वनशेती करणारे पक्षी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2018   
Total Views |
 


 
 
फळं खाणार्‍या सगळ्याच पक्ष्यांच्या विष्ठेद्वारे बिया विस्तृत परिसरात टाकल्या जातात, ज्याद्वारे नवीन वृक्षसंपदा वाढते. यामध्ये हॉर्नबिलचं योगदान सर्वांत जास्त असल्यामुळे त्याला ‘वनशेती करणारा पक्षी’ असं नाव दिलं गेलं आहे, असं नानिवडेकर सांगतात. पक्ष्यांकडून होणारा बीजप्रसार हाच नानिवडेकर यांचा पीएचडीचा विषय होता.
 
पक्षीजगतात ‘हॉर्नबिल‘ (धनेश) हा नेहमीच चर्चेत असतो. टॅक्सीसारख्या काळ्यापिवळ्या रंगामुळे आणि म्हशीच्या शिंगासारख्या चोचीमुळे तो सगळ्यांनाच आवडतो. पर्यावरण अभ्यासक रोहित नानिवडेकर हे गेली अकरा वर्षे हॉर्नबिल पक्ष्यावर संशोधन करत आहेत. म्हैसूरच्या ‘नेचर काँझर्व्हेशन क्लब’ मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करणारे आणि ‘हॉर्नबिल नेस्ट अ‍ॅडॉप्शन प्रोग्रॅम’ या कार्यक्रमात सहभागी असलेले रोहित नानिवडेकर यांनी गेली अनेक वर्षे अरुणाचल प्रदेशसहित उत्तर-पूर्व भारतातल्या पाच राज्यांमध्ये हॉर्नबिल पक्ष्याच्या अधिवासावर आणि बीजप्रसारामध्ये असणार्‍या त्याच्या योगदानाबद्दल सखोल अभ्यास केला आहे. फळं खाणार्‍या सगळ्याच पक्ष्यांच्या विष्ठेद्वारे बिया विस्तृत परिसरात टाकल्या जातात, ज्याद्वारे नवीन वृक्षसंपदा वाढते. यामध्ये हॉर्नबिलचं योगदान सर्वांत जास्त असल्यामुळे त्याला ‘वनशेती करणारा पक्षी’ असं नाव दिलं गेलं आहे, असं नानिवडेकर सांगतात.
 
पर्यावरणात पक्षी कीटकनियंत्रण आणि बीजप्रसार या दोन अत्यंत मोठ्या भूमिका बजावतात. भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात नव्वद टक्के झाडं बीजप्रसारासाठी पक्ष्यांवर अवलंबून असतात. हॉर्नबिल पक्ष्याची भूमिका यात विशेष महत्वाची असते कारण हा पक्षी विविध प्रकारची, खास करून मोठ्या आकाराची फळं खातो आणि त्याचा फिरण्याचा परीघही विस्तृत असतो. त्यामुळे हा पक्षी खर्‍या अर्थाने ‘वनशेतकरी’ आहे. जिथे हॉर्नबिल्सची संख्या जास्त असते अशा जंगलप्रदेशात एक चौकिमीच्या प्रदेशात दिवसाला तीन ते चार हजार बिया हॉर्नबिल्सकडून टाकल्या गेल्याचं नानिवडेकर यांना आढळलं आहे. शिवाय एका वृक्षाचं बी त्याच्यापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर नेऊन टाकली जाते. यामुळेच विस्तृत प्रदेशावर जंगल वाढवण्यात हॉर्नबिलचं योगदान खूप मोठं आहे. हॉर्नबिल्सची संख्या कमी झाल्यामुळे हॉर्नबिलकरवी बीजप्रसार होणार्‍या झाडांची संख्याही कमी झाल्याचे नानिवडेकर यांना निरीक्षणात आढळले आहे. हॉर्नबिल्स बरेचदा राखीव वनक्षेत्राच्या बाहेर पडतात आणि आजूबाजूच्या जंगली भागांत भटकतात. यामुळे ते मानवाकडून होणार्‍या शिकारींचे बळी ठरतात. उत्तर-पूर्व भारतातल्या पाच राज्यांमध्ये केलेल्या अभ्यासात ग्रेट हॉर्नबिल, ब्राऊन हॉर्नबिल यांचं प्रमाण गेल्या वीस वर्षांमध्ये सुमारे तीस टक्क्यांनी घटल्याचं आढळलं आहे. हॉर्नबिल्सची संख्या कमी होण्याची दोन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे शिकार आणि दुसरं म्हणजे वृक्षतोड. हॉर्नबिल स्वतः घरटं बांधत नाही. झाडाला नैसर्गिकरित्या असलेली ढोली अथवा सुतारपक्षाने पाडलेल्या ढोलीत हॉर्नबिलची मादी अंडी घालते. जंगल कमी झाल्यामुळे घरटं मिळवण्यासाठी हॉर्नबिल्समध्ये स्पर्धा निर्माण झाल्याचं नानिवडेकर सांगतात.
 
 
 
 
ईशान्य भारतातील लोकजीवनात हॉर्नबिलचं खूप महत्व आहे. हॉर्नबिलची पिसं आणि चोच तिथल्या आदिवासी लोकांच्या पोशाखात अथवा शरीरसुशोभनासाठी वापरतात. यासाठी हॉर्नबिल्सची शिकार केली जाते; मात्र हॉर्नबिलच्या विणीच्या हंगामात आदिवासी लोक मुद्दाम शिकार बंद ठेवतात. हॉर्नबिलचं फिरण्याचं क्षेत्र फार विस्तृत असल्यामुळे केवळ एखादं अभयारण्य त्याच्या संरक्षणासाठी पुरेसं नसतं. उदाहरणार्थ, ईशान्य भारतात मुख्यत्वे आढळणारा रेथ हॉर्नबिल हा नामदफा व्याघ्र अभयारण्याच्या घनदाट जंगलात सप्टेंबर ते फेब्रुवारी या काळात वास्तव्य करतो. मात्र, त्याच्या विणीच्या हंगामात तो सुमारे दोन हजार किलोमीटर लांब प्रवास करून जातो आणि तिथे घरटं करतो. अशाप्रकारे संरक्षित वनक्षेत्राच्या बाहेर हॉर्नबिल्सचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे तिथे त्याच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. हॉर्नबिल्सची शिकार रोखण्यासाठी सर्वप्रथम ईशान्य भारतातल्या ’नाईशी’ या आदिवासी जमातीतल्या लोकांनी पुढाकार घेतला. वनखाते आणि पर्यावरणप्रेमींनी केलेल्या जनजागृतीला या लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. २००१ नंतर या लोकांनी हॉर्नबिलची शिकार पूर्णपणे थांबवली. शरीरसुशोभनासाठी हे लोक हॉर्नबिलच्या पिसांऐवजी कृत्रिम दागिने वापरू लागले. २०११ साली याच भागात वनखाते आणि ’नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने हॉर्नबिलचं घरटं दत्तक घेण्याची योजना सुरु केली. या योजने अंतर्गत आत्तापर्यंत १७ लोकांनी हॉर्नबिलची ३६ घरटी दत्तक घेऊन ती संरक्षित केली आहेत.
 
२०१३ साली रोहित नानिवडेकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पक्के व्याघ्रप्रकल्पाच्या ठिकाणी ’पक्के पागा फेस्टिव्हल’ नावाचा कार्यक्रम सुरु केला. नाईशी जमातीत ग्रेट हॉर्नबिल या पक्ष्याला ’पागा’ म्हणतात. स्वयंस्फूर्तीने हॉर्नबिलचं संरक्षण करणार्‍या स्थानिक लोकांची इतरांकडून दखल घेतली जावी आणि त्यांचं काम जगासमोर यावं हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं नानिवडेकर सांगतात. या कार्यक्रमासाठी देश विदेशातून पर्यटक येतात, त्यांना हॉर्नबिल्सची घरटी दाखवली जातात, तसंच पक्षीजीवनावरच्या फिल्म्सही दाखवल्या जातात. यामुळे स्थानिक लोकांना अर्थार्जनाचा मार्गही उपलब्ध झाला आहे. केलेल्या कष्टांचं योग्य फळ मिळालं की इथले स्थानिक लोक जास्त उत्साहाने हॉर्नबिल संरक्षणाच्या कामासाठी तयार होतील असा नानिवडेकर यांचा विश्‍वास आहे.
 
 
 
- हर्षद तुळपुळे 
 
@@AUTHORINFO_V1@@