‘रामा’ उचलणार वेटलिफ्टींगचे शिवधनुष्य

    दिनांक  02-Apr-2018
- ‘राम’नामाचे सार्थक : अंडा-पाव विकणारा रामा मेहेसरे निघालाय इंडोनेशियाला
-
नावात काय असते, असे एक परदेशस्थ नाटककार म्हणाला होता. मात्र, भारतात नामात दम असतोच. आता बघाना
बसस्थानका समोर अंडा-पावचा व्यवसाय करणारा ‘रामा’ मेहसरे इंडोनेशियाला जातो आहे. तुम्ही म्हणाल, ‘‘ऊंऽऽ त्यात काय? पैसा असेल तर कुणीही कुठेही जाऊ शकतो...’’ रामा काही फिरायला जात नाहीय्‌, अत्यंत कष्ट करून त्यांने वेटलिफ्टिंग मध्ये आपली जागा निर्माण केली अन्‌ तो तिकडे स्ट्रेंथ लिफ्टिंग वर्ल्ड इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जातो आहे.
राम वनवासांत असला तरीही तो रावणाची सोन्याची लंका जिंकून येत असतो... मलकापूरच्या या रामाच्या वाट्याला आर्थिक वनवासच आलेला. ढकलगाडीवर तो अंडा-पाव विकून आपली आणि कुटुंबाची गुजराण करतो. त्यातही त्याने उदंड इच्छाशक्तीने आंतरराष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंगचे शिवधनुष्य उचलण्याची मनी बाळगले अन्‌ आता त्याचे हे स्वप्न प्रत्यक्षात येते आहे. अर्थात्‌ त्यामागे त्याची साधना आहे. प्रचंड जिद्द, महत्त्वाकांक्षा, चिकाटी आहेच!
रामा प्रकाश मेहेसरे याची आगामी 5 ते 9 एप्रिल दरम्यान इंडोनेशिया येथे होणार्‍या वर्ल्ड इंटरनॅशनल स्ट्रेंथ लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. आजवरची त्याची ओळख म्हणजे येथील बसस्थानक चौकात ऑम्लेट-पावची गाडी लावून हातकमाईचा व्यवसाय करत परिवाराला आर्थिक हातभार लावणारा गडी, अशीच होती.
 
घरची परिस्थिती अगदी बेताची. त्यात एकत्र कुटुंब असल्याने काही ना काही कामधंदा करणे आवश्यक. पण, तरी या परिस्थितीवर मात करत त्याने परिसरात आपली ओळख एक नावाजलेला वेटलिफ्टर म्हणून निर्माण केली आहे.
विद्यार्थिदशेपासूनच खेळाची आवड आणि वयाच्या योग्य काळात सूर्यकांत उंबरकारसारख्या उमद्या प्रशिक्षकाचे मिळालेले मार्गदर्शन व प्रशिक्षण. यामुळे त्याने वेटलिफ्टिंग, पावरलिफ्टिंग, स्ट्रेंथ लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात आपली ताकद आजमावण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तरावर त्याने नेत्रदीपक कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले. कामातून वेळ काढून मेहनत आणि जिद्दीने सराव सुरू ठेवला. विद्यापीठाच्या स्पर्धांमधूनही त्याने कित्येक सुवर्ण पदके पटाकाविली. त्याला इंडोनेशिया येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी वाशीम येथे 4 ते 7 जानेवारी दरम्यान झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत दाखवलेल्या दर्जेदार प्रदर्शनाच्या जोरावर प्राप्त झाली असल्याचे त्याच्या प्रशिक्षकांनी सांगितले.
 
रामाच्या आजवरच्या संपूर्ण क्रीडा प्रवासात वेळोवेळी लागणारी आर्थिक मदत मिळवण्यासाठी अनेक दात्यांकडे कित्येकदा त्याने हातही पसरलेत. रामाची परिस्थिती, मेहनत घेण्याची तयारी आणि काहीतरी करून दाखवण्याची धमक याकडे पाहून बहुतेकांनी त्याला सकारात्मक प्रतिसादही दिला आहेच. त्यांच्या या मदतीचे सार्थक तो आता करणार आहे. तशी संधी त्याला इंडोनेशिया वर्ल्ड इंटरनॅशनल स्ट्रेंथ लिफ्टिंग चॅम्पियनशिपच्या माध्यमातून मिळालेली आहे. म्हणून या सामान्य परिस्थितीतल्या असामान्य प्रतिभावान खेळाडूने सातासमुद्रापार तिरंगा फडकवित सुवर्ण पदकाचे मानकरी व्हावे. त्यासाठी शहरवासीयांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा सदैव रामाच्या पाठीशी आहेत.
प्रा. नितीन भुजबळ
मलकापूर,