जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी

02 Apr 2018 09:50:07

पांगरी धनवटे येथे महिला सरपंचाचा मृत्यू




वाशीम :
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामधील तापमानाचा पारा वाढू लागला आहे. त्यामुळे उन्हाचा तडका आणि उष्ण वाऱ्यांचा मारा नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे प्रत्येक वर्षी होणाऱ्या उष्माघाताला आता सुरुवात होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये वाढलेल्या तापमानामुळे काल जिल्ह्यातील एका महिलेचा सरपंचाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून सावध करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अनिता गौतम मनवर (वय ५०) असे मृत्यु झालेल्या महिलेचे नाव असून मालेगाव तालुक्यातील पांगरी धनवटे येथील त्या सरपंच होत्या. गेल्या शनिवारी मनवर या शेतात काम करत असताना त्यांना उन्हाचा फटका बसून त्यांना चक्कर आली. यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी डॉक्टरांनी उष्माघातामुळे त्यांना हा त्रास झाला व त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे मनवर यांची गेल्या तीन महिन्यांपूर्वीच पांगरी धनवटे येथे सरपंच पदी निवड झाली होती. परंतु नशिबाचे फासे उलटे पडल्यामुळे असा दुर्दैवी मृत्यू त्याच्यावर ओढवला. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

गेल्या शनिवारी जिल्ह्यात पारा तब्बल ४१ अंशावर गेला होता. तसेच गेल्या दोन दिवसांमध्ये पारा सातत्याने ४० अंश आणि त्यांच्यावर आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाचे प्रचंड चटके सहन करावे लागत आहेत. यासाठी नागरिकांनी उष्माघातापासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन सध्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0