व्यापारयुद्धाची सुरुवात

    दिनांक  02-Apr-2018   

 
 
 
अमेरिकेने गेल्या महिन्यात चीनमधून आयात होणार्‍या स्टीलवर २५ टक्के, तर ऍल्युमिनियमवर १० टक्के आयात शुल्क लावले. त्यामुळे खवळलेल्या चीनने अमेरिकेशी व्यापारयुद्ध पुकारल्याचे ताज्या घटनाक्रमांतून दिसते.
 
 
आज चीनने अमेरिकेतून आयात केल्या जाणार्‍या फळे आणि याच वर्गवारीतील अन्य १२० वस्तूंवर १५ टक्के, तर डुकराचे मांस आणि अशा प्रकारच्या अन्य ८ उत्पादनांवर २५ टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. दोन्ही देशांनी घेतलेल्या या निर्णयांमुळे आता अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुद्ध सुरू झाल्याचे स्पष्ट होत असून त्याचा भडका उडाल्यास संपूर्ण जगाला विपरित परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

२०व्या शतकातील दोन महायुद्धे आणि त्यानंतरच्या शीतयुद्धामुळे जग दोन गटांत विभागले गेले. युद्धामुळे होणारी अपरिमित हानी पाहून जगभरातील देश एकमेकांवर कुरघोडीचे नवे मार्ग शोधण्यास उत्सुक होते. त्याचवेळी जगाला आपल्या हितसंबंधांना जपत अन्य देशांवर हक्क गाजवण्यासाठी, त्या देशांना आपल्या इशार्‍याबर हुकूम वाकवण्यासाठी आर्थिक लढाईचे हत्यार गवसले. याचा पुरेपूर वापर अमेरिका, रशिया आणि युरोपियन युनियनमधील विकसित देशांनी करून घेतला. इराण-इराक-व्हिएतनाम-भारत आणि तिसर्‍या जगातील अन्य देशांवर काहीही थातूर मातूर कारणे देत विकसित आणि बलाढ्य देशांनी निर्बंध लादले.

एखाद्या देशाच्या आर्थिक नाड्या आवळल्या की, तो देश आपल्या कलाने वागायला लागेल, अशी जागतिक पातळीवरील देशांची धारणा झाली. त्यातून यापुढे देशांदेशांतील युद्धे ही आर्थिक आघाडीवरच लढली जातील, हे स्पष्ट झाले. आज अमेरिका आणि चीनमध्ये जे घडतेय तो याच आर्थिक आघाडीवरील युद्धाचा पुढला अंक म्हटला पाहिजे. चीनने आपल्या देशातील साधनसंपत्ती, मनुष्यबळ, तंत्रज्ञानाचा वापर करत स्वतःला जगाचा कारखाना म्हणून सादर केले. अवाढव्य उत्पादनामुळे चीनला तो माल निरनिराळ्या देशांत खपवण्याची गरज निर्माण झाली. यामुळे चिनी माल अन्य देशांत मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ लागलाच, पण इतरांकडील आयात मात्र चीनमध्ये कमीच राहिली. आता अमेरिका आणि चीनमध्ये जे व्यापारयुद्ध सुरू आहे, त्याला आयात जास्त आणि निर्यात कमी हा एक पदर आहे. चिनी मालाची अमेरिकेतील आयात ४६२.६ अब्ज डॉलर एवढी आहे, तर चीनला होणारी निर्यात केवळ ११५.६ अब्ज डॉलर आहे. दोन्ही देशांतील व्यापाराचा फरक ३४७ अब्ज डॉलरचा आहे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात चीनवर बौद्धिक संपदा चोरीचे आरोप केले होते.

बौद्धिक संपदा चोरीमुळे अमेरिकेला कोट्यवधी डॉलरच्या नुकसानीचा तडाखा बसला. यातूनच चीनचे अमेरिकेतील दुकान बंद करण्याच्या उद्देशाने ट्रम्प प्रशासनाने चीनकडून ५० अब्ज डॉलर एवढे भरभक्कम आयात शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांनी तर व्यापारयुद्धे चांगली असल्याचे म्हणत त्याची पाठराखणही केली. चीननेही यावर संतप्त प्रतिक्रिया देत आम्ही शांत बसणार नसल्याचे सांगत आमच्या हितरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची घोषणा केली. पण, अमेरिकेने चीनवर ज्या बौद्धिक संपदा चोरीचे आरोप केले, त्याबद्दल चीनने अवाक्षरही काढले नाही. म्हणजे चोरी तर करायची, पण त्यावर कारवाई केल्यास वर उलट्या बोंबाही ठोकायच्या, ही चीनची नीती. आता दोन्ही देशांतील या व्यापारयुद्धामुळे जवळपास तीन अब्ज डॉलरच्या व्यापारावर परिणाम होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच चीनवर अमेरिकेने केलेली कारवाई हे केवळ सुरुवातीचे पाऊल असल्याचेही अनेक तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिका यापुढे चिनी गुंतवणुकीवरही निर्बंध लावण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जाते. कारण, गेल्या कित्येक वर्षांपासून चीन अमेरिकेचे हित वार्‍यावर सोडून स्वतःचा स्वार्थ साधण्यात गर्क होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावरून चीनला अनेकदा इशारेही दिले होते. तरीही चीनने त्या इशार्‍यांना न जुमानता आपला कार्यभाग साधण्यातच आनंद मानला.

दुसरीकडे चीन आणि अमेरिकेतील या व्यापारयुद्धाचा भारतावरही परिणाम होण्याची शक्यताइंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया’ने व्यक्त केली आहे. सोबतच या दोन्ही देशांतील व्यापारयुद्धात भारताने मधल्यामध्ये अडकणे योग्य होणार नसल्याचेही मत व्यक्त केले आहे. त्यामुळे आता आगामी काळात या दोन्ही देशांतील व्यापारयुद्ध नेमका कोणता टप्पा गाठते आणि त्याचे जगावर कोणते परिणाम होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.