फळझाडांचं जंगल निर्माण करणारा निसर्गप्रेमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2018   
Total Views |
 
चार दिवस निसर्गाच्या सहवासात जाऊन ‘एन्जॉय’ करायला सगळ्यांनाच आवडतं. पण, तो टिकवण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारी मनोजसारखी ‘माणसं’ विरळच असतात.

केरळमध्ये कोचीनजवळ ‘एडवनक्कड’ नावाचं एक गाव आहे. या गावात एक निसर्गसाधक राहतो, त्याचं नाव मनोज कुमार. आपल्या एक एकरच्या परिसरात त्याने फळझाडांचं जंगल निर्माण केलं आहे. या जंगलाला छोटं अभयारण्यच म्हणायला हरकत नाही. माणूस काय करतो, याच्यापेक्षाही ते तो कुठल्या भावनेने करतो आणि किती चिकाटीने व निष्ठेने करतो हे महत्त्वाचं असतं. या दोन्ही निकषांमध्ये मनोज कुमार अगदी उत्तीर्ण झाला आहे. काही व्यक्ती एखाद्या विचारसरणीने भारावून जाऊन, जगावेगळं काहीतरी करतात. त्यांच्यासारखं सगळ्यांनाच जमणं शक्य नाही हे सत्य आहे. पण, जी व्यक्ती असं काहीतरी करते, ती निश्चितच कौतुकास पात्र असते. व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेला, डेटा रिकव्हरीचं कामकरणारा मनोज निसर्गसंवर्धनाच्या ध्येयाने प्रेरित होऊन गेली वीस वर्षे एक स्वत: निर्माण केलेलं जंगल जपतो आहे आणि वाढवतो आहे. मनोजच्या घराच्या मागची सुमारे एक एकरची जागा मोकळी होती. मनोजच्या वडिलांनी ती जागा गवत वगैरे काढून, पूर्ण साफ करून सुशोभित करण्याचं कामकाढलं, तेव्हा मनोजने त्याला विरोध केला. त्याने त्या जागेत जंगल वाढवण्याची कल्पना बोलून दाखवली. सुरुवातीला त्याच्या कुटुंबीयांनी विरोध केला, पण मनोज हट्टालाच पेटला. शेवटी त्याच्या आईवडिलांनी ‘‘तुला जे काय करायचं ते कर...’’ असं सांगून विषय मिटवला. मनोजने एक तत्त्व ठरवलं होतं, ते म्हणजे निसर्ग ‘नैसर्गिकरित्या’ वाढू देण्याचं. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या तत्त्वाप्रमाणे त्या जागेत फक्त बिया टाकायच्या आणि बाकी काहीही न करता जे झाड उगवेल ते तसंच वाढू द्यायचं. त्या वेळी लोकांनी त्याला खुळ्यात काढलं होतं, पण आज वीस वर्षांनंतर मनोजच्या या कल्पनेला ‘फळ’ मिळालं आहे. आंब्याच्या विविध जाती, फणस, जांभूळ, पेरू, डाळिंब, लिंबू, पपई, चिकू, केळी अशी शेकडो फळझाडं त्या जागेत वाढली आहेत. नुसत्या फणसाचीच दोनशे झाडं आहेत. या सगळ्या फळझाडांच्या बिया तो रूजत घालतो आणि त्यांची तयार झालेली नवीन रोपं तो आजूबाजूच्या लोकांमध्ये फुकट वाटतो. निसर्ग जे काही देईल ते आणि तेवढंच घ्यायचं, झाडांना खतं वगैरे घालायची नाहीत, तण काढायचं नाही, अशी तत्त्व मनोजने पाळली आहेत. त्यामुळे पक्षी, प्राणी आणि कीटक मनोजच्या या जंगलात मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. प्राणी-पक्ष्यांना झाडांवरची भरपूर फळं खाऊ द्यायची आणि मग आपण काढायची हा मनोजचा नियम! पण, वास्तविक आज त्या परिसरातली सगळी झाडं भरभरून फळं देतात. स्वत: खाऊन, शेजार्‍या - पाजार्‍यांना देऊन शिवाय प्राणी-पक्ष्यांसाठी भरपूर फळं उरतात.


निसर्ग आणि माणूस यांचं एक खेळीमेळीचं सहजीवन त्याने प्रस्थापित केलं आहे. फळं आणि ताज्या भाज्या हाच मनोजचा दिवसभराचा आहार असतो. निसर्गाच्या सहवासात राहण्याचे आणि नैसर्गिक अन्न खाण्याचे फायदे मनोजला प्रत्यक्ष दिसून आले आहेत. गेल्या २० वर्षांमध्ये त्याला एकही ऍलोपॅथिक औषध घ्यावं लागलेलं नाही. डेटा रिकव्हरीचा आपला व्यवसाय सांभाळून उरलेल्या वेळात मनोज त्याच्या गावात व आजूबाजूला सेंद्रिय शेती आणि जंगलनिर्मितीचे उपक्रमराबवतो. ‘फ्रुटफुल फ्युचर’ ही संकल्पना त्याने तिथे राबवण्यास सुरुवात केली आहे. ज्यांच्या ज्यांच्याकडे जमिनीचा रिकामा तुकडा आहे त्यांना तो जंगल निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करतो. जपानचे सुप्रसिद्ध शेतकरी मासानुबो फुकुओका यांच्या ‘डू नथिंग फार्मिंग’ या संकल्पनेचा मनोज प्रसार करतो. मनोज सांगतो की, ‘‘जंगल निर्माण होणं ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यासाठी नुसती झाडांची रोपं लावून ठेवणं पुरेसं नसतं. आधी जमीन तयार करावी लागते. पडिक जमीन कुठे असेल, तर सुरुवातीला ती साफ करून त्यावर जास्तीत जास्त जैविक कचरा टाकून ठेवावा. यथावकाश त्याचं विघटन होऊन जमिनीत सूक्ष्मजीव वाढतात. मग हळूहळू नैसर्गिकरित्या छोट्या छोट्या वनस्पती वाढायला लागतात. त्यानंतर आपण फक्त बिया टाकायच्या. जंगल आपोआप वाढतं.’’ शाळा-कॉलेजांमध्ये जाऊन मनोज ‘फ्रुटफुल फ्युचर’ संकल्पनेचा प्रसार करतो. आपल्याकडे फळशेती करणारे लाखो लोक आहेत, मग केरळच्या मनोज कुमारनेही फळशेती केली, त्यात विशेष उल्लेखनीय असं काय? असा प्रश्न कोणालाही पडणं स्वाभाविक आहे. विशेष उल्लेखनीय हे की, मनोज कुमारने फळझाडांची लागवड ही स्वत:साठी केलेली नसून, निसर्गासाठी केली आहे आणि गेली वीस वर्षे त्याची ही निष्ठा ढळलेली नाही. लोकांच्या दृष्टीने असलेली ही ‘बिनउत्पन्नाची कामं’ करताना त्याला कंटाळा आलेला नाही. असे निष्ठावान लोकच काहीतरी भरीव कामगिरी करून दाखवतात. २० वर्षांपूर्वी मनोजच्या डोक्यात असलेल्या जंगलनिर्मितीच्या कल्पनेचं ‘बीज’ अंकुरून त्याचा आज ’वृक्ष’ झाला आहे. चार दिवस निसर्गाच्या सहवासात जाऊन ‘एन्जॉय’ करायला सगळ्यांनाच आवडतं. पण, तो टिकवण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारी मनोजसारखी ‘माणसं’ विरळच असतात. म्हणून ती उल्लेखनीय असतात.- हर्षद तुळपुळे
@@AUTHORINFO_V1@@