हे मुळापर्यंत खणलं पाहिजे..

    दिनांक  21-Apr-2018   
प्रातिनीधीक छायाचित्र


भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण घडल्यावर ज्या प्रकारे राज्यात सामाजिक घुसळण झाली, ज्याप्रकारे समाज एका धोकादायक वळणावर येऊन उभा राहिला, गावागावांत वातावरण कलुषित होऊ लागलं, त्या पार्श्वभूमीवर गृह खात्याने केलेल्या या कारवाया आशादायक आहेत. या धाडींमध्ये वादग्रस्त पत्रकं, फोटो, पुस्तकं, पेनड्राईव्ह, तसंच इतर अनेक धक्कादायक गोष्टी सापडल्या असल्याचं समजतं. फक्त आता, हे सर्व केवळ धाडी टाकण्यापुरतं मर्यादित न राहता, मुळापर्यंत जाऊन खणून काढलं पाहिजे. भविष्यात जसजशी ही मोहीम तीव्र होईल, तसे या मंडळींचे भेसूर चेहरे आणखी ठळकपणे समोर येऊ लागतील, यात शंकाच नाही.

तथाकथित डाव्या पुरोगाम्यांचे व सेक्युलरांचे बुरखे फाडण्याची सुरूवात तशी यापूर्वीच झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे ही प्रक्रिया अधिक वेगाने सुरू झाली आहे. हैदराबादमधील मक्का मशिदीतील बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने स्वामी असिमानंद यांच्यासह पाचही आरोपींना तब्बल ११ वर्षानंतर दोषमुक्त केलं. तर, दुसरीकडे महाराष्ट्राचं समाजकारण ढवळून काढणाऱ्या भीमा-कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी पुणे, मुंबई, नागपूर आदी ठिकाणी कबीर कला मंच ही वादग्रस्त संघटना आणि इतर काही डाव्या संघटनांच्या कार्यालय व कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे टाकले. या ठिकाणाहून त्यांनी काही संशयास्पद साहित्यही जप्त केलं असून लवकरच ते न्यायालयात सादरही केलं जाणार आहे. याचसोबत सर्वांना हादरवून टाकणाऱ्या कठूआ व उन्नाव येथील बलात्काराच्या दुर्दैवी घटनांवरून देशभरातील तमाम पुरोगामी, सेक्युलर आणि बुद्धिवादी वगैरेंनी ज्याप्रकारे संपूर्ण हिंदुत्वावरच चिखलफेक सुरू केली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा या मंडळींचेच दुटप्पी चेहरे उघड झाले आहेत. एकीकडे समाजात फूट पाडून, राष्ट्रवादाचा तेजोभंग करून देशात अनागोंदी माजवण्याचे आपले विकृत हेतू साध्य करण्याची स्पर्धाच सध्या देशभरात लागलेली असताना, दुसरीकडे सकल समाजामध्ये असे प्रयत्न करणाऱ्या मंडळींचं खरं स्वरूप एकामागून एक उघड होत जाणं ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणायला हवी.

महाराष्ट्रात तर या पुरोगामी, सेक्युलर इ. गोंडस नावांखाली डाव्या विचारसरणीचा प्रचार-प्रसार करणाऱ्या मंडळींचे पेवच फुटलं आहे. गेली काही वर्षं महाराष्ट्र या मंडळीच्या हिटलिस्टवर असून महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर या मंडळींच्या कारवायांचं केंद्रस्थान बनलं आहे. दलित, आदिवासी आणि इतर वंचित समाजघटकांमध्ये संपूर्ण समाजाबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल, राष्ट्राबद्दल अपप्रचार करायचा, आणि लोकांची माथी भडकावून अनागोंदी माजवण्याच्या उद्दिष्टाला बळ द्यायचं, हे या मंडळींचं काम. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला जी नवी उमेद दिली, नवा विचार दिला, शिक्षणातून उन्नतीचा आणि समतेचा जो संदेश दिला, त्यातून जी एक व्यापक रिपब्लिकन चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला, त्या रिपब्लिकन चळवळीच्या आणि त्यामागील विचाराच्या मूळ तत्वाला धक्का लावून ही चळवळ ‘हायजॅक’ करण्यासाठी सध्या ही डावी मंडळी सध्या अहोरात्र मेहनत घेत आहेत. मार्क्स आणि आंबेडकर हे समीकरण जुळवण्यासाठी आणि डॉ. आंबेडकर हे कसे डावे होते हे सिद्ध करण्यासाठी सारी डावी यंत्रणा खूप आधीपासूनच कामाला लागली आहे. या डाव्या मंडळींच्या ओठात जरी स्वातंत्र्य, समता आदी शब्द असले, राज्यघटनेच्या रक्षणाचा आव असला तरी मनात मात्र माओ आणि स्टॅलिनचा मार्ग असतो. जो अंतिमतः समाजाला आत्मघाताकडेच घेऊन जातो. राष्ट्रवादाला आणि हिंदुत्ववादाला आजवर डाव्यांच्या कब्जात असलेल्या वैचारिक वर्तुळात त्याज्य समजण्यात आल्याने आणि अस्पृश्य ठरवण्यात आल्याने या डाव्या मंडळींचं फावलं, ज्यातून त्यांना आपले विघातक विचार पुढे नेण्यास मदत मिळाली. मात्र, आता गेल्या तीन-साडेतीन वर्षांत केंद्रात आणि राज्यात राष्ट्रीय विचारांचं सरकार आल्याने त्यांच्या कारवायांना काहीसा पायबंद बसला आणि त्यातून या कारवाया अधिक त्वेषाने सुरू झाल्या. भीमा-कोरेगाव प्रकरण आणि त्या दरम्यान आणि त्या नंतर झालेला हिंसाचार हे त्याचंच एक उदाहरण.

भीमा-कोरेगावमध्ये हिंसाचार प्रकरण घडण्यापूर्वी पुण्यात शनिवारवाड्यावर झालेली या डाव्या संघटनांची ‘एल्गार परिषद’, त्यामध्ये झालेली वक्तव्यं, आणि अचानकपणे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून निर्माण झालेला वाद, या सर्व घटनाक्रमात सातत्याने सक्रीय दिसलेल्या डाव्या संघटना, या सगळ्यांचा आपापसात कुठे ना कुठे संबंध आहे, हे एव्हाना स्पष्ट झालेलं आहे. तसंच, हे सर्व घडण्यापूर्वी वर्ष-दीड वर्षापासूनच या सर्व तथाकथित पुरोगामी, सेक्युलर वगैरे संघटना तसंच अतिजहाल डाव्या संघटना दलित बांधवांमध्ये अपप्रचार करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होत्या हेही एव्हाना सिद्ध झालेलं आहे. या मंडळींच्या नक्षली कनेक्शनबाबतही अनेक गोष्टी उघड झाल्या असून सोशल मिडियावर अनेकांनी अभ्यासपूर्वक लिखाण करून या संघटनांचे घटक धंदे उघडकीस आणले आहेत. मात्र, दुसरीकडे संभाजीराव भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या माथी या सर्व प्रकरणाचं बिल फाडण्यात आल्यामुळे, आणि त्यावरून डाव्या, पुरोगामी संघटनांसह कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससारख्या मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांनीही पुष्कळ कोलाहल केल्यामुळे भीमा-कोरेगावची ही दुसरी बाजू अप्रकाशित राहिली होती. मात्र, अनेकजण कबीर कला मंचासह इतर अनेक अतिडाव्या संघटनांचा भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणामागील संशयास्पद धागेदोरे नेटाने मांडत होते, प्रसंगी अवहेलना, खालच्या पातळीवरील आक्रमक टीका सहन करत होते. महाराष्ट्र पोलिसांनी टाकलेल्या धाडीमुळे या सर्वांच्या प्रयत्नांना काहीसं बळ मिळालं आहे. तसंच, भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर, तसंच बी. जी. कोळसे-पाटील, एल्गार परिषदेसाठी बाहेरून आयात केलेले जिग्नेश मेवाणी, ओमार खालिदसारखे डावे विद्यार्थी नेते, आदींच्या भूमिका, वक्तव्यं आणि घडलेल्या घटना यांचा संशयास्पद परस्परसंबंधही समोर आला आहे.

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण घडल्यावर ज्या प्रकारे राज्यात सामाजिक घुसळण झाली, ज्याप्रकारे समाज एका धोकादायक वळणावर येऊन उभा राहिला, गावागावांत वातावरण कलुषित होऊ लागलं, त्या पार्श्वभूमीवर गृह खात्याने केलेल्या या कारवाया आशादायक आहेत. या धाडींमध्ये वादग्रस्त पत्रकं, फोटो, पुस्तकं, पेनड्राईव्ह, तसंच इतर अनेक धक्कादायक गोष्टी सापडल्या असल्याचं समजतं. फक्त आता, हे सर्व केवळ धाडी टाकण्यापुरतं मर्यादित न राहता, मुळापर्यंत जाऊन खणून काढलं पाहिजे. पुण्यात हातपाय पसरलेल्या आणि हळूहळू ग्रामीण महाराष्ट्रात पसरू पाहणाऱ्या या डाव्या संघटनांचं नक्षली कनेक्शन कायदेशीररित्या न्यायालयात उघड केलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर ते समाजातही उघडं केलं पाहिजे. तरच, महाराष्ट्रात जातीजातींमध्ये निर्माण होऊ लागलेले दुराव्याचे, संशयाचे ढग दूर होण्यास मदत होईल. ‘देर आये, दुरुस्त आये’ असं वर्णन या कारवायांबाबत करता येऊ शकेल. मात्र, आतातरी नेटाने पुढे जाऊन या प्रकरणाचा कठोरपणे तपास व्हावा, अशीच जनतेची अपेक्षा आहे. शाहू-फुले-आंबेडकरांनी समाजाला समतेचा संदेश दिला. वर्षानुवर्ष अनिष्ट-रूढी परंपरांमुळे आणि स्पृश्यास्पृश्यत्वाच्या वेडगळ कल्पनांमुळे खितपत पडलेल्या समाजातील एका महत्वाच्या घटकाला स्वत्वाची जाणीव दिली, स्वाभिमान दिला, सकारात्मक उमेद दिली. आज, याच शाहू-फुले-आंबेडकरांच्या नाव घेऊन एक मोठा विकृत गट या समाजाच्या आणि राष्ट्राच्या अस्तित्वालाच सुरूंग लावण्याचं कारस्थान रचतो आहे, आणि तशा कारवाया करतो आहे. यांच्या निष्ठा या मातीतल्या नाहीत, यांची तत्वं या मातीतील नाहीत. ती इथली होऊही शकत नाहीत. त्यामुळेच हा सोपा मार्ग या मंडळींनी निवडला असून त्यांचे बुरखे फाडण्याची आज प्रचंड गरज आहे. आता कुठे ते फाडण्याची सुरूवात झाली आहे, भविष्यात जसजशी ही मोहीम तीव्र होईल, तसे या डाव्या मंडळींचे भेसूर चेहरे आणखी ठळकपणे समोर येऊ लागतील, यात शंकाच नाही.- निमेश वहाळकर