे. घटनेला जाणूनबुजून हिंदू-मुस्लीम असा रंग देण्यात आला. वास्तविक ही घटना अपहरण आणि बलात्काराची आहे. गंभीर गुन्ह्याची आहे. त्याचा धर्माशी काही संबंध नाही. हिंदू-मुस्लीम असाही संबंध नाही. पण, तो जाणूनबुजून लावण्यात आला. हा आगीशी खेळ आहे. सांप्रदायिक आग पेटली की त्या वणव्यात कोण कोण भाजून निघतील सांगता येणार नाही. असा धार्मिक रंग न्यायमूर्ती ब्रीजगोपाळ लोया यांच्या आकस्मिक मृत्यूला देण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राहुल गांधींनी केला. गुजरातमधील कुख्यात गुंड सोहराबुद्दीन पोलीस चकमकीत ठार झाला. तो खतरनाक गुंड होता आणि मरण्याच्याच लायकीचा होता. पण, तो मुसलमान होता. म्हणून त्याच्या मृत्यूला धार्मिक रंग देण्यात आला. त्याचा मृत्यू मानवी अधिकाराचा विषय करण्यात आला आणि सरकारने त्याचा खून केला असा प्रचार सुरू झाला. अमित शाह तेव्हा गुजरातचे गृहमंत्री होते. त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले. त्याची चौकशी सुरू झाली. ती सीबीआय कोर्टाचे न्या. ब्रीजगोपाळ लोया यांच्यापुढे सुरू झाली. नागपूरला एका विवाह समारंभात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनीदेखील त्यांचा मृत्यू स्वीकारला. परंतु, काँग्रेसला त्याचे राजकीय भांडवल करायचे असल्यामुळे ही केस सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली आणि न्यायमूर्तींनी ही याचिका फेटाळून लावताना म्हटले,‘‘या सर्व याचिका राजकीय हेतूने आणि चर्चेत राहण्यासाठी दाखल झाल्या आहेत. या याचिकांना ठोस आधार नाही.’’

राहुल गांधी आणि काँग्रेस यांचे वस्त्रहरण झाले. आपण नग झालो आहोत, हे ते स्वीकारायला तयार नाहीत. उलट न्यायालयावरच त्यांनी आक्षेप घ्यायला सुरूवात केली आहे. असत्याची कास धरल्याशिवाय पुढे जाता येत नसल्यामुळे असत्याच्या घोड्यावरून त्यांना उतरताच येत नाही. साथीला येचुरींसारखे कम्युनिस्ट आहेतच.

मोदींविरोधाच्या या शिमग्यात देशातील ४९ माजी सनदी अधिकारी सामील झाले आहेत. त्यांनी मोदी यांना एक खुले पत्र लिहिले आहे. हे ४९ जण एका आवाजात म्हणतात,‘‘पक्षातील तुमचे बलाढ्य स्थान आणि पक्षावरील तुमचा आणि पक्षाध्यक्षांचा ताबा पाहता अन्य कोणापेक्षा तुम्हालाच या भयानक स्थितीबद्दल जबाबदार धरले पाहिजे,’’ पत्र लिहिण्याचा हेतू स्पष्ट झाला. या पत्रात या सर्वांनी आव असा आणला आहे की, ‘‘आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, आमचे कोणतेही राजकीय तत्त्वज्ञान नाही, आम्ही फक्त संविधानातील मूल्यव्यवस्था मानतो.’’ पुढे ते म्हणतात की, ‘‘एक राष्ट्र म्हणून आपण चुकलो आहोत. त्याचप्रमाणे मनुष्य म्हणूनसुद्धा आम्ही (म्हणजे सर्व देश) चुकलो आहोत. कशासाठी चुकलो आहोत? तर कठुआ आणि उन्नाव येथे घडले ते सरकारलादेखील अशोभनीय आहे. प्रधानमंत्री आम्ही तुम्हाला एवढ्यासाठीच लिहित आहोत की, आमच्या सामूहिक लज्जेच्या भावना आणि वेदना तुमच्या कानावर पडाव्यात.’’

या ४९ लोकांनी पत्रातील एका परिच्छेदात सचिन तेंडुलकरची ‘डबल सिक्सर’ मारली आहे. ते म्हणतात की, जरी तुम्ही घटनेचा निषेध केला असला आणि खेद प्रकट केला असला, तरी सांप्रदायिकतेच्या मागच्या प्रयोगशाळेवर तुम्ही काहीच बोलला नाही आणि ज्या सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेत विद्वेषाचा जन्महोतो, तो बदलण्याचा तुमचा विचार दिसत नाही. अशा प्रकारचा दिखाऊ पश्चात्ताप खूप झाला. तुम्ही संघ परिवारातील शक्ती सांप्रदायिकतेचा तवा सतत तापत ठेवताना दिसत आहात,’’ या ४९ लोकांचा इतिहास कोणीतरी शोधून काढला पाहिजे. ते जेव्हा सरकारी पदावर होते, तेव्हा या लोकांनी काय केले? न्याय केला की अन्याय केला? भ्रष्टाचार कमी केला की स्वतः भ्रष्टाचार केला? यांनी जी संपत्ती गोळा केली असेल, ती त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाशी सुसंगत आहे का? हे डिंग मारतात की, ‘‘आमची कोणती राजकीय विचारधारा नाही,’’ याच्याइतके असत्य वाक्य हे ४९ लोकच लिहू शकतात. लोकशाहीत राजकीय विचार नाहीत हे शक्यच नाही. नागरिकाला मतदान करावे लागते आणि मतदान करताना राजकीय विचाराच्या आधाराने करावे लागते. मग वेड पांघरून पेडगावला जाण्याचे सोंग कशासाठी? ज्या बलात्काराच्या दोन घटना घडल्या आहेत त्यांचा संबंध कायदा आणि सुव्यवस्थेशी येतो. पोलीस यंत्रणेचे तपास चालू आहेत, न्यायनिवाडा करण्यासाठी न्यायालये आहेत, सत्य शोधण्यासाठी गुप्तचर यंत्रणा आहेत, हे या सनदी अधिकार्‍यांना माहीत नाही असे नाही. यापैकी कुठल्या ना कुठल्या यंत्रणेत ते होतेच. मग आताच मध्येच नाक खुपसण्याची गरज काय?

या लोकांनी स्वतःच्या डोक्यावर, त्यांचा शब्द वापरायचा तर, ‘मॉरल पोलिसां’ची जबाबदारी घेतलेली आहे. सनदी अधिकार्‍यांना (काही सन्माननीय अपवाद सोडल्यास) समाज सद्सद्विवेकबुद्धीचे राखणदार समजत नाही. या अधिकार्‍यांविषयी समाजाच्या मनात फारशा चांगल्या भावना नसतात. लोकांच्या मुखातील शब्द येथे घेणे योग्य नाही म्हणून लिहीत नाही. भलती जबाबदारी आपल्या डोक्यावर घेऊ नये. समाजाच्या सद्सद्विवेकबुद्धीच्या राखणदारीचे काम समाजातील संत मंडळी करतात. प्रामाणिक शिक्षक करतात आणि निःस्वार्थी समाजसेवक करतात. त्यांच्या पंगतीला बसण्याची या लोकांची लायकी आहे काय? अन्यथा या लोकांचे नाव कधी वर्तमानपत्रात आले नसते. कारण फार थोडे सनदी अधिकारी असे आहेत की जे घटनेची बांधिलकी स्वीकारून आपल्या राजकीय बॉसच्या रागा-लोभाची परवा न करता काम करतात. ते लोकांच्या हृदयात जातात. बाकीची सगळी मंडळी असली पत्रके काढून वर्तमानपत्रांच्या रकान्यात जातात. लेखाच्या प्रारंभी माधवराव पेशव्यांचा एक किस्सा दिलेला आहे. तो या लोकांनाही तंतोतंत लागू होतो. या सगळ्या अपप्रचाराचा अर्थ एकच, तो म्हणजे सत्याच्या विरूद्ध असत्य संघटितपणे उभे राहत आहे. असुरी शक्ती नेहमीच संघटित असतात. त्या आता खूप सक्रिय झालेल्या आहेत. आकाशपाताळ एक करून त्यांना केंद्रातील भाजपची सत्ता घालवायची आहे. त्यासाठी ते वाट्टेल त्या थराला जातील. न्या. लोया, कठुआ, दलितांवरील कथित अत्याचार यांचा ट्रेलर सध्या झालेला आहे. राज्यघटनेला मध्ये आणले आहे. ही वेळ सज्जनशक्तीने झोपण्याची नाही. सर्वांना एकवटून आणि सामूहिक शक्तीच्या आधारे मतदानाची टक्केवारी ७० किंवा ८० टक्के करता आली, तर या सर्व आवाजांना चपलेने मारल्यासारखे होईल. यातील वाढीव टक्केवारी म्हणजे झोपलेला हिंदू आहे. हिंदू ११९२ साली झोपला आणि दिल्ली परक्यांच्या ताब्यात गेली. १९४७ ती अर्धवट जागे झालेल्या हिंदूंच्या हातात आली. २०१४ साली हिंदूंनी उठण्याची जांभई दिली आणि मोदी सत्तेवर आले. आता हिंदूंनी उभे राहण्याची वेळ आली आहे. एका गीताची ओळ अशी आहे की, ‘हिंदू जगे तो विश्व जगेगा’ त्याला जागे करणे हे एकमेव कामयेथून पुढे करण्यासारखे आहे. या वटवटींचा उपयोग हिंदू जागरणासाठी केला पाहिजे, परमेश्वराने त्यासाठीच या असुरी शक्तीला जागे केले आहे.