हापूस आपलोच असा...

    दिनांक  21-Apr-2018   

उन्हाळा सुरू झाला की, फळांचा राजा आंब्याची सर्वत्र चर्चा सुरू होते. बाजारपेठांमध्ये कोकणचा हापूस भाव खाऊन जातो. मात्र, गेल्या काही काळापासून कोकणच्या या राजाला कर्नाटकी कथित हापूसने टक्कर द्यायला सुरुवात केली. कमी किमतीत, किलोवर मिळणारा हा आंबा मग विक्रेत्यांनीही ग्राहकांच्या माथी मारणे सुरू केले. त्याच्याच विरोधात कोकणातील आंबा बागायतदारांनी हापूस देवगडचा की रत्नागिरीचा, हा आपापसातला वाद सोडून या कर्नाटकी कथित हापूस विरोधात मोहीमउघडली. कोकणातील आंबा बागायतदारांच्या या मोहिमेला फळ मिळाले आणि नुकतेच ‘कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट’ या संस्थेने देवगड, रत्नागिरी आणि कोकणात अन्यत्र येणारा हापूस हाच खरा हापूस असल्याचा खुलासा केला. म्हणजेच ‘हापूस’ हे नाव कोकण वगळता कर्नाटकसह देशाच्या इतर कोणत्याही भागातल्या आंब्यासाठी वापरता येणार नाही. तसा प्रयत्न कोणी केल्यास कोकणातील आंबा बागायतदार त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवू शकतील.

कोकणचा हापूस आणि कर्नाटकातील ‘हापूस’ नावाने विकला जाणारा आंबा यांच्या चवीत तुलना होऊ शकत नाही. कोकणातील उत्पादन क्षेत्रातील भौगोलिक रचना आणि कर्नाटकातील भौगोलिक रचना यात फरक आहे. कोकणात डोंगराळ भागात उत्पादन होते, तर कर्नाटकात मैदानी पट्‌ट्यात त्याच्या बागा आहेत. त्यामुळे कोकणातल्या हापूसचा रंग, स्वाद आणि सुगंध अखंड दरवळत तर राहतोच, पण खवय्यांनाही भुरळ घालतो. याआधारेच कोकणातील हापूसला ‘जीआय’ (जिओग्राफिकल इंडिकेशन) म्हणजे भौगोलिक निर्देशन मिळाले. ‘जीआय’ निर्देशन म्हणजे एखाद्या भागातल्या कृषी उत्पादन आणि नैसर्गिक वस्तूंना त्या भागाची बौद्धिक संपदा असल्याचे शिक्कामोर्तब होय. आता कोकणच्या हापूस आंब्याला हेच ‘जीआय’ निर्देशन मिळाल्याने ग्राहकांनाही अस्सल हापूसची चव चाखता येणार आहे.

नवी मुंबईच्या वाशी एपीएमसीमध्ये सध्या दररोज ६०-६५ हजार हापूस आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत. जोडीला कर्नाटकच्या कथित हापूसच्या १० ते १५ हजार पेट्या येत आहेत. परंतु, आता कोकणच्या आंब्यालाच ‘हापूस’ हे नाव लावता येणार असल्याने त्याचा परिणामतिथल्या बागायतदार, शेतकरी, कामगार, विक्रेते, व्यापारी यांच्यावर होणार आहे. यातूनच कोकणच्या अर्थकारणाची चक्रेही फिरणार आहेत.

आशादायक चित्र


गेल्या तीन-चार महिन्यांपासून राजकीय पक्ष, संघटना आणि नेतेमंडळींनी समाजकंटकाच्या भूमिकेत शिरून वैयक्तिक स्वार्थासाठी जाती-जातीत, दलित-सवर्णात वाद लावून दिले. पण, देशातल्या आणि राज्यातल्या सामाजिक क्षेत्रातले वातावरण जातीय विद्वेषाच्या तव्यावर पोळ्या भाजणार्‍या लोकांमुळे गढूळ झालेले असतानाच काही आशादायक घटनाही घडत आहेत. नुकतेच लोकांना समानतेची शिकवण देण्यासाठी हैदराबादमधील श्री रंगनाथ मंदिराच्या पुजार्‍यांनी एक आश्वासक पाऊल उचलले. सी. एस. रंगराजन नामक या पुजार्‍यांनी दलित भक्त आदित्य पारासरी याला आपल्या खांद्यावर उचलून घेत मंदिरात प्रवेश केला आणि थेट गाभार्‍यात जाऊन भगवंताचे दर्शन घडवून दिले. त्यानंतर सर्वत्रच सी. एस. रंगराजन यांचे कौतुक होत असून समर्थनही केले जात आहे.

एकीकडे समाजात दोन जातींत वा धर्मात तेढ कशी निर्माण होईल, यासाठी जाणूनबुजून पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत. गाव-खेड्यांत, शहरांत एकत्र राहणार्‍या समाजगटांतली वीण उसवण्याचे, त्यांच्यात दरी निर्माण करण्याचे कुटील कारस्थान आकाराला येत आहे, तर दुसरीकडे हैद्राबादमधील ही घटना. भारतीय समाजमनाची दोन वेगवेगळी रूपे दाखविणार्‍या. स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर काळात हिंदू समाजातल्या जातीय भिंती दफन करण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी कार्य केले. नंतर तर अस्पृश्यतेविरोधात कायदाही करण्यात आला. पण, काही गोष्टी केवळ कायदा केला म्हणून साध्य होत नसतात. लोकांच्या मनातही त्या गोष्टी व्हाव्यात, बदल घडावेत, सर्वांना समानतेची वागणूक मिळावी म्हणून कार्य करण्याची स्वयंप्रेरणा निर्माण होणेही गरजेचे असते. सी. एस. रंगराजन यांनाही अशी स्वयंप्रेरणा त्यांनी सहभाग घेतलेल्या एका कार्यक्रमातून मिळाली. मागासलेल्या समाजघटकांना मंदिरात कशाप्रकारे प्रवेश दिला जात नाही, यासंदर्भात तो कार्यक्रम होता. त्यानंतर त्यांनी आपण ज्या मंदिराचे पुजारी आहोत, तिथे दलित समाजातील व्यक्तीचा मंदिर प्रवेश घडवून आणण्याचा निर्णय घेतला. यावरून असे म्हणता येईल की, प्रबोधन, जनजागृती केली तर समाजमने बदलायला तयार असतात. त्यांना फक्त मार्गदर्शनाची आवश्यकता असते. पण, आजची परिस्थिती याला कितपत पोषक आहे? इथे जाती-जातीत भांडणे लावून मजा बघणारे भरपूर आहेत, ते त्याऐवजी प्रबोधनाचे, जनजागृतीचे कार्य करतील का?


- महेश पुराणिक