उत्तरेत 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद

02 Apr 2018 11:19:32

महाराष्ट्रसह दक्षिण भारतात मात्र जनजीवन सुरळीत




हरियाणा :
अॅट्रॉसिटी कायदाचा गैरवापर टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलेल्या निकालाविरोधात दलित चळवळींकडून आज देशभरात 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. उत्तर भारतामध्ये पंजाब, हरियाणा, बिहारसह उत्तरेतील काही राज्यांमध्ये या बंदला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी बंदला मध्यमस्वरूपाचा प्रतिसाद मिळत आहे.

उत्तरेमध्ये मुख्यतः बिहार, हरियाणा आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये हा बंद मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे. परंतु यामध्ये फक्त काही ठराविकच दलित चळवळी सहभागी झाल्या आहेत. दलित चळवळींकडून अनेक ठिकाणी रस्ता रोको आणि रेल रोको केला जात आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना जबरदस्तीने आपली दुकाने बंद करायला देखील भाग पाडले जात आहे. काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी हिंसक कारवाया देखील केल्याच्या घटना सध्या समोर येत आहेत.




विशेष म्हणजे हरियाणामध्ये या बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी इंटरनेट बंदी लागू करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थांच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बंददरम्यान कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी म्हणून हरियाणात जागोजागी पोलीसा यंत्रणा देखील तैनात करण्यात आली आहे.  याउलट मध्यप्रदेशपासून खाली या बंदला कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे सध्या तरी दिसत आहे. संपूर्ण देशभर जरी हा 'भारत बंद' पुकारण्यात आला असला तरी महाराष्ट्रसह दक्षिणेतील राज्यांमध्ये याला कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. 





गेल्या महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याच्या होणाऱ्या गैरवापरवर चिंता व्यक्त केली होती. तसेच या कायद्याअंतर्गत होणाऱ्या तत्काळ अटकेवर बंदी घातली होती. न्यायालयाच्या या निर्णयावर देशभरातील दलित चळवळींनी आपला आक्षेप नोंदवला होता. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अॅट्रॉसिटी संबंधी असलेली भीती कमी होऊन दलित समाजांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ होईल, असे मत या चळवळींकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये बद्दल करावा, अशी मागणी देखील या चळवळींमार्फत केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0